भारतात सध्या वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा रंगतेय. जसजसे सामने होत आहेत, तसतशी स्पर्धेलाही रंगत चढू लागली आहे. चाहतेही स्टेडियमकडे हळुहळू का होईना, पण वळताना दिसतायेत. दरम्यान, याच वर्ल्डकपमध्ये यजमान भारतीय संघानेही भन्नाट सुरूवात केली आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात तर भारताच्या कर्णधार रोहित शर्माने केलेल्या शतकाने तर अक्षरश: मैफील लुटली होती. पण असं असलं तरी या सामन्यात आणखी एक घटना घडली आणि खरंतर बाकी कशाहीपेक्षा या घटनेची चर्चा अधिक झाली. ही घटना म्हणजे विराट कोहली आणि नवीन उल हक यांचं आयपीएलमधलं भांडण वर्ल्डकपच्या सामन्यात मिटलं. खरंतर या दोन्ही खेळाडूंनी ते मिटवलं. ही घटना बरंच काही सांगून जाणारी होती.
आता आधी या घटनेची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ. आयपीएल २०२३ हंगामात १ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघात सामना झाला. हा सामना प्रचंड गाजला , पण त्याला कारण कोणत्याही खेळाडूच्या खेळापेक्षा खेळाडूंमधील झालेलं भांडण होतं, ही खरंतर दुर्दैवाची गोष्ट. त्या सामन्यात बेंगलोरचा स्टार खेळाडू विराट आणि लखनऊचा खेळाडू नवीन अन् मेंटर गौतम गंभीर भिडले. मैदानातच त्यांची चांगलीच बाचाबाची झाली. त्यांना नंतर दंड करत बीसीसीआयने फटकारलं देखील.
पण तरी हे प्रकरण इथेच थांबलं नाही. विराट आणि नवीन यांच्याकडून सोशल मीडिया पोस्ट द्वारे युद्ध सुरू राहिलं. नवीननेही काही स्टेटमेंट दिले. पण त्याचा परिणाम मात्र खोलवर दिसला. विराटची फॅन फॉलोविंग तगडी आहे, त्यामुळे त्याला चाहत्यांचा पाठींबा मिळणार, हे निश्चित होते. मात्र, इथेच चाहत्यांकडून मात्र पातळी सोडण्यात आली. विराट-नवीन-गंभीर वादाची ठिणगी चाहत्यांमध्येही पडली. चाहते नवीन आणि गंभीरला दिसतील तिथे ट्रोल करू लागले, खिल्ली उडवू लागले.
त्याचमुळे या वादाचं गालबोट वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत होणाऱ्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यालाही लागणार का अशी शंका होतीच. त्याची सुरुवातही झालेली. नवीन दिसताच प्रेक्षकांकडून कोहलीच्या नावाचा नारा देणं सुरू झालं, इतक्यावरच हे थांबलं नाही. विराट फलंदाजी करत असतानाही नवीनला प्रेक्षकांकडून ट्रोल करण्यात आलं.
त्यानंतर मात्र, विराट पुढे आला आणि त्याने प्रेक्षकांना अशा गोष्टी न करण्याबद्दल बजावलं. इतकंच नाही, तर सामन्यावेळी विराट आणि नवीन यांनी एकमेकांबरोबरचं भांडण मिटवत एकमेकांची गळाभेट घेतली. सामन्यानंतर नवीनही म्हणाला, जे होतं, ते मैदानात होतं. पण आता प्रश्न उभा राहातो, तो म्हणजे सध्याचं युग हे सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे जे होतं ते फक्त मैदानापुरतं मर्यादीत राहत नाही, हे देखील तितकेच खरे आहे.
तर, सांगण्याचा मुद्दा असा की भांडण झाल्यानंतर चाहत्यांवर त्याचा परिणाम दिसला आणि ते दुसऱ्या खेळाडूंना ट्रोलही करू लागले. पण त्याचवेळी जेव्हा याच खेळाडूंनी समोर चाहत्यांसमोरच भरलेल्या स्टेडियममध्ये आणि लाखो-करोडो लोक टीव्ही-मोबाईलवर लाईव्ह सामना पाहत असताना एकमेकांची गळाभेट घेत भांडण मिटवलं, त्याचं कौतुकही मोठ्या प्रमाणात झालं.
त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या भांडणापेक्षा नंतर त्यांनी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचं कौतुक अधिक झालं. यापुढे नवीनला ट्रोल करताना अनेकजण या घटनेचा विचार नक्कीच करतील, अर्थात काही अपवाद असतीलच. पण तरी त्याचा परिणाम चाहत्यांवर लगेचच दिसून आला.
चार वर्षांपूर्वीची घटनेचीही चर्चा
आणखी एक उदाहरण द्यायचे झालेच, तर याच घटनेमुळे आणखी एक घटना चर्चेत आली होती. ही घटना आहे २०१९ वर्ल्डकपमधली. 2019 वर्ल्डकपमध्ये स्टिव्ह स्मिथ चेंडू छेडछाडीच्या प्रकरणामुळे आलेली बंदी पूर्ण करून पुनरागमन करत होता. त्यावेळी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान स्मिथची त्या प्रकरणावरून प्रेक्षकांकडून टिंगल केली जात होती.
त्यावेळीही विराटने पुढे येत प्रेक्षकांना असे न करण्याबद्दल सांगितले होते. त्यामुळे विराट आणि स्मिथ यांचे अनेक वर्षांपूर्वी बिघडलेले संबंध सुधारल्याचे दिसून आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी विराटने केलेल्या या कृतीला २०१९ मधील सर्वोत्तम खिलाडूवृत्ती म्हणून आयसीसीचा पुरस्कारही मिळाला होता. बरं हा पुरस्कार देताना आयसीसीकडून चाहत्यांची मतंही लक्षात घेतली जातात बरं का.
वॉर्नरनंही पुन्हा जिंकलं मन...
अजून अशी बरीच उदाहरणं घेता येतील. डेव्हिड वॉर्नर, बऱ्याच भारतीय चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू. तो सामन्यात खेळताना त्याचे सर्वस्व लावून खेळतो, पण जेव्हा क्रिकेटव्यतिरिक्त तो मजा-मस्ती आणि त्याच्या विनोदी व्हिडिओमुळे चर्चेत असतो. त्याचाही परिणाम दिसतो, त्यामुळे त्याला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रेमही मिळते.
त्याने चूका केल्या नाहीत का, तर केल्या. पण त्यातून तो बाहेरही आला आणि त्याने ती परिस्थिती हाताळत चाहत्यांचे मनही जिंकले. त्याने त्याचा परिणाम त्याच्या मैदानाबाहेरच्या गोष्टींवर होऊ दिला नाही.
अशीच गोष्ट सचिन तेंडुलकर, एबी डिविलियर्स, केन विलियम्सन, युवराज सिंग, एमएस धोनी, सौरव गांगुली आणि अजून बरेच क्रिकेटर, यांच्यातील कित्येकांची भांडणं झालीही असतील, पण बऱ्याचदा ती मैदानापुरती मर्यादीत राहिली आणि त्याचमुळे त्याचा परिणामही तेवढाच सिमीत राहिला.
न्यूझीलंडने मिळवलं आदराचं स्थान
आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे न्यूझीलंड संघ. २०११ वर्ल्डकपचे सेमीफायनालिस्ट, २०१५ आणि २०१९ वर्ल्डकपचे फायनालिस्ट. २०१९ ला तर हातातोंडाशी आलेला घास त्यांच्याकडून हिसकावण्यात आला, पण तरीही त्या संघाने दाखवलेली कमालीची शांतता खूप परिणाम कारक ठरली. कुठेही आरडा-ओरडा नाही की आरोप-प्रत्यारोप नाहीत.
नियमानुसार लागलेला निकाल त्यांनी शांतपणे स्विकारला. त्याच्या संघात १५ खेळाडू होते, त्यांचे स्वभावही वेगवेगळे असतील, पण तरीही त्यांनी कमालीची शांतता ठेवली. त्यांचं हेच वागणं चाहत्यांवर खोलवर परिणामही करून गेलं, तो संघ जिथे गेला, तिथे त्यांना सन्मान प्राप्त झाला.
छेत्रीची आर्त साद...
फक्त क्रिकेटच कशाला काही वर्षांपूर्वीचीच गोष्ट फुटबॉल तसा भारतात फारसा लोकप्रिय खेळ नाही, पण तरी युरोपियन आणि अमेरिकन फुटबॉल पाहाणार मोठा चाहतावर्ग भारतात आहे. असे असताना भारतातील सामन्यांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती.
त्यावेळी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने आर्त साद घातली होती. त्याने साधारण ३-५ मिनिटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला होता की त्याच्या पुढच्याच सामन्यांना स्टेडियम हाऊसफुल भरले होते.
नीरजचा नम्रपणा...
नीरज चोप्रा, भारताचा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता खेळाडू. त्याच्या छोट्या—ोट्या कृतीतून अनेक चाहत्यांचं मन जिंकतो. कृती अगदी छोटी असते, पण परिणाम मोठा घडवते.
उदाहरणच द्यायचं झालं, तर त्याने वर्ल्डचॅम्पियनशीप जिंकल्यानंतर याच स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमला फोटोसाठी जवळ बोलावले होते. त्यावेळी नदीमकडे त्याचा पाकिस्तानचा झेंडा नव्हता, तरी नीरजने त्याला आदर देत आपल्या जवळ फोटो काढायला बोलावले होते. त्यानंतर त्याने एका चाहत्याला तिरंग्यावर स्वाक्षरी करण्यासाठी नम्रपण दिलेला नकार, या गोष्टी छोट्या असतात, पण परिणाम करणाऱ्या असतात.
खेळाडू अन् चाहते दोघांचीही जबाबदारी समानच
अखेर सांगण्याचा मुद्दा हाच की सध्या सोशल मीडियाचं युग आहे, इथे कोणतीही कृती लगेच टीपली जाते. त्यामुळे खेळाडूंनी थोडं भान ठेवून वागणूक ठेवावी आणि कोणत्याही गोष्टीचं भांडवल होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, याचा अर्थ असा अजिबातच नाही की खेळाडूंनी आपला स्वभाव बदलावा, पण काही गोष्टी या मैदानातच राहतील, त्या बाहेर जाणार नाहीत, याची दक्षताही घ्यावी. परिस्थितीत पाहून गोष्टी हाताळाव्यात.
पण ही काही एकट्या खेळाडूची जबाबदारी नाही, तर ती चाहत्यांचीही आहे. चाहत्यांनीही खेळाडूंच्या त्या त्या भावना-कृती यांचा थोडा समजून-उमजून अर्थ काढायला हवा. खेळाडूला प्रोत्साहन द्या, खेळाडू चूकला, तर त्याला ट्रोलही करा, टीकाही करा, पण हे सर्व करताना त्या खेळाडूचा अपमान, तर होत नाही ना, याची काळजी घ्यायला हवी, कारण टीका करणं आणि अपमान करणं यात एक सुक्ष्म रेष असते आणि ती ओलांडता कामा नये.
आणखी एक मुद्दा इथे अधोरेखित करण्यासारखा आहे, खेळाडू हा सुद्धा एक माणूस असतो, त्यामुळे त्याच्याकडूनही चूका होणार हे लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. चाहत्यांच्या वागण्याचा परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवरही होताना दिसू शकतो. खेळाडूच्या आयुष्यात चाहते हा त्याच्या कारकिर्दीतील फार मोठा भाग असतो, त्यांचा पाठिंबा त्याला उभारी देत असतो, तर काही चाहत्यांचा त्याला त्रासही होतो. आता ठरवायचं ते चाहत्यांनी की त्या खेळाडूसाठी चांगली आठवण बनायचं की त्याच्यासाठी वाईट अनुभव ठरायचं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.