French Open 2023, Carlos Alcaraz vs Novak Djokovic Semi-Final: पॅरिसमध्ये सध्या फ्रेंच ओपन 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पुरुष एकेरीमधील शुक्रवारी अव्वल मानांकित कार्लोस अल्कारेझ विरुद्ध सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा नोवाक जोकोविच यांच्यात उपांत्य फेरीचा सामना पार पडणार आहे. या सामन्याकडे सध्या टेनिसप्रेमींचे लक्ष लागलेले आहे.
सार्बियाचा नोवाक जोकोविच 23 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या इराद्याने ही स्पर्धा खेळत आहे, तर 20 वर्षीय अल्कारेजची नजर दुसऱ्या ग्रँडस्लॅमवर आहे. या दोघांपैकी शुक्रवारी जो जिंकेल, तो अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे.
दरम्यान, या सामन्याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे कारण, टेनिस जगतात बिग थ्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि जोकोविच या तिकडींपैकी फेडररने निवृत्ती घेतली आहे, तसेच नदाल दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे फ्रेंच ओपनमध्ये बिग थ्रीचे वर्चस्व राखण्याची जबाबदारी सध्या जोकोविचवर आहे.
पण, त्याला सध्या टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला स्पेनचा अल्कारेज आव्हान देऊ शकतो. अल्कारेजने यापूर्वी जोकोविचविरुद्ध मद्रिद ओपन 2022 मध्ये सामना खेळला आहे. त्यावेळी त्याने जोकोविचला 6-7(5), 7-5, 7-6(5) अशा फरकाने मात दिली होती. तसेच अल्कारेजकडे भविष्यातील स्टार खेळाडू म्हणूनही पाहिले जात आहे.
शुक्रवारी होणाऱ्या सामन्याबद्दल तिसरा मानांकित नोवाक जोकोविच म्हणाला, 'माझ्यासाठी नक्कीच मोठे आव्हान आहे. जर तुम्हाला सर्वोत्तम व्हायचे असेल, तर तुम्हाला सर्वोत्तम खेळाडूलाच पराभूत करावे लागते. अल्कारेज नक्कीच असा खेळाडू आहे, ज्याला तुम्हाला पराभूत करण्याची इच्छा असेल.'
तसेच जोकोविच पुढे म्हणाला, 'तो त्याला खूप चांगले सांभाळतो. तो कोर्टबाहेर आणि आत खूप चांगला व्यक्ती आहे, यात काही शंका नाही. तो मैदानावर जिद्दीने खेळ करतो. त्याच्याकडे पाहून मला त्याच्याच देशाकडून डाव्या हाताने खेळणाऱ्या खेळाडूची (राफेल नदाल) आठवण होते. तो यशासाठी पात्र आहे, तो मेहनत करत आहे आणि केवळ 19-20 व्या वर्षीच परिपूर्ण खेळाडू झाला आहे.'
दरम्यान, अल्कारेजने फ्रेंच ओपन 2023 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित स्टिफानोस त्सित्सिपासला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तसेच जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीत कारेन खाचानोव याला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे.
फ्रेंच ओपन 2023 स्पर्धेतील पुरुष एकेरीचा उपांत्य फेरीतील दुसरा सामना कॅस्पर रुड विरुद्ध ऍलेक्झँडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. यांच्यातील जो खेळाडू विजय मिळवेल, तो जोकोविच आणि अक्लारेझ यांच्यातील विजेत्या खेळाडूशी रविवारी अंतिम सामना खेळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.