Brian Lara, Carl Hooper gets emotional after West Indies win over Australia at Gabba Test match:
वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने रविवारी (28 जानेवारी) ऑस्ट्रेलिया संघाला त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर पराभवाचा धक्का दिला. 8 धावांनी हा सामना जिंकत वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली.
दरम्यान, वेस्ट इंडिजसाठी हा विजय खूप खास होता. गेल्या 36 वर्षात ऑस्ट्रेलियावा गॅबावर पराभूत करणारा वेस्ट इंडिज भारतानंतरचा दुसराच संघ आहे. वेस्ट इंडिजच्या या विजयानंतर ब्रायन लारा, कार्ल हुपर असे त्यांचे माजी क्रिकेटपटू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते.
वेस्ट इंडिजने तब्बल 27 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना जिंकला. यापूर्वी 1997 साली पर्थवर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते.
दरम्यान, गुरुवारी वेस्ट इंडिजच्या विजयावेळी लारा ऍडम गिलख्रिस्ट आणि इयान स्मिथ यांच्यासह समालोचन करत होता. त्यावेळी जेव्हा वेस्ट इंडिजने विजय निश्चित केला, तेव्हा लाराने आनंदाने गिलख्रिस्टला मिठी मारली. तसेच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचेही दिसले.
यावेळी लारा यांनी समालोचन करताना म्हटले की 'हे अविश्वसनीय आहे. 27 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत केलं आहे. युवा आणि अननुभवी संघानं विजय मिळवला. आज हा वेस्ट इंडिज संघ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट मानाने ताठ उभे आहेत. आज वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी मोठा दिवस आहे.'
तसेच वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू कार्ल हुपरही विजयानंतर खूप भावूक झाले होते. सध्या सोशल मीडियावर लारा आणि हुपर यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
या सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 50.5 षटकात 207 धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात शेमार जोसेफने 7 विकेट्स घेतल्या.
विशेष म्हणजे या डावात गोलंदाजी करण्यापूर्वी जोसेफ दुखापतग्रस्त झाला होता. त्याचा पायाचा अंगठा जखमी झाला होता. पण असे असतानाही त्याने जिद्द दाखवत गोलंदाजी केली आणि ७ विकेट्सही घेतल्या. त्यामुळे जोसेफला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.
या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 108 षटकात सर्वबाद 311 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 53 षटकात 289 धावांवर संपला. त्यामुळे वेस्ट इंडिजला २२ धावांची आघाडी मिळाली.
त्यानंतर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 72.3 षटकात 193 धावांवरच संपला, पण पहिल्या डावातील आघाडीमुळे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचे आव्हान ठेवले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.