Aakash Chopra reacts on Hasan Raza Claim that ICC giving different balls to Indian bowlers in ODI Cricket World Cup 2023:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील 33 वा सामना गुरुवारी भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 302 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा भारताचा या स्पर्धेतील सलग 7वा विजय ठरला.
भारतीय संघाच्या या विजयात वेगवान गोलंदाजांनी महत्त्वाचा वाटा उचलला. या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 357 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २० षटकांच्या आतच ५५ धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेच्या १० विकेट्सपैकी ९ विकेट्स जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाने घेतल्या.
दरम्यान, आत्तापर्यंत या स्पर्धेत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे. ते पाहून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझाने एक खळबळजनक दावा केला आहे.
हसन रझाने एबीएन या न्यूज चॅनेलशी बोलताना दावा केला की कदाचीत आयसीसी किंवा बीसीसीआय भारतीय गोलंदाजांना बाकी गोलंदाजांपेक्षा वेगळा चेंडू देत आहे.
रझा म्हणाला, 'आपण पाहिले की जेव्हा भारतीय संघ फलंदाजी करते, त्यावेळी ते खूप चांगली फलंदाजी करतात आणि नंतर अचानक भारतीय संघ गोलंदाजी करत असताना चेंडू हलचाल करू लागतो. 7-8 डीआरएसचे अगदी अटीतटीचे निर्णयही त्यांच्याच बाजूने झुकले आहेत.
सिराज आणि शमी ज्याप्रकारे चेंडूला स्विंग देत आहेत, असे वाटत आबे की आयसीसी किंवा बीसीसीआय त्यांना दुसऱ्या डावात वेगळा चेंडू देत आहेत. चेंडू तपासण्याची गरज आहे. कदाचीत चेंडूला स्विंग मिळण्यासाठी त्यावर एखाद्यावेळी ज्यादाचे कोटिंग केले असू शकते.'
दरम्यान, रझाच्या या दाव्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने प्रत्युत्तर दिले आहे. आकाश चोप्राने ट्वीट केले आहे की 'तो खरंच सिरियस क्रिकेट शो होता का? जर नसेल, तर कृपया 'विनोदी' किंवा 'उपहासात्मक' हे इंग्लिशमध्ये कुठेतरी नमुद करा. कदाचीत ते उर्दूमध्ये कुठेतरी आधीच लिहिलेले असेल, पण मला ते वाचता येत नाही किंवा समजत नाही.'
याशिवाय देखील हसन रझाला भारतीय चाहत्यांकडून ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.
गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 357 धावा केल्या होत्या. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 92 धावा केल्या, तर विराट कोहलीने 88 धावांची आणि श्रेयस अय्यरने 82 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना दिलशान मदुशंकाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकात 55 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून कसून रजिताने 14 धावा, महिश तिक्षणाने नाबाद 12 धावा आणि अँजेलो मॅथ्युजने 12 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. श्रीलंकेचे 5 फलंदाज शुन्यावर बाद झाले.
भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने 3 विकेट्स, तर जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.