Argentina Football: गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये अर्जेंटिना फुटबॉल संघाने कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकपवर नाव कोरले होते. त्यांनी 18 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सला पराभूत करत तब्बल 36 वर्षांनी वर्ल्डकप विजेतेपद मिळवले होते. पण, आता या सामन्यात झालेल्या काही चूकांमुळे अर्जेटिनाला फिफाच्या शिस्तभंग कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वर्तन आणि फेअर प्लेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. फिफाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाप्रमाणे अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनवर मिडिया आणि मार्केंटिग नियमांचेही उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
फिफाच्या प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहे की 'फिफा शिस्तपालन समीतीने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनविरुद्ध काही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.'
'त्यांच्यावर फ्रान्सविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात फिफा शिस्तपालन संहितेतील कलम 11 (आक्षेपार्ह वर्तन आणि निष्पक्ष खेळाच्या तत्वांचे उल्लंघन), कलम 12 (खेळाडू आणि अधिकाऱ्यांशी गैरवर्तवणूक) आणि फिफा वर्ल्डकप 2022 साठी असलेल्या मिडीया आणि मार्केंटिंग नियमांच्या संबधित असलेल्या कलम 44 चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.'
पण, फिफाने अर्जेंटिना संघातील कोणत्या खेळाडूकडून किंवा सपोर्ट स्टाफसदस्याकडून चूका झाल्या आहेत, हे स्पष्ट केलेले नाही. तसेच नक्की कोणत्या चूका झाल्या आहेत, हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही.
(Argentina are facing FIFA disciplinary proceedings)
दरम्यान,अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील अंतिम सामन्यानंतर अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियाने मार्टिनेजने गोल्डन ग्लव्ह्ज पुरस्कार जिंकल्यानंतर अश्लील हावभाव केले होते. तसेच त्याने नंतर ड्रेसिंग रुममध्ये कायलिन एमबाप्पेची नक्कलही केली होती. अर्जेंटिनावर कारवाई होण्यामागे हे एक प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे.
अर्जेंटिनाने 36 वर्षांनी जिंकले विजेतेपद
अर्जेंटिनाने विश्वविजेतेपद जिंकल्याने लिओनल मेस्सीचे विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण झाले. तो कतारमध्ये त्याचा पाचवा वर्ल्डकप खेळला होता. त्याने खेळलेल्या आधीच्या 4 वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवता आला नव्हता. पण मेस्सीने त्याच्या कारकिर्दीतील अखेरच्या वर्ल्डकपमध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला 36 वर्षांनी वर्ल्डकप जिंकून दिला.
दरम्यान, फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मेस्सीने दोन महत्त्वपूर्ण गोल केले होते. तसेच एंजेल डी मारियाने अर्जेंटिनासाठी एक गोल केला होता. पण फ्रान्सकडून एमबाप्पेने तीन गोल करत बरोबरी साधली होती. त्यामुळे या सामन्याचा निकाल पेनल्टी शुटआऊटमध्ये लागला. पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 अशा गोलफरकाने अर्जेंटिनाने विजय मिळवला.
हा अर्जेंटिनाचा तिसरा वर्ल्डकप विजय ठरला. यापूर्वी त्यांनी 1978 आणि 1986 साली वर्ल्डकप जिंकला होता.
फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत मेस्सीने सर्वोत्तम खेळाडूसाठी असलेला गोल्डन बॉल पुरस्कारावरही नाव कोरले. हा पुरस्कार दोनवेळा मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे. यापूर्वी त्याने 2014 साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये देखील हा पुरस्कार मिळवला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.