पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या कोलकाता ‘डर्बी’त शनिवारी ATK मोहन बागानचेच वर्चस्व राहिले. सामन्याच्या पहिल्या 23 मिनिटांत तीन गोल नोंदवून गतउपविजेत्यांनी ईस्ट बंगालला 3-0 फरकाने सहजपणे हरविले. सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला.
फिजी देशाच्या रॉय कृष्णाने सलग दुसऱ्या लढतीत गोल करताना 12व्या मिनिटास ATK मोहन बागानला आघाडी मिळवून दिली. नंतर मानवीर सिंग याने 14व्या मिनिटास संघाची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. त्याचा हा यंदाचा पहिला गोल ठरला. गोमंतकीय लिस्टन कुलासो यानेही सलग दुसऱ्या लढतीत गोल करताना 23व्या मिनिटास एटीके मोहन बागानची आघाडी 3-0 अशी मजबूत केली.
अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. त्यांचे आता सहा गुण झाले आहेत. अगोदरच्या लढतीत त्यांनी केरळा ब्लास्टर्सला 4-2 फरकाने हरविले होते. स्पर्धेतील पहिल्या लढतीत जमशेदपूर एफसीला 1-1 बरोबरीत रोखलेल्या मानोलो डायझ यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालला मोसमातील पहिला पराभव पत्करावा लागला.
ISL स्पर्धेतील कोलकाता डर्बीत गतमोसमातील दोन्ही लढती एटीके मोहन बागानने जिंकल्या होत्या. तेव्हा त्यांनी अनुक्रमे 2-0 व 3-1 फरकाने विजय प्राप्त केला होता. शनिवारी हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. कोलकाता डर्बीत दोन्ही संघांतील 372व्या लढतीत एटीके मोहन बागानने 123वा सामना जिंकला. ईस्ट बंगालने 129 विजय नोंदविले आहेत.
प्रीतम कोटलच्या असिस्टवर रॉय कृष्णाने ISL कारकिर्दीतील आपला 31वा गोल नोंदविला. मानवीर सिंगने रचलेल्या चालीवर प्रीतम कोटलला चेंडू मिळाला. त्याने नंतर रॉय कृष्णा याला गोल करण्याची संधी उपलब्ध करून दिली. फिजी देशाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूने (International players) शानदार व्हॉलीवर लक्ष्य साधले.
दोन मिनिटानंतर फिनलँडचा विश्वकरंडक खेळाडू जॉनी कौको याच्या अप्रतिम असिस्टवर मानवीरने सणसणीत फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्या याला चेंडूच्या वेगाचा अंदाज येऊ दिला नाही. नंतर गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्याच्या चुकीचा लाभ उठवत लिस्टन कुलासोने एटीके मोहन बागानची स्थिती आणखीनच भक्कम केली. लिस्टनला रोखण्याच्या नादात अरिंदम आपली जागा सोडून पुढे आला, त्याला लाभ गोमंतकीय आघाडीपटूने वेळीच उठवत आयएसएल स्पर्धेतील वैयक्तिक सहावा गोल केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.