FC Goa : 38 वर्षीय माजी स्पॅनिश खेळाडू कार्लोस पेना यांची एफसी गोवाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आली आहे. मार्गदर्शक या नात्याने संघाला अव्वल स्थानी पोहोचवणे हेच ध्येय असल्याचे त्यांनी करार स्वीकारल्यानंतर सांगितले.
कार्लोस पेना यांनी 2019-20 मोसमात एफसी गोवाचे कर्णधारपदही भूषविले होते. पेना यांच्यापाशी प्रशिक्षणातील यूईएफए प्रो-लायसन आहे. ते बार्सिलोना अकादमीतून तयार झाले असून 2021-22 मोसमात ते आल्बासिटे बालोम्पी युवा संघाचे प्रशिक्षक होते. (Carlos Pena as the head coach of FC Goa)
'एफसी गोवाचा (FC Goa) मुख्य प्रशिक्षक या नात्याने पुन्हा येताना मला अतीव आनंद होत आहे. एफसी गोवाबाबत निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे ठरले. आल्बासेट, तसेच स्पेनमधील (Spain) इतर संघाकडून मला मोठी ऑफर होती, पण एफसी गोवास मी प्राधान्य दिले', असे पेना यांनी आयएसएल (ISL) संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर सांगितले. मागील दोन मोसमात अनुक्रमे सहाय्यक प्रशिक्षक व प्रशिक्षकपदाची जबाबदारी पेलल्यानंतर आपल्यासाठी आता योग्य संधी प्राप्त झाल्याचे पेना यांनी नमूद केले.
एफसी गोवात आपल्याला सारेजण ओळखत असून संघाला अव्वल स्थानी नेण्याचे ध्येय आहे. येथे आपण मेहनत घेण्यासाठी आणि अधिकाधिक यश प्राप्त करण्यासाठी येत आहे. जबाबदारी स्वीकारण्यासाठी उत्सुक असल्याचे माजी बचावपटूने नमूद केले. एफसी गोवाचे अध्यक्ष अक्षय टंडन यांनी पेना यांचे प्रशिक्षकपदी स्वागत केले आहे. युवा स्पर्धेत आल्बासेटचे प्रशिक्षक या नात्याने पेना यांनी छान काम केले आहे. खेळाडू या नात्याने ते दोन वर्षे आमच्यासोबत होते. या कालावधीत ते संघाचे आदर्शवत खेळाडू बनले. आमच्या क्लबमध्ये प्रशिक्षक या नात्याने परतण्याची पेना यांच्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे टंडन यांनी म्हटले आहे.
गतमोसमात एफसी गोवाची घसरण
2021-22 मोसमात आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नाही. त्यांना अकरा संघांत नववा क्रमांक मिळाला. स्पॅनिश प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी मोसमाच्या मध्यास प्रशिक्षकपद सोडल्यानंतर तांत्रिक संचालक डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघ आयएसएल स्पर्धेत खेळला.
खेळाडू पेना यांची कारकीर्द
- बार्सिलोनाच्या क आणि ब संघाचे प्रतिनिधित्व
- 2010 मध्ये रेयाल व्हालाडोलिड क्लबशी करार, पाच वर्षे प्रतिनिधित्व
- नंतर ओव्हिएदो, गेटाफे, लॉर्सा एफसी संघातर्फे मैदानात
- 2018 साली एफसी गोवाशी करार, 43 सामन्यांत प्रतिनिधित्व
- एफसी गोवा क्लबतर्फे 2018-19 मध्ये आयएसएल उपविजेतेपद, 2019 मध्ये सुपर कप, 2019-20 मध्ये लीग विनर्स शिल्ड विजेते, एएफसी चँपियन्स लीगसाठी पात्रता
प्रशिक्षक कार्लोस पेना
- खेळाडू या नात्याने 2019-20 मोसमाअखेरीस निवृत्ती
- 2020-21 मोसमात लेडा एस्पोर्तियू सीनियर संघाचे सहाय्यक प्रशिक्षक
- 2021-22 मोसमात स्पेनमधील युवा (ज्युव्हेनिल) लीग स्पर्धेत आल्बासिटे बालोम्पी संघाच्या प्रशिक्षकपदी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.