Rohit Sharma Lowest Batting Average In ODI Career: न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यातही भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माचा खराब फॉर्म कायम राहिला असून, या निर्णायक सामन्यातही त्याचे फिरकी आणि वेगापुढे चालले नाही. मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा अवघ्या 13 चेंडूंत 7 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतले. संपूर्ण मालिकेत त्याला एकदाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही, ज्यामुळे सलामीवीर म्हणून त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही सर्वात खराब फलंदाजी सरासरी ठरली.
या मालिकेत एकूण चार सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळालेल्या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बॅटमधून केवळ 30 धावाच निघाल्या. पहिल्या सामन्यात तो खाते न उघडताच बाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात त्याने 23 धावा केल्या. चौथ्या सामन्यात तो पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला आणि अखेरच्या सामन्यात त्याला 7 धावांवरच समाधान मानावे लागले. परिणामी, या संपूर्ण मालिकेत त्याची फलंदाजीची सरासरी केवळ 7.50 एवढीच राहिली, जी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अत्यंत निराशाजनक कामगिरी मानली जात आहे.
या सामन्यात वेगवान गोलंदाज मॅथ्यू फिशरच्या 146 किमी प्रति तास वेगाने आलेल्या अचूक चेंडूवर रोहित बाद झाला. ऑफ स्टम्पच्या बाहेरील गुडलेन्थ चेंडूवर फ्लिक करण्याचा प्रयत्न करताना शॉर्ट मिडविकेटवर उभ्या असलेल्या डीन फॉक्सक्रॉफ्टने त्याचा सोपा झेल टिपला. रोहितच्या या सातत्यपूर्ण अपयशाचा थेट फटका भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीला बसला आणि संपूर्ण मालिकेत भारताला एकही भक्कम सुरुवात मिळवता आली नाही.
चार किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकाही डावात 50 पेक्षा अधिक धावांची शतकी किंवा अर्धशतकी ओपनिंग भागीदारी न करता येण्याचा हा नकोसा विक्रम तब्बल आठ वर्षांनंतर भारताच्या नावावर नोंदवला गेला. यापूर्वी 2017-18 मधील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय सलामीची जोडी अशी कामगिरी करण्यात अपयशी ठरली, ज्यामुळे रोहित शर्माच्यासह संपूर्ण भारतीय व्यवस्थापनासमोर चिंतेचे ढग दाटले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.