सावंतवाडी: तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचे वेड लहान मुलांच्या जीवावर कसे बेतू शकते, याचा एक अत्यंत हृदयद्रावक प्रकार सावंतवाडीत समोर आला आहे. जुना बाजार कामतनगर परिसरात राहणाऱ्या एका दहावीतील विद्यार्थ्याने पालकांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात गळफास लावून आपली जीवन संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मूळचा नेमळे येथील असलेला हा अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबासह सावंतवाडीत भाड्याच्या घरात राहत होता. तो शहरातील एका नामांकित शाळेत इयत्ता दहावीत शिकत होता. शुक्रवारी संध्याकाळी त्याने मोबाईलसाठी पालकांकडे हट्ट धरला होता, मात्र अभ्यासाचे वर्ष असल्याने पालकांनी त्याला फोन देण्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून, आई-वडील कामासाठी घराबाहेर गेलेले असताना त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि छताच्या फॅनला दोरीने गळफास लावला. तो उत्कृष्ट कबड्डीपटु होता. यंदा तो राज्यस्तरावर खेळला होता.
रात्री पावणे नऊच्या सुमारास जेव्हा त्याचे आई-वडील घरी परतले, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा आतून बंद आढळला. वारंवार हाक मारूनही प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला असता, समोरचा देखावा पाहून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपला एकुलता एक मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस कर्मचारी मनोज राऊत आणि धोत्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला. दहावीसारख्या महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्याने केवळ एका मोबाईलसाठी असे पाऊल उचलल्याने शैक्षणिक वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.