Pondicherry Inter-State T20 Cricket Tournament: संघ बांधणी आणि खेळाडूंची चाचपणी या उद्देशाने पुदुचेरीतील आंतरराज्य टी-20 क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेला गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ शनिवारीही विजयाविनाच राहिला. केरळने दिलेले 227 धावांचे आव्हान त्यांना पेलता आले नाही आणि त्यामुळे २५ धावांनी पराभव पत्करावा लागला.
गोव्याचा हा स्पर्धेतील ओळीने पाचवा पराभव ठरला. गोव्याने नाणेफेक जिंकल्यानंतर केरळला प्रथम फलंदाजीस पाचारण केले.
वरुण नयनार याने ४३ चेंडूंत आठ चौकार व चार षटकारांच्या मदतीने केलेल्या आक्रमक ८३ धावांच्या बळावर केरळने २० षटकांत ८ बाद २२६ केल्या.
नंतर सलामीचा ईशान गडेकर (३७), सुयश प्रभुदेसाई (५४) व स्नेहल कवठणकर (४१) यांनी फलंदाजीत चमक दाखवूनही गोव्याला ९ बाद २०१ धावाच करता आल्या.
आणखी एका पाहुण्याची चाचणी
दिल्लीचा अंकित सिंग शनिवारच्या लढतीत गोव्यातर्फे खेळला. व्यावसायिक (पाहुणा) खेळाडू या नात्याने त्याच्यासाठी ही एकप्रकारे चाचणीच होती, पण तो छाप पाडू शकला नाही.
या फिरकी गोलंदाजाच्या तीन षटकांत प्रतिस्पर्धी संघाने तब्बल ५० धावा कुटल्या, नंतर फलंदाजीत तो फक्त दोन चेंडूच टिकला व शून्यावर बाद झाला.
अंकित यापूर्वी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत फेब्रुवारी २०१९ मध्ये अरुणाचल प्रदेशकडून फक्त एकच सामना खेळल्याचा उल्लेख सापडतो.
संक्षिप्त धावफलक
केरळ : २० षटकांत ८ बाद २२६ (वरुण नयनार ८३, सलमान निझार ४१, पीए अब्दुल बाझिथ २९, फेलिक्स आलेमाव ३-०-४२-२, विजेश प्रभुदेसाई ३-०-४०-२, दर्शन मिसाळ ४-०-३७-१, शुभम देसाई ४-०-३१-२, अंकित सिंग ३-०-५०-०, सुयश प्रभुदेसाई ३-०-२४-१) वि.
वि. गोवा : २० षटकांत ९ बाद २०१ (ईशान गडेकर ३७- २४ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, राहुल त्रिपाठी ४, सुयश प्रभुदेसाई ५४- ४२ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार, स्नेहल कवठणकर ४१- २५ चेंडू, २ चौकार, ३ षटकार, तुनीष सावकार २, कश्यप बखले ५, अंकित सिंग ०, राजशेखर हरिकांत १९, दर्शन मिसाळ नाबाद २७, शुभम देसाई १, फेलिक्स आलेमाव नाबाद १, बेसिल थम्पा ३-०-३४-२, महंमद इनाम ३-०-२४-२, पी. के. मिधुन ४-०-४०-३).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.