Sanjay Raut's statement on 'The Kashmir Files': सध्या चर्चेत असलेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचा विषय अत्यंत संवेदनशील असून याचे कौतुक सर्वच स्तरातील मंडळींनी केले आहे. कलाकारांना प्रोत्साहन म्हणून अनेक राज्यांमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर चित्रपटाबद्दल मोठे विधान केले आहे. (Sanjay Raut's statement on 'The Kashmir Files')
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे भाजपतर्फे समर्थन करण्यात आले मात्र काँग्रेसने या सिनेमावरून भाजपावर निशाणा साधला आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, कश्मीर हा आपल्या देशासाठी आणि देशाच्या जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असा विषय आहे, अनेक वर्ष देशात राजकारण सुरू आहे. नरेंद्र मोदी आल्यानंतर ते थांबेल असे वाटले होते, पण ते वाढतच चालले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’मध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या असत्य आहेत, ज्या घडलेल्या नाहीत, पण तो चित्रपट आहे. ज्यांना पाहायचा आहे ते पाहतील आणि ज्यांना खटकले असेल ते बोलतील. तेवढे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. पण कश्मीर पंडितांसोबत शिखांनी सुद्धा बलिदान केले आहे. सुरक्षा दलातील मुस्लीम पोलिसांना देखील दहशतवाद्यांनी मारले आहे आणि कश्मीर पंडित सांगतात की त्यांचे प्राण वाचवायला अनेकवेळा मुस्लिम अधिकारी आले होते.
ते पुढे म्हणाले, 'काश्मीरसारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करणे योग्य नाही. 'द काश्मीर फाईल्स' हा केवळ एक चित्रपट आहे, येत्या निवडणुकीत त्याचा कोणाला राजकीय फायदा होईल, असे वाटत नाही. निवडणुका येईपर्यंत चित्रपट निघून जाईल.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.