एफसी गोवाविरुद्ध गतविजेत्या मुंबई सिटीच्या (Mumbai City) विजयात सामन्याचा पूर्वार्धात गोल नोंदविल्यानंतर आनंदित झालेला इगोर आंगुलो (उजवीकडे). Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: मुंबई सिटीचा सूर हरपलेल्या एफसी गोवावर विजय

आंगुलोने दोन गोलसह काढले उट्टे, फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या लढतीत मुंबई सिटीने (Mumbai City) सफाईदार खेळ केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या गतमोसमात ‘गोल्डन बूट’ मानकरी ठरूनही एफसी गोवाने अनुभवी इगोर आंगुलो (Igor Angulo) याला वगळले. त्या मानहानीचे उट्टे स्पॅनिश स्ट्रायकरने सोमवारी सव्याज काढले. गतविजेत्या मुंबई सिटीने (Mumbai City) 3-0 फरकाने मिळविलेल्या एकतर्फी विजयात त्याने दोन गोल केले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या लढतीत मुंबई सिटीने सफाईदार खेळ केला. एफसी गोवास अजिबात सूर गवसला नाही. इगोर आंगुलो याने 33व्या मिनिटास पेनल्टीवर आणि नंतर 36व्या मिनिटास मैदानी गोल नोंदविल्यामुळे एफसी गोवाची आयएसएल स्पर्धेतील 15 सामन्यांची अपराजित मालिका तुटली. मुंबई सिटीचा तिसरा गोल बदली खेळाडू ब्राझीलियन योर कातातौ याने 76व्या मिनिटास केला. गतमोसमात मुंबई सिटीकडून प्ले-ऑफच्या दुसऱ्या टप्प्यात पेनल्टी शूटआऊटवर पराभूत झालेला एफसी गोवा संघ आजच्या सामन्यापूर्वी निर्धारित वेळेतील खेळात अपराजित होता. नवे प्रशिक्षक डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलाच सामना खेळणाऱ्या गतविजेत्या मुंबई सिटीने विजयी सलामी देत पूर्ण तीन गुण प्राप्त केले.

परिणामकारक आंगुलो

एफसी गोवातर्फे गतमोसमात 37 वर्षीय इगोर आंगुलोने 14 गोलसह आयएसएल स्पर्धेत गोल्डन बूटचा मान मिळविला होता. मात्र नंतर एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी आंगुलोस संघातून वगळले. त्यामुळे स्पॅनिश खेळाडू कमालीचा नाराज झाला होता. नव्या मोसमासाठी एफसी गोवाने ऐराम काब्रेरा या नव्या स्पॅनिश आघाडीपटूस प्राधान्य दिले, तर आंगुलोने भारतातच खेळण्याचे ठरविताना मुंबई सिटीशी करार केला. यंदाच्या आयएसएलमधील पहिल्याच लढतीत तो परिणामकारक ठरला. दोन गोल नोंदवत त्याने उपयुक्तता सिद्ध केली आणि एफसी गोवासह तोडीस तोड प्रत्युत्तर दिले.

उपयुक्त सुपर सब

मुंबई सिटीसाठी ब्राझीलियन योर कातातौ सुपर सब ठरला. 73 मिनिटास प्रशिक्षक बकिंगहॅम यांनी ब्राझीलच्याच कॅसियो गॅब्रिएल याला माघारी बोलावत कातातौ याला संधी दिली. तीन मिनिटांतच 26 वर्षीय आघाडीपटूने निवड सार्थ ठरविताना पहिला आयएसएल गोल नोंदविला. सेटपिसेसवर त्याने अफलातून हेडिंग साधत मुंबई सिटीची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. मोरोक्कन अहमद जाहूच्या झंझावाती फ्रीकिकवर पहारा नसलेल्या कातातौ याने हेडिंग साधले, यावेळी गोलरक्षक धीरज डावीकडे झेपावला, चेंडू अडविण्याचा त्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला.

मुंबई सिटीचे पूर्वार्धात दोन गोल

पूर्वार्धात मुंबई सिटीने आक्रमणावर भर देत एफसी गोवास नामोहरम केले. त्यामुळे हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा बचाव दबावाखाली आला, त्यांच्याकडून चुका झाल्या. सामन्याच्या तेराव्या मिनिटास पेनल्टीचे अपिल मान्य झाले असते, तर मुंबई सिटीपाशी फार लवकर आघाडी जमा झाली असती. यावेळी एफसी गोवाच्या लिअँडर डिकुन्हा याने गोलक्षेत्रात मुंबई सिटीच्या विग्नेश दक्षिणमूर्ती याला धोकादायक टॅकल केले होते. यावेळी झालेल्या दुखापतीमुळे 17व्या मिनिटास विग्नेश याला मैदान सोडावे लागले व त्याची जागा महम्मद राकिप याने घेतली. मात्र अर्ध्या तासाच्या खेळानंतर मुंबई सिटीने पेनल्टी फटक्यावरच आघाडी घेतली. एफसी गोवाचा स्पॅनिश बचावपटू इव्हान गोन्झालेझ याने मुंबई सिटीच्या कॅसियो गॅब्रिएल याला पाडल्यानंतर रेफरी ए. रोवन यांनी पेनल्टीची खूण केली. अनुभवी इगोर आंगुलोने अचूक फटका मारताना गोलरक्षक धीरज सिंग याचा अंदाज चुकविला. तीन मिनिटानंतर रेनियर फर्नांडिसच्या शानदार असिस्टवर आंगुलोने डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर मुंबई सिटीस 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.

दीर्घ काळानंतर विजय

- मुंबई सिटीचा एफसी गोवावरील यापूर्वीचा विजय 1394 दिवसांपूर्वी. 28 जानेवारी 2018 रोजी मुंबईच्या संघाचा 4-3 फरकाने विजय

- आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचा यापूर्वी पराभव चेन्नईयीन एफसीविरुद्ध 19 डिसेंबर 2020 रोजी फातोर्डा येथे 1-2 फरकाने, तब्बल 338 दिवसानंतर पराजित

- आयएसएल स्पर्धेत निर्धारित वेळेतीस सामन्यात 5 विजय, 10 बरोबरीनंतर एफसी गोवाची पहिली हार

- 19 आयएसएल लढतीत मुंबई सिटीचे एफसी गोवावर 7 विजय, अन्य 7 लढतीत पराभव, तर 5 बरोबरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT