Cristiano Ronaldo: दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या सौदी प्रो लीगमध्ये अल-नासर क्लबकडून खेळत आहे. या लीगमध्ये त्याने आत्तापर्यंत अल-नासरकडून तीन सामने खेळले असून दोन हॅट्रिक साधण्याचीही कामगिरी केली आहे.
त्याने शनिवारी अल-नासरकडून दुसरी हॅट्रिक नोंदवली आहे. शनिवारी अल-नासर संघाचा दमक एफसी विरुद्ध सामना झाला. या सामन्यात अल नासरने 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. हे तिन्ही गोल रोनाल्डोने केले. विशेष म्हणजे हे तिन्ही गोल रोनाल्डोने पहिल्या हाफमध्येच केले.
प्रिन्स सुलतान बिन अब्दुल अझिझ स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच अल-नासरने वर्चस्व ठेवले होते. तरी पहिल्या 18 मिनिटात दोन्ही संघांना गोल करता आले नव्हते. पण 18 व्या मिनिटाला अल-नासरला पेनल्टी मिळाली. त्यावर रोनाल्डोने गोल नोंदवला आणि अल-नासरला खाते उघडून दिले.
त्यानंतर 23 व्या मिनिटाला रोनाल्डोने दुसरा गोलही नोंदवला. उजवीकडून आलेल्या पासवर रोनाल्डोने डाव्या पायाने फुटबॉल प्रतिस्पर्ध्यांच्या नेटमध्ये धाडला. याबरोबरच त्याने अल-नासरला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. यानंतर पहिला हाफ संपण्यात काहीच क्षण शिल्लक असताना 44 व्या मिनिटाला रोनाल्डोने तिसरा गोल नोंदवत हॅट्रिक पूर्ण केली.
रोनाल्डोची ही कारकिर्दीतील 62 वी हॅट्रिक ठरली. त्याने यातील 30 हॅट्रिक वयाची तिशी पार करण्यापूर्वी केल्या होत्या. तर वयाच्या तिशीनंतर त्याने 32 हॅट्रिक नोंदवल्या आहेत.
दरम्यान, पहिल्या हाफमध्ये मिळालेली 3-0 ही मोठी आघाडी दुसऱ्या हाफमध्ये टिकवून ठेवण्यात अल-नासरने यश मिळवले. दुसऱ्या हाफमध्ये त्यांनी दमक एफसीला एकही गोल करू दिला नाही. त्यामुळे अल-नासर या सामन्यात सहज विजयी झाले.
त्यामुळे आता सौदी प्रो लीगमध्ये अल नासर 18 सामन्यांतील 43 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहेत. त्यांच्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर अल-इतिहाद असून त्यांचे 18 सामन्यांत 41 गुण आहेत.
त्याचबरोबर या लीगमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही रोनाल्डो सामील झाला असून तो फेरास अलब्रिकन आणि ओडियन इघालोसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आत्तापर्यंत दोन हॅट्रिकसह एकूण 8 गोल या लीगमध्ये केले आहेत. या यादीत 13 गोलसह अव्वल क्रमांकावर रोनाल्डोचाच संघसहकारी तालिस्का आहे.
आता अल-नासरचा पुढील सामना 3 मार्चला अल बाटीन क्लबविरुद्ध होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.