भारतात जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून प्रो-कबड्डी लीगचा 10 वा हंगाम खेळवला जात आहे. एकूण 12 संघात खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील 10 व्या हंगामाची साखळी फेरी 21 फेब्रुवारीला संपली असून आता 26 फेब्रुवारीपासून प्ले ऑफला सुरुवात होईल. प्लेऑफचे सर्व सामने हैदराबादला खेळवले जाणार आहेत.
तब्बल साखळी फेरीतील 132 सामन्यांनंतर प्लेऑफमध्ये पोहचणारे 6 संघ निश्चित झाले आहेत. प्ले ऑफमध्ये पुणेरी पलटण, जयपूर पिंक पँथर्स, दबंग दिल्ली, गुजरात जायंट्स, हरियाणा स्टिलर्स आणि पटना पायरेट्स या संघांनी प्रवेश केला आहे.
प्रो-कबड्डीच्या प्लेऑफमधील फॉरमॅटनुसार गुणतालिकेतील पहिले दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतात. तसेच तीन ते सहा क्रमांकावर राहिलेले संघ एलिमिनेटरमध्ये खेळणार आहेत. एलिमिनेटरमधील विजयी संघ उपांत्य सामने खेळतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील विजयी संघ अंतिम सामन्यात पोहचतील.
10 व्या हंगामात साखळी फेरीनंतर पुणेरी पलटणने 22 पैकी 17 सामने जिंकून 96 गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला आहे, तर जयपूर पिंक पँथर्सने 16 विजयांसह 92 गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहचले आहेत.
त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर दबंग दिल्ली 79 गुणांसह आहे, तर चौथ्या क्रमांकावर 70 गुणांसह गुजरात जायंट्स आहेत. पाचव्या क्रमांकावर 70 गुणांसह हरियाणा स्टिलर्स आहेत आणि पटना पायरेट्स 69 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या चारही संघांना एलिमिनेटरमध्ये खेळावे लागणार आहे.
एलिमिनेटरचे सामने 26 फेब्रुवारी रोजी खेळले जाणार आहेत. एलिमिनेटरमध्ये पहिला सामना दबंग दिल्ली आणि पटना पायरेट्स यांच्यात रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. त्यानंतर दुसरा सामना गुजरात जायंट्स आणि हरियाणा स्टिलर्स यांच्यात रात्री 9 वाजता सामना सुरू होईल. या दोन्ही सामन्यातील विजयी संघ 28 फेब्रुवारीला उपांत्य फेरीतील सामना खेळतील.
उपांत्य फेरीत पुणेरी पलटणविरुद्ध एलिमिनेटरच्या पहिल्या सामन्यातील विजेता संघ रात्री 8 वाजता सामना खेळेल, तर एलिमिनेटरच्या दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ जयपूर पिंक पँथर्सविरुद्ध रात्री 9 वाजता सामना खेळेल. त्यानंतर 1 मार्च रोजी या हंगामाचा अंतिम सामना होणार आहे.
प्रो कबड्डीच्या 10 व्या हंगामातील सामन्यांचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर होत आहे, तर ऑनलाईन प्रक्षेपण डीज्नी प्लस हॉटस्टार ऍप आणि वेबसाईटवर होत आहे.
26 फेब्रुवारी 2024
एलिमिनेटर १ - दबंग दिल्ली विरुद्ध पटना पायरेट्स, वेळ- रात्री: 8.00 वाजता.
एलिमिनेटर २ - गुजरात जायंट्स विरुद्ध हरियाणा स्टिलर्स, वेळ- रात्री: 9.00 वाजता.
28 फेब्रुवारी 2024
पहिला उपांत्य सामना - पुणेरी पलटण विरुद्ध एलिमिनेटर 1 मधील विजेता संघ, वेळ- रात्री: 8.00 वाजता.
दुसरा उपांत्य सामना - जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध एलिमिनेटर 2 मधील विजेता संघ, वेळ- रात्री: 9.00 वाजता.
1 मार्च 2024
अंतिम सामना - वेळ- रात्री: 8.00 वाजता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.