Prithvi Shaw: भारतात सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात मुंबई विरुद्ध आसाम संघात गुवाहाटीला सामना सुरू आहे. या सामन्यात मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉने दमदार खेळ करत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाकडून पृथ्वी शॉने 383 चेंडूत 98.96 च्या स्ट्राईकरेटने 379 धावा केल्या. त्याने या खेळीत तब्बल 49 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याला 400 धावांचा टप्पाही गाठण्याची संधी होती. मात्र, तो 126 व्या षटकात रियान परागने त्याला पायचीत केले.
दरम्यान, या खेळीमुळे तो भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने या यादीत संजय मांजरेकर यांच्या 377 धावांच्या खेळीला मागे टाकले आहे. मांजरेकर यांनी 1990-91 हंगामात हैदराबादविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ही खेळी केली होती.
या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर भाऊसाहेब निंबाळकर आहेत. त्यांनी 1948-49 हंगामात काठीयावार संघाविरुद्ध महाराष्ट्राकडून खेळताना नाबाद 443 धावा केल्या होत्या.
भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावा करणारे क्रिकेटपटू (Highest scores in India First Class cricket)
443* धावा - भाऊसाहेब निंबाळकर (1948-49)
379 धावा - पृथ्वी शॉ (2022-23)
377 धावा - संजय मांजरेकर (1990-91)
366 धावा - एमव्ही श्रीधर (1993-94)
359* धावा - विजय मर्चंट (1943-44)
359* धावा - समीत गोहेल (2016-17)
शॉ-रहाणेची 400 धावांची भागीदारी
शॉने त्रिशतक करताना रहाणेबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 401 धावांची भागीदारी केली. रहाणेने 302 चेंडूत 191 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर मुंबईने पहिला डाव 138.4 षटकांत 4 बाद 687 धावांवर घोषित केला.
मुंबईकडून शॉ आणि रहाणे यांच्या व्यतिरिक्त मुशीर खानने 42, सर्फराज खानने 28 आणि अरमान जाफरने 27 धावांची खेळी केली. असामकडून रियान परागने 2 विकेट्स घेतल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.