Ranji Trophy 2022-23: रणजी ट्रॉफीला मंगळवारपासून सुरूवात झाली असून गोव्याचा संघ पहिला सामना राजस्थानविरुद्ध खेळत आहे. दरम्यान, गोव्याकडून अर्जून तेंडुलकर आणि सुयश प्रभूदेसाईने शानदार कामगिरी केली आहे. दोघांनीही शतकं झळकावली आहेत. दरम्यान, या शतकासह अर्जूनने त्याचे वडील आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या एका विक्रमाशी बरोबरीही केली आहे.
अर्जूनने याच सामन्यातून गोव्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही पदार्पण केले आहे. पदार्पणातच त्याने शानदार कामगिरीसह त्याच्यातील कौशल्याची चुणूक दाखवली आहे. त्याने बुधवारी राजस्थानविरुद्ध पहिल्या डावात 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत शतक झळकावले.
त्याने 178 चेंडूत शतक झळकावताना 12 चौकार आणि 2 षटकार मारले. यासह त्याने पहिल्याच प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यामध्ये शतक करण्याच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिनने डिसेंबर 1988 मध्ये मुंबईकडून गुजरातविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी 15 वर्षीय सचिनने नाबाद 100 धावांची खेळी केलेली.
सचिनने त्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर खेळताना 129 चेंडूत शतक केले होते. या शतकी खेळीत सचिनने 12 चौकार ठोकले होते. या सामन्यात सचिनला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. तसेच हा सामना अनिर्णित राहिला होता.
द्विशतकी भागीदारी
दरम्यान अर्जूनने सुयश प्रभूदेसाईबरोबरही सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली आहे. 137 षटके झाली, तेव्हा प्रभुदेसाई 171 धावांवर खेळत होता. तसेच गोव्यानेही 5 बाद 400 धावांचा टप्पा पार केला आहे.
अष्टपैलू अर्जून
23 वर्षीय अर्जून हा प्रामुख्याने अष्टपैलू खेळाडू असून डाव्या हाताने फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी करतो. यापूर्वी त्याने वरिष्ठ क्रिकेटमध्ये मुंबईकडून पदार्पण केले होते. पण त्याला मुंबई संघात सातत्याने संधी मिळत नसल्याने त्याने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो यंदा गोव्याकडून खेळताना दिसत आहे.
तो काही दिवसांपूर्वीच गोव्याकडून विजय हजारे ट्रॉफी 2022 स्पर्धेतही खेळला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.