5 major happenings in Wrestlers Protest: भारतीय पदक विजेते कुस्तीपटू गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यांनी भारतीय कुस्तीपटूंचे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंगविरुद्ध हे आंदोलन पुकारले आहे. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला.
कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली केली आहे. त्यासाठीच कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. या आंदोलनात ऑलिम्पिक पदक विजेते साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगट अशा कुस्तीपटूंचाही समावेश आहे.
दरम्यान, या आंदोलनानंतर अनेक दिवस काहीच ठोस निकाल लागत नव्हता. पण गेल्या दोन दिवसात हे आंदोलन वेगवेगळे वळण घेताना दिसत आहे.
मागील आठवड्यात 28 मे रोजी कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंवरच गुन्हाही दाखल करण्यात आलेला.
पण यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 30 मे रोजी कुस्तीपटूंनी तीव्र भूमिका स्विकारत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मिळवलेली पदके हरिद्वारला गंगेच्या प्रवाहात विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय शेतकरी संघाचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंना 5 दिवसांची वाट पाहाण्याची विनंती केली होती.
खाप पंचायतीचाही इशारा
या प्रकारणाबाबत उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि हरियाणातील कुरुक्षेत्र आणि सोनीपत जिल्ह्यांमध्ये तीन महापंचायती झाल्या आहेत. यात शेतकरी आणि खाप पंचायत नेत्यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी खाप पंचायतीनेही 9 जूनपर्यंत या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला मुदत दिली होती.
अमित शाह यांची भेट
त्यानंतर कुस्तीपटूंनी दिलेली ५ दिवसांची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी शनिवारी (3 जून) रात्री उशीरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुस्तीपटूंची दिल्लीत भेट घेतली. ही बैठक साधारण दोन तास चालल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक मध्यरात्री संपली. या बैठकीत बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि अनेक प्रशिक्षक सामील झाले होते.
पण या बैठकीत काय चर्चा झाली याबद्दल कोणीही उघडपणे काही सांगितलेले नाही. पण अमित शाह यांनी कोणताही भेदभाव न करता तपास करण्याचे आश्वासन दिले असल्याची चर्चा आहे.
कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. यात 1983 वर्ल्डकप विजेत्या भारतीय क्रिकेट संघ यांचाही समावेश आहे. 3 जून रोजी 1983 वर्ल्डकप विजेत्या संघाकडून स्टेटमेंट देण्यात आले होते की कुस्तीपटूंना दिलेल्या अमानुष वागणूकीच्या दृश्याने आम्ही निराश आणि व्यथित झालो आहोत. तसेच त्यांनी आशा व्यक्त केली होती की कुस्तीपटूंच्या तक्रारी ऐकल्या जातील आणि त्यावर त्वरित कारवाईही केली जाईल.
पण यानंतर काही वेळातच 1983 सालच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा भाग असलेले सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी यातून स्वत:ला दूर करताना म्हटले होते की त्यांनी कोणतेही विधान केले नाही, तसेच त्यांना विश्वास आहे की सक्षम अधिकारी समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत. त्याचबरोबर खेळाला राजकारणाशी जोडले जाऊ नये.
ब्रिजभूषण हे आयोध्येमध्ये राम कथा पार्क येथे 5 जून रोजी 'जन चेतना महारॅली' आयोजित करणार होते, मात्र त्यांच्या या रॅलीला जिल्हा प्रशासनाने परवानगी न दिल्याने स्थगिती मिळाली. पण असे असले तरी ब्रिजभूषण यांनी 5 जून रोजी आयोध्येत शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी शरयूनदीच्या काठावर पुजाऱ्यांच्या वैदिक मंत्रोच्चारात आरती केली.
5 जून रोजी दुपारी साक्षी मलिकने कुस्तीपटूंच्या आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त समोर आले होते. तसेच तिच्यासह या आंदोलनात सहभागी झालेला बजरंग पुनिया देखील आंदोलनातून माघार घेणार असल्याचे म्हटले जात होते.
याशिवाय अशीही बातमी समोर आली की ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध ज्या अल्पवयीन महिला कुस्तीपटूने आरोप केले होते, तिने एफआयआर मागे घेतला आहे.
पण या बातम्या वेगाने पसरत असतानाच साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी ट्वीट करत या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. या दोघांनाही स्पष्ट केले की त्यांची लढाई अद्यापही सुरू असून कोणीही आंदोलनातून माघार घेतलेली नाही. तसेच बजरंगने त्याच्या ट्वीटमधून हे देखील स्पष्ट केले की एफआयआरही मागे घेतलेला नाही.
साक्षी आणि बंजरंग हे 5 जून रोजी त्यांच्या रेल्वेच्या नोकरीत पुन्हा रुजू झाले आहेत. पण असे असले तरी त्यांनी या आंदोलनातून माघार घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे. साक्षीने याबद्दल तिच्या ट्वीटमध्ये सांगितले आहे की रेल्वेसाठी तिची असलेली जबाबदारी ती पार पाडत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.