ICC ODI Cricket World Cup 2023, Pakistan vs Bangladesh, Shaheen Shah Afridi Record:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत मंगळवारी बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान संघात सामना होत आहे. कोलकातामधील इडन गार्डन्सवर सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानसमोर 205 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने एक मोठा विक्रम केला आहे.
या सामन्यात शाहिन शाह आफ्रिदीने 9 षटके गोलंदाजी करताना 23 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता त्याच्या कारकिर्दीत 51 वनडे सामन्यात 102 विकेट्स पूर्ण झाल्या आहेत.
त्याचमुळे तो वनडेमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने या विक्रमाच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे टाकले आहे. स्टार्कने 52 सामन्यात 100 वनडे विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.
तसेच वनडेमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणाऱ्या एकूण गोलंदाजांमध्ये आफ्रिदी तिसऱ्या आणि स्टार्क चौथ्या क्रमांकावर आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर नेपाळचा संदीप लामिछाने आहे. त्याने 42 सामन्यांत 100 वनडे विकेट्स घेतल्या होत्या, तर राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 44 सामन्यांत 100 वनडे विकेट्स घेतल्या होत्या. लामिछाने आणि राशिद हे दोघेही फिरकीपटू आहेत.
तसेच शाहिन हा पाकिस्तानकडूनही सर्वात जलद 100 वनडे विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने सक्लेन मुश्ताक यांना मागे टाकले असून त्यांनी 53 वनडे सामन्यांत 100 विकेट्स घेतल्या होत्या.
वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज -
51 सामने - शाहिन शाह आफ्रिदी
52 सामने - मिचेल स्टार्क
54 सामने - शेन बाँड
54 सामने - मुस्तफिजूर रेहमान
55 सामने - ब्रेट ली
मंगळवारी होत असलेल्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी केली. पण त्यांना 45.1 षटकात सर्वबाद 204 धावाच करता आल्या. बांगलादेशकडून महमुद्दुलाहने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली.
तसेच लिटन दासने 45 धावांची आणि कर्णधार शाकिब अल हसनने 43 धावांची खेळी केली, तर मेहदी हसन मिराजने 25 धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त बांगलादेशकडून कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीबरोबरच मोहम्मद वासिम ज्युनियरनेही 3 विकेट्स घेतल्या. तसेच हॅरिस रौफने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर इफ्तिखार अहमद आणि उसमा मीर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.