Swasthyam 2022 | Health Festival | Mental health Event Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Swasthyam 2022 : फ्रेश मूडमध्ये ‘स्वास्थम्’मध्ये व्हा सहभागी; पाहा काय सांगताहेत फिटनेस ट्रेनर सर्वेश शशी

Health Festival: मूळ शब्द हा योगा असा नसून तो योग असा आहे. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचं एकत्र येणं होय.

दैनिक गोमन्तक

सर्वेश शशी

Swasthyam Event 2022 : भारतीयांना योगसंस्कृतीचं महत्त्व पटू लागलंय; पण तरीसुद्धा आणखी मोठा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. ज्या योगाने माझ्या आयुष्याला शिस्त लावली तोच योग मी ‘स्वास्थम्’च्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. शारीरिक आणि मानसिक फिटनेस नेमका काय असतो, योगसाधनेच्या माध्यमातून तो कसा साधला जाऊ शकतो हे तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे ही संधी चुकवू नका, रिलॅक्स अन् फ्रेश मूडमध्ये या उपक्रमात सहभागी व्हा.

माझ्या आयुष्यात वयाच्या सहाव्या वर्षीच योग आला, याचं श्रेय माझ्या आई वडिलांनाच जातं. क्रिकेटच्या मैदानावर दंगामस्ती करणाऱ्या एका उनाड मुलाला योगानं शिस्त लावली. माझ्या आयुष्यात गुरूचं येणं एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला. ऋषिकेशहून आलेले ते जटाधारी साधू महाशय आपलं आज्ञाचक्र सक्रिय करतील आणि त्याच योग शक्तीच्या बळावर आपल्याला भारताकडून खेळायची संधी मिळेल, अशी भाबडी आशा मी बाळगून होतो.

मात्र, पहिल्याच भेटीत त्यांनी मला जमिनीवर आणलं, ‘सर्वेश तुला जर वाटत असेल की, मी हा चमत्कार करू शकतो तर तू वेडा आहेस आणि मी जर तसा दावा करत असेल तर मीपण वेडाच आहे असं म्हणावं लागेल,’ असं त्यांनी निक्षून सांगितलं.

त्यांचं हे सत्यदर्शन मला खूप भावलं आणि हाच माणूस आपल्याला भविष्याचा मार्ग दाखवू शकतो याची मनोमन खात्री पटली. पुढं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी वयाच्या सतराव्या वर्षापासून योगसाधनेला सुरूवात केली. माझे हे तप साधारणपणे एक वर्ष चाललं. या काळामध्ये मी विपश्यना केली, चाळीस दिवसांचे मौनव्रत केलं. मांसाहाराचा त्याग केला. आजतागायत मी दारू आणि सिगारेटला स्पर्श देखील केलेला नाही.

वयाच्या एकविसाव्या वर्षात पदार्पण केलं, तेव्हा मला समजलं की योगानं माझ्यामध्ये किती मोठा बदल घडवून आणला आहे. आजही आपल्याकडं लोकांमध्ये योगाबाबत वेगवेगळ्या चुकीच्या संकल्पना असल्याचे दिसून येतं. काहींना योग हे बोअरिंग वाटतं, पण ते तसं नाहीये. योग तुमच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनायला हवा. जसं की तुम्ही झोपेतून उठल्यानंतर ब्रश करता, अंघोळ करता एवढ्या सहजपणे ते होणं गरजेचं आहे. पुढं याच योग क्रांतीच्या प्रचारासाठी मी स्वतःची कंपनी सुरू केली. आज हे सगळं तुम्ही पाहता आहेत ती योगाचीच किमया आहे, असं म्हणावं लागेल.

गुरूमुळे मार्ग दिसला

खरंतर मूळ शब्द हा योगा असा नसून तो योग असा आहे. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचं एकत्र येणं होय. योगाचेही आठ अंग आहेत. आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये योगासनांमध्ये तीन गोष्टींना प्राधान्य देतो. यात आसन, प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश असतो. यातही पुढे यम, नियम, समाधी असे बरेच घटक आहेत, पण आम्ही तीन गोष्टींवर भर देऊन योग प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली आहे.

यामुळेच व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक फिटनेस मिळतो. ध्यानामुळे आध्यात्मिक आणि मानसिक पातळीवर देखील माणूस बलवान होतो. आसनांमुळे शारीरिक बळ मिळतं, प्राणायामुळं श्‍वसन क्रिया सुधारते, ध्यानामुळं मानसिक क्षमतेचा विकास होता. यामुळं व्यक्ती सगळ्याच अंगांनी फिट होऊ शकते. योगसाधनेमध्ये गुरूचं खूप महत्त्व आहे. गु म्हणजे अंधकार, तर रू म्हणजे प्रकाश होय. जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो तुमचा गुरू असतो. सुरूवातीला योगसाधना ही गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवी.

तुमचा कोच हाच गुरू, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक असतो. योगाच नाही, तर कोणताही शारीरिक व्यायाम हा गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय सुरू करू नये असं मला वाटतं. गुरू केल्यानंतर तुमची त्याच्यावर पूर्ण श्रद्धा असायला हवी. गुरूला पूर्ण शरण जायला हवं, पण त्याहीआधी चांगला गुरू निवडणं ही तुमची जबाबदारी असते. त्यासाठी तुम्हाला खूप काळजी घेणं गरजेचं असतं. माझ्या जीवनाला योग्य वळण देण्याचं काम माझ्या गुरूनंच केलं. आज मी जो काही आहे तो माझे आई-वडील आणि गुरूमुळंच आहे.

तुम्हाला आतून वाटलं पाहिजे

कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर सगळं काही ठप्प झालं होतं. या कोट्यवधीच्या देशामध्ये एक टक्क्यांपेक्षाही कमी लोक हे त्यावेळी वर्कआउट करीत होते. त्यातुलनेत अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीयन देशांत जीममध्ये वर्कआउट करणाऱ्यांचं प्रमाण हे दहा टक्क्यांपर्यंत होतं.

यावरून तुम्हाला समजलं असेल, की आपल्याला याबाबतीत आणखी किती मोठा टप्पा गाठायचा आहे. सरकारनं योग दिनासारखा एक चांगला उपक्रम सुरू केला असून, आपण ह्रदयविकार, मधुमेह दिनासारखे दिवसही पाळतो. पण मी असे म्हणेल, की तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी या दिनाची काहीही आवश्यकता नाही. तुम्हाला हे सगळे काही आतून वाटले पाहिजे.

तुम्हाला तुमच्या कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी फिट असणं गरजेचं आहे. अगदी दुसऱ्याला मदत जरी करायची झाली, तरीसुद्धा आधी तुमच्या अंगात बळ असायला हवं. अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये लोकांमध्ये याबाबतीत जनजागृती खूप कमी असल्याचं दिसून येतं. यासाठी स्वतःहून प्रयत्न करणाऱ्या लोकांची संख्या देखील खूपच कमी आहे.

भारतीय संस्कृती आणि परंपरेने आपल्यासमोर योगसाधनेचा मोठा खजिनाच खुला केला आहे. पण आपण किती डोळसपणे त्याच्याकडं पाहतो हे खूप महत्त्वाचं आहे. सध्या लोक हे ‘रोटी, कपडा आणि मकान’ याच चक्रात अडकून पडल्याचे दिसतात, पण जेव्हा तुमच्यावर शारीरिक व्याधी ओढावते तेव्हा कोण पाहतो तुम्ही काय खाता? कोणते कपडे घालता? अशा स्थितीत तुम्हाला कोणीही मदत करू शकत नाही.

प्रतिबंधात्मक आरोग्यप्रणाली

वाढत्या ताणतणावामुळे लोक आज योग संस्कृतीकडं वळले आहेत. योगसाधनेतील ध्यानामुळं तुम्हाला वर्तमानाचं भान येतं. यामुळं तुम्ही भूत आणि भविष्यकाळामध्ये अडकून पडत नाहीत. आता लोक हे पर्यायी आरोग्य व्यवस्थेकडं वळू लागले आहेत. यामध्ये योग, आयुर्वेद आणि प्राणिक हिलिंग या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

भारतीयांसाठी योग संस्कृती ‘घर की मुर्गी दाल बराबर’ अशी अवस्था आहे. काहींना आजही योग हा बोअरिंग वाटतो. काहींना तो फक्त ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठीच आहे, असे वाटते. पण परदेशातील स्थिती मात्र काहीशी वेगळी आहे. परदेशी नागरिकांनी योगाला खूप चांगले रूप दिले आहे. उपचारादरम्यान, एखाद्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतरची उपचार पद्धती म्हणून तिथे योगाचा वापर होऊ लागला आहे.

शाळा, कार्यालये, महाविद्यालयांप्रमाणेत आता तिथं तुरूंगामध्ये योग धारणा होऊ लागली आहे. कॉर्पोरेट जगतालाही योग संस्कृतीचं महत्त्व कळलं आहे. मोठ्या आणि दुर्धर आजारांमध्ये योगसाधना खूप महत्त्वाची ठरू शकते. अगदी मधुमेहाचेच उदाहरण घ्या ना. मधुमेह झालेल्या व्यक्तीला बाहेरून इन्शुलिन घ्यावे लागते. योगामध्ये मंडूक आसन, कपालभाती, अनुलोम-विलोमसारख्या क्रिया आहेत.

ध्यान आणि आसनाच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या शरीरामध्ये इन्शुलिन तयार होते, त्यामुळे प्रसंगी तुम्हाला ते बाहेरून घेण्याचीही गरज भासणार नाही. अगदी याच पद्धतीने रक्तदाब, पाठीचे दुखणे, थायरॉईड आदी आजारांवर योग उपकारक ठरू शकतो. आज आमच्या स्टुडिओमध्ये बहुसंख्य लोक हे वजन कमी करण्यासाठी येतात. योगामुळे तुमचा हात फ्रॅक्चर झाला असेल तर तो बरा होणार नाही, त्यासाठी तुम्हाला वेगळे उपचार घ्यावेच लागतील. योग ही प्रतिबंधात्मक आरोग्यप्रणाली आहे. तुम्ही सलग वीस दिवस जरी अनुलोम विलोम केले तरीसुद्धा तुम्हाला खूप सुधारणा झाल्यासारखे वाटेल.

उपक्रमात हे शिकविणार

‘स्वास्थ्यम्’सारख्या उपक्रमातून मी सहभागी झालेल्यांशी संवाद साधणार आहे, त्यांच्याकडून योगासने करून घेईल. प्राणायाम देखील करवून घेईल. ध्यानधारणादेखील करवून घेईल. मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी? रोज काय करायचे? दैनंदिन समस्यांवर तोडगा कसा काढायचा? हे सांगितले जाईल.

योग आणि म्युझिकच्या माध्यमातून हे केले जाईल. योग तुमच्या शरीराला डिटॉक्स करतो. वेगवेगळ्या क्रियांच्या माध्यमातून हे होत असतं. तुम्ही काय खाता? तुमच्या सभोवतालचा परिसर नेमका कसा आहे? यावर तुमच्या शरीराचा समतोल अवलंबून असतो. हाच समतोल साधण्याचं काम योग करत असतो. ‘स्वास्थ्यम्’सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण तेच शिकणार आहोत. त्यामुळं प्रत्येकानं यात उत्स्फूर्तपणे सहभागी होणं गरजेचं आहे.

(शब्दांकन - गोपाळ कुलकर्णी)

असे व्हा सहभागी...

मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.

https://www.globalswasthyam.com/

उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !

Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam

Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/

Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam

LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT