Gujarat Titans Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Qualifier: मुंबईला पराभूत करत गुजरात फायनलमध्ये! गिलची सेंच्यूरी अन् मोहितची बॉलिंग रोहितसेनेला भारी

आयपीएल 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

Pranali Kodre

IPL 2023 Qualifier 2, Gujarat Titans vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी (26 मे) गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने 62 धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे.

गुजरात टायटन्स सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. यापूर्वी गुजरातने 2022 आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सविरुद्ध अंतिम सामन्यात विजय मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली होती.

आता यावर्षी गुजरात टायटन्सला अंतिम सामन्यात चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना करायचा आहे. हा सामना रविवारी होणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचे मात्र 6 वे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न यंदा भंगले आहे.

दरम्यान बुधवारी झालेल्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरातने प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलने 129 धावांच्या जोरावर 20 षटकात 3 बाद 233 धावा केल्या होत्या. त्यानंतर 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 18.2 षटकात सर्वबाद 171 धावाच करता आल्या. गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून इम्पॅक्ट प्लेअर सब्स्टिट्यूट नेहल वढेरा आणि कर्णधार रोहित शर्मा उतरला. ईशान किशनला क्षेत्ररक्षणावेळी डोळ्याला ईजा झाल्याने तो फलंदाजीला उतरला नाही. पण मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.

नेहल वढेराला पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने 4 धावांवर बाद केले. त्यानंतर कॅमेरॉन ग्रीन फलंदाजीला आलेला. पण दुसऱ्याच षटकात त्याला हार्दिक पंड्याने टाकलेला चेंडू हाताला लागला. त्यामुळे तो मैदानातून बाहेर गेला होता. त्यामुळे सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. पण रोहितला 8 धावांवर शमीने बाद केले.

मात्र, त्यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरताना चांगली फलंदाजी केली. या दोघांनीही आक्रमक खेळ करत अर्धशतकी भागीदारीही केली. त्यांनी 6 षटकांच्या आतच मुंबईला 70 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र, 6 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राशिद खानने तिलकला 43 धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर ग्रीन पुन्हा फलंदाजीसाठी उतरला.

त्यानंही सूर्यकुमारला चांगली साथ दिली. या दोघांनीही मुंबईचा डाव पुढे नेत आशा उंचावल्या होत्या. पण ग्रीनला 12 व्या षटकात 30 धावांवर जोशुआ लिटिलने त्रिफळाचीत केले. त्यानंतर ईशान किशनच्या ऐवजी कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून विष्णू विनोद फलंदाजीला उतरला होता. त्याने सूर्यकुमारची साथ देण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमारने यादरम्यान अर्धशतकही पूर्ण केले.

त्यावेळी गुजरातला सूर्यकुमार धोकादायक ठरत होता. पण याच मोक्याच्या क्षणी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने मोहित शर्माकडे चेंडू सोपवला. मोहितनेही हा विश्वास सार्थकी लावताना या षटकाचा तिसरा चेंडू फुल लेंथला टाकत सूर्यकुमारला त्रिफळाचीत केले. सूर्यकुमारने 38 चेंडूत 61 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले.

सूर्यकुमारला बाद केल्यानंतर याच षटकात 5 व्या चेंडूवर मोहितने विष्णू विनोदलाही 5 धावांवर माघारी झाडले. यानंतर मात्र, मुंबई इंडियन्सची खालची फळी फार वेळ तग धरू शकली नाही. 16 व्या षटकात राशिदने टीम डेव्हिडला 2 धावांवर बाद केले.

यानंतर उर्वरित ख्रिस जॉर्डन (2) पीयुष चावला (0) आणि कुमार कार्तिकेय (6) यांच्या विकेट्स मोहितने घेत मुंबईचा डाव संपुष्टात आणला. या सामन्यात मोहितने 2.2 षटकात 10 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तसेच राशिद खान आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जोशुआ लिटिलने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही रचली. मात्र, 54 धावांची भागीदारी झाली असताना साहा 18 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर साई सुदर्शनने शुभमन गिलची चांगली साथ दिली.

एका बाजूने गिलने आक्रमक पवित्रा स्विकारलेला असताना दुसऱ्या बाजूने सुदर्शनने त्याला संयमी साथ दिली होती. त्यांनी शतकी भागीदारीही केली. यादरम्यान गिलने त्याचे तिसरे आयपीएल शतक पूर्ण केले. पण शतकानंतर तो १७ व्या षटकात बाद झाला. गिलने 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांसह 129 धावा केल्या.

तो बाद झाल्यानतंर हार्दिक आणि सुदर्शनने डाव पुढे नेला. मात्र 19 व्या षटकानंतर सुदर्शन रिटायर्स आऊट होत मैदानातून बाहेर गेला. त्याने 31 चेंडूत 43 धावांची खेळी केली. तो बाहेर गेल्याने राशिद खान फलंदाजीला आला.

अखेरच्या षटकात हार्दिक आणि राशिदने मिळून 19 धावा चोपल्या. हार्दिक 28 धावांवर आणि राशिद 5 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 233 धावा केल्या. मुंबईकडून पीयुष चावला आणि आकाश मधवाल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Beef Smuggling: नावेलीत बेकायदा कत्तलखान्याचा पर्दाफाश, 700 किलो गोमांस जप्त! एकाला अटक

Goa Police: पोलिस दलात मनुष्यबळ कमी, उच्च न्यायालयाची स्वेच्छा दखल; जनहित याचिकेवर 7 रोजी सुनावणी

National Film Awards Winners List: 71 व्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'ट्वेल्थ फेल' सर्वोत्तम चित्रपट, 'नाळ-2'चाही यथोचित सन्मान

Goa Public University Bill: 'सार्वजनिक विद्यापीठे' स्थापनेचा मार्ग सुकर, ऐतिहासिक बदलांसाठी विधेयक सादर

Goa Assembly: कोळशाचा विषय पुन्‍हा पेटला, मुख्‍यमंत्री-सिक्‍वेरांच्‍या उत्तरातील तफावतीमुळे विरोधकांचा हंगामा! कामकाज 10 मिनिटं स्‍थगित

SCROLL FOR NEXT