Rohit Sharma on Dasun Shanaka run out: भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीमधील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 67 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात मोहम्मद शमीने श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाला नॉन-स्ट्रायकर एंन्डला धावबाद केल्याची बरीच चर्चा झाली. आता यावर भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
झाले असे की श्रीलंकेच्या डावातील 50 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजीसाठी आला होता. त्याने या षटकातील चौथा चेंडू टाकणार होता, त्यावेळी शनका 98 धावांवर नाबाद असताना नॉन-स्ट्रायकर एंन्डला होता आणि कसून रजिता फलंदाजी करत होता. पण शमीने हा चेंडू टाकण्यापूर्वीच शनाकाने क्रीज सोडली असल्याने त्याने चेंडू स्टंपला लावून त्याला धावबाद केले.
मात्र, शनाकाला 98 धावांवर असताना अशाप्रकारे बाद करणे रोहित शर्माला पटले नाही आणि त्याने मध्यस्थी करत बादचे अपील मागे घेतले आणि शनाकाला फलंदाजीसाठी परत बोलावले. त्यामुळे नंतर शनाकाने आपले शतक पूर्ण केले. तो 108 धावांवर नाबाद राहिला.
या घटनेबद्दल रोहितने सामन्यानंतर सांगितले की 'मला माहित नव्हते, की शमीने असे केले आहे. तो 98 धावांवर खेळत होता. त्याला आम्ही असे बाद नाही करू शकत, जसे शमीने केले होते. शनाका चांगली फलंदाजी करत होता. अशा परिस्थितीत आमची इच्छा नव्हती की त्याला अशाप्रकारे बाद केले जावे.'
दरम्यान, शनाकाचे जरी शतक झाले असले तरी श्रीलंकेला भारताने दिलेल्या 374 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 50 षटकात 8 बाद 306 धावा करता आल्या.
शनाकाव्यतिरिक्त श्रीलंकेकडून पाथम निसंकाने 72 धावांची खेळी केली. तसेच धनंजयडी सिल्वाने 47 धावांचे योगदान दिले. पण अन्य फलंदाजांना फार काही खास करता आले नाही. भारताकडून उमरान मलिकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून विराट कोहलीने 113 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच रोहित शर्माने 83 आणि शुभमन गिलने 70 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे भारताने 50 षटकांत 7 बाद 373 धावा केल्या. श्रीलंकेकडून कसून रजिताने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.