Asha Bhosle Dainik Gomantak
मनोरंजन

Asha Bhosle: साक्षात सरस्वती जेव्हा घरी येते

Asha Bhosle In Goa: आशाताईना गोमंतकीय (Goan Food) पद्धतीचे माशांचे जेवण हवे आहे.

दैनिक गोमन्तक

-प्रवीण गावकर

संध्याकाळी 7:30 च्या सुमारास मला माझ्या मित्राचा फोन आला. खरं म्हणजे हा फोन बऱ्याच दिवसांनी येत होता त्यामुळे तो बोलायच्या आधीच मीच सुरुवात केली, ‘काय राव बऱ्याच दिवसानी आमची आठवण आली...’ वगैरे पण त्याने सरळ विषयालाच हात घातला, ‘हे बघ माझ्याबरोबर आशाताई आहेत आणि त्यांना उद्या दुपारी गोमंतकीय (Gomantak) पद्धतीचे माशांचे जेवण हवे आहे.

त्यांना कुणीतरी एका रेस्टॉरेंटचं नाव सांगितलं आहे, पण आशाताईंना गर्दी नको आहे’. मला काय बोलावं ते कळेना. मी त्याला म्हटलं, मला थोडा वेळ दे आणि फोन ठेवला. त्यानंतर एक-दोन रेस्टॉरंेटना फोन केला पण त्यांचं म्हणणं होतं की, असं वेगळं बसवता येणे शक्य नाही आणि लोकांना थांबवताही येणार नाही.

मी विचार केला, त्यांना आमच्या घरीच जेवायला बोलावलं तर कसं? लगेच मी मित्राला फोन केला की आमच्या घरीच हा जेवणाचा बेत करू. त्यामुळे गर्दीही टळेल आणि घरगुती जेवणही मिळेल. ‘आशाताईकडे बोलतो आणि कळवतो’ असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. त्यानंतर मात्र माझ्या मनाची चलबिचल वाढली. खरंच आशाताईंनी होकार दिला तर?

रात्री बऱ्याच उशिरा मित्राचा फोन आला, ‘आशाताई जेवायला यायला तयार झाल्या आहेत. फक्त त्यांची एक विनंती आहे की, घरची माणसं सोडून कुणालाही बोलावू नये. त्या बरोबर दुपारी 12:30 वाजता जेवतात.’ हे एखाद्या स्वप्नासारखे होते. माझा आनंद गगनात मावेनासा झाला खरा, पण धाकधूकही सुरू झाली आणि झोपपण उडाली. त्यांचं स्वागत कसं करावं, त्यांच्याशी काय बोलावं, कुठल्या गाण्याबद्दल विचारावं? (लहानपणापासून ऐकत आलेलो त्यांची भक्तिगीते - पांडुरंग कांती, येगं येगं विठाबाई, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, रामा रघुनंदना, विठू माझा लेकुरवाळा किंवा त्यांनी गायलेली दीनानाथांची नाट्यगीते किंवा त्यांची अत्यंत लोकप्रिय आणि अजरामर झालेली भावगीते- केव्हा तरी पहाटे, तरुण आहे रात्र अजूनी, जीवलगा राहिले रे दूर, चांदण्यात फिरताना, ही वाट दूर जाते, गेले द्यायचे राहून किंवा त्यांनी गायलेली वेगवेगळ्या शैलीतली हिंदी सिनेगीते, त्या बोलण्याच्या मूडमध्ये तर असतील ना, त्यांना जेवण आवडेल ना, त्यांना पाहिजे ते मासे मिळतील ना (पावसात ताजे मासे मिळणे कठीण असतं), असे असंख्य प्रश्न डोक्यात घोंघावू लागले. मी, हेमा (माझी बायको) आणि राजस (माझा मुलगा) तिघेही तयारीला लागलो. खरं म्हणजे तिघांचीही झोप उडाली होती.

सकाळी (Morning) लवकर उठून, घर आवरून बाजारात जाऊन मासे आणले. जेवण बनवण्यात आणि घर आवरण्यात कसा वेळ गेला कळला नाही आणि बरोबर12:15 वाजता मित्राचा फोन आला, ‘10 मिनिटात आम्ही पोहोचतो आहोत.’ हे ऐकल्याबरोबर माझ्या छातीची धडधड अजून वाढली. मी धावत आणि घाबरतच खाली गेटकडे गेलो, तोपर्यंत गाडी पोहोचलीच होती. आशाताई गाडीतून उतरताच त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. हे सगळं स्वप्नवत होते. आशाताई आमच्या घरी आल्या आहेत यावर माझा विश्वासच बसत नव्हता.

पण त्या आल्या आणि घरातल्याच एक सदस्य असल्यासारखं बोलू लागल्या. अगदी मैत्रीच्या आणि खेळीमेळीच्या वातवरणात त्या सगळ्यांशी आपलेपणाने बोलू लागल्या. त्यांच्या या वागण्यामुळे आमच्या सगळ्यांची मनात असलेली भीती थोडीशी नाहीशी झाली.

त्या बोलत राहिल्या. अधूनमधून मीही त्यांना बोलतं करत गेलो. आपल्या बाबांच्या म्हणजेच दीनानाथांच्या आठवणी त्या सांगत गेल्या. त्यांचे माशेल येथील गुरूजी माशेलकर, त्यांचे शिष्य रामनाथ मठकर अशा कितीतरी आठवणी! लतादीदींच्या अनेक आठवणी आल्या.

विशेष म्हणजे आपण गायलेली गाणी सोडून बाबांनी, लतादीदींने आणि हृदयनाथांनी गायलेली गाणी (Song) यावरच त्या जास्त बोलल्या. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध करून गायलेल्या गाण्यांची त्या खूप तारीफ करत होत्या आणि एका अवचित क्षणी, आम्ही फर्माईश करायच्या आधीच, जितेंद्र अभिषेकींनी साळगवराळी रागात बांधलेलं गाणं, ‘घेई छंद मकरंद’ त्या गायलाही लागल्या. माझा विश्वास बसत नव्हता- महान गायिका आशा भोसले माझ्या घरात गात होत्या!

आम्ही आयोजित करत असलेल्या स्वरमंगेश - मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती शास्त्रीय संगीत व नृत्य समारोहाबद्दल मी त्यांच्याकडे या आधी फोनवर थोडक्यात बोललो होतो. पण आता सविस्तरपणे बोलायची संधी मिळाली. आशाताईंनी स्वरमंगेशबद्दल जाणून घेतलं, स्वरमंगेशचे फोटो (Photo) बघितले, आणि गेल्या दहा वर्षात आम्ही करत असलेल्या कामाची तारीफही केली.

अगदी साध्या पद्धतीने बनविलेल्या घरगुती जेवणाचा आस्वाद आशाताईनी घेतला. बनवलेला प्रत्येक पदार्थ, त्याची प्रक्रिया आणि वापरलेली सामग्री याबद्दल जाणून घेतलं आणि त्याचबरोबर बऱ्याच मांसाहारी पदार्थांची रेसिपी त्यानीही आम्हाला सांगितली.

जेवणानंतरही अगदी दिलखुलास गप्पा झाल्या. त्या थोर गायिकेने आम्हा सगळ्यांना आपलेसे करून घेतले. त्यांच्या बोलण्यात आणि एकूण मिश्किल स्वभावात त्या 88 वर्षाच्या आहेत हे कुठेही दिसून येत नव्हते.

या वयातही त्यांचा जोश, उत्साह आणि मिश्किल स्वभाव वाखाणण्यासारखा होता. आजही त्या दररोज रियाज करतात हे त्यांनी खास नमूद केलं. त्यांची चैतन्यमयी आणि ऊर्जायुक्त गाणी अजूनही त्यांच्या स्वभावात आणि त्यांच्या बोलण्यातून झळकत होती. अनपेक्षितपणे घडून आलेली ही भेट आणि एकूणच रंगलेली गप्पांची मैफल यामुळे मी पूर्णतः भारावून गेलो होतो.

हे सगळं घडवून आणण्यात मित्राने जरी पुढाकार घेतला तरी मनापासून मी देवाचे खूप खूप आभार मानले. असा योग पुन्हा येवो अशी मनोमन प्रार्थना केली. निरोप घेताना आशाताईंनीच आम्हाला फोटो काढण्यास सुचवलं. आशाताईंच्या या भेटीमुळे, साक्षात सरस्वती देवी घरात आल्याचा भास झाला आणि हा संस्मरणीय क्षण कायमचा हृदयात कोरला गेला. माझ्यासारख्या एका संगीत साधकाचे याहून मोठं भाग्य ते काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

VIDEO: "...अन् डोळ्यासमोर अंधारीच आली!" मेलबर्नमध्ये मोहम्मद रिझवानची फजिती; नाजूक जागी चेंडू लागताच मैदानात उडाली खळबळ

Mangal Gochar 2026: नशिबाची साथ अन् पैशांची बरसात! मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; गुंतवणूकीतून मिळणार मोठा परतावा

SCROLL FOR NEXT