पणजी: माजी विजेत्या एटीके एफसीने मोहन बागानशी विलनीकरण झाल्यानंतर सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल विजयी सलामी दिली. उत्तरार्धात फिजी देशाच्या रॉय कृष्णा याने नोंदविलेल्या शानदार गोलच्या बळावर त्यांनी केरळा ब्लास्टर्सला 1-0 फरकाने हरविले आणि पूर्ण तीन गुणांची कमाई केली.
बांबोळीच्या जीएमसी स्टेडियमवर शुक्रवारी संध्याकाळी सामना झाला. या लढतीने तब्बल आठ महिन्यानंतर भारतीय फुटबॉलने कोविड-19 पार्श्वभूमीवर मैदानावर जैवसुरक्षा वातावरणात आणि बंद दरवाज्याआड पुनरागमन केले. पूर्वार्धातील खेळात तीन संधी गमावलेल्या रॉय कृष्णा याने 67व्या मिनिटास गोलशून बरोबरीची कोंडी फोडताना एटीके मोहन बागानला आघाडी मिळवून दिली. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत 15 गोल केलेल्या या 33 वर्षीय आघाडीपटूने प्रतिस्पर्धी गोलरक्षक आल्बिनो गोम्सचा बचाव भेदला. कृष्णा सामन्याचा मानकरी ठरला.
कृष्णाने अगदी जवळून मारलेल्या फटका अडविण्यासाठी आल्बिनो उजवीकडे झेपावला, पण चेंडू त्याच्या ताब्यात येऊ शकला नाही. बदली खेळाडू मानवीर सिंगने डाव्या बाजूने आक्रमण रचले. यावेळी चेंडू रोखण्यात केरळा ब्लास्टर्सचे व्हिन्सेंट गोमेझ व सर्जिओ सिदोन्चा अपयशी ठरले. चेंडू दिशाहीन करण्याच्या प्रयत्नात सिदोन्चा याच्या हेडिंगवर चेंडू कृष्णाच्या दिशेने गेला व त्याने सणसणीत फटक्यावर संधी साधली. सामना संपण्यास आठ मिनिटे असताना प्रशिक्षक अंतोनियो हबास यांनी कृष्णास विश्रांती देताना ऑस्ट्रेलियन डेव्हिड विल्यम्स याला मैदानात पाठविले.
कृष्णाने पूर्वार्धात गमावल्या संधी
सामन्याच्या पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दीर्घ काळानंतर फुटबॉल खेळण्याचा परिणाम उभय संघांतील खेळाडूंवर जाणवत होता. केरळा ब्लास्टर्सने पहिल्या अर्धातील खेळात चेंडूवर जास्त प्रमाणात ताबा राखला, पण संदेश झिंगन आणि टिरी यांचा समावेश असलेल्या एटीके मोहन बागानच्या बचावफळीस त्यांना भेदता आले नाही. एटीके मोहन बागानचा हुकमी आघाडीपटू फिजी देशाचा आंतरराष्ट्रीय रॉय कृष्णा याला आज सूर गवसला नाही. त्याने किमान तीन सोप्या संधी गमावल्या. पहिल्या अर्धा तासाच्या खेळानंतर समोर केवळ गोलरक्षक आल्बिनो गोम्स असताना कृष्णाचा फटका गोलपट्टीवरून मारला. हबास याने सामन्याच्या 14व्या मिनिटास पहिला बदल केला. मायकल सुसाईराज याच्या जागी सुभाषिश रॉय याला मैदानात उतरविले.
केरळा ब्लास्टर्सची उत्तरार्धातील सुरवात आक्रमणावर भर देणारी होती, पण सदोष नेमबाजीमुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी किबु विकुना यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला फोडता आली नाही. विश्रांतीनंतरच्या तिसऱ्याच मिनिटास केरळाच्या सहल अब्दुल समद याने चेंडूला नेटची दिशा दाखविता आली नाही. त्याचा हेडर थेट गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यच्या हाती गेला.
दृष्टिक्षेपात...
- एटीके मोहन बागानच्या एदू गार्सिया याला सातव्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील पहिले यलो कार्ड
- 2020-21 आयएसएल स्पर्धेतील पहिल्या गोलचा मानकरी एटीके मोहन बागानचा रॉय कृष्णा
- फिजी देशाच्या आंतरराष्ट्रीय स्ट्रायकरचे आयएसएल स्पर्धेत आता 16 गोल
अधिक वाचा :
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.