Haryana Crime News: चार वर्षांच्या मुलासह सहा जणांच्या हत्येप्रकरणी (फेब्रुवारी 2021) हरियाणाच्या रोहतक येथील न्यायालयाने शुक्रवारी माजी कुस्ती प्रशिक्षकाला फाशीची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गगन गीत कौर यांनी सुखविंदरला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 302 (खून) आणि 307 (हत्येचा प्रयत्न) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले आणि 1.26 लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनीपत जिल्ह्यातील बडोदा गावात राहणाऱ्या सुखविंदरने 12 फेब्रुवारी 2021 रोजी मनोज मलिक, त्याची पत्नी साक्षी मलिक आणि मुलगा सरताज, कुस्ती प्रशिक्षक सतीश कुमार, प्रदीप मलिक आणि कुस्तीपटू पूजा यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. रोहतकमधील एका खाजगी महाविद्यालयाशेजारील कुस्तीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेत अमरजीत नावाचा आणखी एक व्यक्ती जखमी झाला, असे पोलिसांनी सांगितले होते. सुखविंदरच्या विरोधात अनेक तक्रारी आल्याने त्याची सेवा बंद करण्यात आल्याने रागाच्या भरात सुखविंदरने हा गुन्हा केल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
एका वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितांपैकी एक कुस्तीपटू पूजाने त्याच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर सुखविंदर सिंहने खुनाचा कट रचला होता. तक्रारीनंतर अमरजीत दलाल यांनी सिंह यांना रोहतक येथील मेहर सिंह आखाड्याच्या कुस्ती प्रशिक्षकाच्या नोकरीवरुन काढून टाकले होते. प्रशिक्षक मनोज मलिक यांनी 2021 मध्ये सिंहला आखाड्यात येण्यापासून रोखले होते. यानंतर सुखविंदरने खुनाचा कट रचला. सिंहने पहिल्यांदा प्रशिक्षक प्रदीपची हत्या केली. त्यानंतर त्याने मनोज आणि सतीशवर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर त्याने साक्षी मलिक, पूजा आणि साक्षीच्या मुलाचीही हत्या केली.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सिंह यांनी आखाड्याच्या एका खोलीत तीन प्रशिक्षकांची हत्या केली. तर दुसऱ्या खोलीत त्याने दोन महिला आणि एका मुलाची हत्या केली आणि नंतर खोलीचा दरवाजा बंद केला. या घटनेच्या एका दिवसानंतर 13 फेब्रुवारी रोजी सुखविंदर सिंहला दिल्लीतून अटक करण्यात आली होती.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, हे प्रकरण दुर्मिळ आहे. अशा परिस्थितीत या न्यायालयाला जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा ठोठावण्याशिवाय पर्याय नाही. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय फाशीच्या शिक्षेची पुष्टी करत नाही तोपर्यंत शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार नाही, असे न्यायाधीशांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.