महिला विश्वचषक 2022 शुक्रवारपासून न्यूझीलंडमध्ये सुरु होत आहे. गेल्या वेळी टीम इंडिया विजयापासून एक पाऊल दूर होती. परंतु यावेळी मिताली राजच्या टीम इंडियाला पहिल्यांदाच चॅम्पियन बनायला नक्कीच आवडेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंडचेही (England) जेतेपदाकडे डोळे लागले असून यजमान न्यूझीलंडही (New Zealand) विश्वविजेतेपदाचा मोठा दावेदार आहे. कोरोनामुळे वर्षभरानंतर आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा बायो बबलमध्ये सहा ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. तसेच ही लीग फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. ज्यामध्ये आठ संघ एकमेकांशी भिडतील. ज्यापैकी अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. भारत 2005 आणि 2017 मध्ये उपविजेता राहीला आहे. यातच टीम इंडिया (Team India) कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. तर 2000 मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या न्यूझीलंडचा स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजशी सामना होईल. (India Has A Chance To Win The Women's World Cup 2022)
दरम्यान, सहा वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिल्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडशी सामना होणार आहे. इंग्लंडने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. एक महिना चालणाऱ्या या स्पर्धेत अनुभवी आणि युवा खेळाडू आपले कौशल्य दाखवतील. मिताली, झुलन गोस्वामी, सुझी बेट्स आणि मेगन शुट सारख्या खेळाडूंना त्यांच्या चमकदार कारकिर्दीला एक नवीन आयाम द्यायचा आहे, तर शेफाली वर्मा, ऋचा घोष, फ्रॅन जोन्स आणि डार्सी ब्राउन सारख्या नवख्या खेळाडूंना आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक असतील.
ऑस्ट्रेलिया जेतेपदाचा दावेदार
ऑस्ट्रेलियाचा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. गतवेळच्या उपांत्य फेरीत भारताकडून झालेला पराभव विसरुन तो नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी केली आहे. याचा अंदाज यावरुन लावता येतो की, 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये गेल्या 30 सामन्यांपैकी केवळ एकच सामना त्यांनी गमावला आहे. 2009 पासून विश्वचषकात छाप पाडणारी अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी शानदार फॉर्ममध्ये आहे. अॅलिसा हिली, मेग लॅनिंग, पेरी आणि बेथ मुनी या खेळाडूंच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ खूप मजबूत दिसत आहे.
भारतीय संघ पहिलं जेतेपद पटकावणार?
भारताला अद्याप विश्वचषक जिंकता आलेला नाही. गतवेळच्या उपविजेत्या संघाला यावेळी आणखी एक पाऊल पुढे टाकायचे आहे. दुसरीकडे मिताली आणि झुलनचा हा शेवटचा विश्वचषक असणार आहे. जो त्यांना संस्मरणीय बनवायचा आहे. न्यूझीलंडविरुद्धचे पहिले चार वनडे हरल्यानंतर पाचव्या सामन्यात भारताचे दमदार पुनरागमन झाल्याने त्यांचे मनोधैर्य उंचावायला हवे होते. मिताली आणि झुलनच्या भूमिका निर्णायक असतील परंतु फॉर्ममध्ये असलेल्या ऋचा घोष, सलामीवीर स्मृती मनधंना आणि अनुभवी हरमनप्रीत कौर यांची शानदार कामगिरी भारतासाठी खूप महत्त्वाची ठरेल अशी शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.