Deepti Sharma 3 wickets for 0 runs in Women's T20I Dainik Gomantak
क्रीडा

Deepti Sharma Record: 7 चेंडू, 3 विकेट्स अन् 0 धावा! दीप्ती शर्माची ऐतिहासिक कामगिरी; महिला T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेत दीप्ती ठरली 'वर्ल्ड नंबर 1'

Most Wickets in Women T20I: महिला आशिया कप 2026 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने विजयी सुरुवात करत थायलंडवर तब्बल 94 धावांनी दमदार विजय मिळवला.

Sameer Amunekar

महिला आशिया कप 2026 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने विजयी सुरुवात करत थायलंडवर तब्बल 94 धावांनी दमदार विजय मिळवला. मात्र या सामन्यातील सर्वात मोठी चर्चा ठरली ती भारताची अनुभवी अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा. आपल्या कारकिर्दीतील 150व्या महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तिने असा पराक्रम केला, ज्यामुळे तिचे नाव जागतिक क्रिकेटच्या इतिहासात नोंदवले गेले आहे. थायलंडविरुद्धच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करत दीप्तीने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

7 चेंडूंत 3 विकेट्स, एकही धाव नाही!

दीप्ती शर्माने थायलंडच्या फलंदाजीची कंबर मोडताना अत्यंत प्रभावी स्पेल टाकला. अवघ्या सात चेंडूंमध्ये तिने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि विशेष म्हणजे या काळात प्रतिस्पर्धी संघाला एकही धाव दिली नाही.

या तीन विकेट्ससह दीप्तीच्या महिला T20I कारकिर्दीतील एकूण विकेट्सची संख्या 171 वर पोहोचली. तिच्या या कामगिरीने भारताच्या विजयातही मोठी भूमिका बजावली. टी-20 क्रिकेटमध्ये धावा न देता तीन किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरल्याचीही नोंद झाली आहे.

थायलंडच्या थिपाचा पुथावोंगला मागे टाकले

या विक्रमापूर्वी महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा मान थायलंडच्या थिपाचा पुथावोंगच्या नावावर होता. तिच्या खात्यात 170 विकेट्स आहेत. दीप्तीने एक विकेटची आघाडी घेत आता अव्वल स्थान मिळवले आहे.

या यादीत रवांडाची हेनरीट इशिमवे 164 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडची स्टार फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन 154 विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर असून हाँगकाँगची कॅरी चान 153 विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.

शेफालीच्या धडाकेबाज सुरुवातीनंतर भारताची घसरण

भारताने फलंदाजी करताना सुरुवातीच्या षटकांत आक्रमक खेळ दाखवला. शेफाली वर्माने वेगवान फलंदाजी करत केवळ 36 चेंडूंमध्ये 64 धावांची खेळी केली. पहिल्या 10 षटकांत भारताने दोन विकेट्सच्या मोबदल्यात 101 धावा केल्याने मोठ्या धावसंख्येची अपेक्षा निर्माण झाली होती.

मात्र त्यानंतर भारतीय फलंदाजीचा डाव अचानक कोसळला. अवघ्या 29 धावांच्या फरकात भारताने सात विकेट्स गमावल्या आणि संघाला 159 धावांपर्यंतच मजल मारता आली. पुढील सामन्यांपूर्वी भारताला मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजीवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

भारतीय गोलंदाजांसमोर थायलंडचा टिकाव लागला नाही

159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडची सुरुवातच खराब झाली. क्रांती गौड आणि नंदनी शर्माने सुरुवातीला महत्त्वाचे धक्के दिले. त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी थायलंडच्या फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवले.

नंदनी शर्माने तीन विकेट्स घेतल्या, तर दीप्तीनेही तीन बळी मिळवत विश्वविक्रमाला गवसणी घातली. थायलंडकडून नन्नापत कोंचारोएनकाईने सर्वाधिक 41 धावा केल्या. मात्र संघातील चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.

94 धावांच्या या मोठ्या विजयासह भारताने महिला आशिया कप 2026 मधील आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली आहे. दीप्ती शर्माच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे हा सामना भारतीय महिला क्रिकेटसाठी विशेष संस्मरणीय ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT