Goa Police Cup : गतविजेते पणजी फुटबॉलर्स, माजी विजेते स्पोर्टिंग क्लब द गोवा व वास्को स्पोर्टस क्लब यांच्या अनुपस्थितीत 18 व्या गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेस 22 ऑगस्टपासून खेळली जाईल. या स्पर्धेद्वारे गोव्यातील 2022-2023 फुटबॉल मोसमालाही अधिकृतपणे सुरुवात होईल.
यंदा स्पर्धेत गोवा प्रो-लीगमधील सहा, प्रथम विभागीय पाच व द्वितीय विभागीय एक मिळून 12 संघांत चुरस असेल. स्पर्धा बाद फेरी पद्धतीने खेळली जाईल. पहिला सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सेंट अँथनी मार्ना व धेंपो ज्युनियर्स या संघांत खेळला जाईल. धेंपो स्पोर्टस क्लब, चर्चिल ब्रदर्स, साळगावकर एफसी व सेझा फुटबॉल अकादमी यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. सामने पर्रा, एला-जुने गोवे, शिरसई येथील मैदानावरही होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 8 सप्टेंबर रोजी धुळेर येथे खेळला जाईल.
स्पर्धेचा ड्रॉ मंगळवारी काढण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक (क्रीडा) बॉस्को जॉर्ज, पोलिस अधिकारी विल्सन डिसोझा, अमित बोरकर, जितेंद्र सिनारी, जीएफए रेफरी मंडळाचे प्रमुख फ्रँकी फर्नांडिस यांची उपस्थिती होती.
...म्हणून स्पर्धेतून माघार
गोवा पोलिस कप स्पर्धा आयोजन समितीच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गतविजेता पणजी फुटबॉलर्स, स्पोर्टिंग क्लब, वास्को क्लब यांची मोसमपूर्व संघ बांधणी प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही, त्यामुळे त्यांना सहभागी होता आले नाही. याशिवाय आल्बर्ट डेव्हलपर्स संघानेही ऐनवेळी माघार घेतल्यामुळे त्यांच्या जागी पणजीच्या यंग बॉईज ऑफ टोंक (वायबीटी) संघाला सामावून घेण्यात आले.
स्पर्धेची गटवारी
अ गट : धेंपो क्लब, सेंट अँथनी मार्ना, धेंपो ज्युनियर्स
ब गट : चर्चिल ब्रदर्स, शापोरा युवक संघ, एफसी गोवा
क गट : साळगावकर एफसी, यंग बॉईज ऑफ टोंक, गोवा पोलिस
ड गट : सेझा फुटबॉल अकादमी, वेळसाव क्लब, यूथ क्लब ऑफ मनोरा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.