Restaurants in Goa: Mother Recipes
Restaurants in Goa: Mother Recipes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Restaurants in Goa: मदर रेसिपीज

Manaswini Prabhune-Nayak

बाणावली सारख्या भागात घरगुती जेवण मिळू शकतं असं कधी वाटलं नव्हतं. ऑफिसच्या कामानिमित्ताने बाणावली भागात आमच्या टीमसोबत फिरत होते. दुपारचा एक वाजून गेला होता. सर्वांना भूक लागली होती. खरंतर या भागात अनेक चांगली रेस्टोरंट होती पण गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन नंतर यातील बरीचशी बंद पडली, जी आजपर्यंत सुरु झालीच नाही. त्यामुळे बाणवलीमध्ये चांगलं जेवण कुठे मिळेल याचा आम्ही शोध घेत असताना 'मदर रेसीपीज' नावाचं रेस्टोरंट सापडलं. बाणावलीमधील पुलवड्यात 'मदर रेसिपीज' (Mother Recipes) हे रेस्टोरंट आहे. खारेबांध कडून बाणावलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे रेस्टोरंट आहे. कदाचित त्या रस्त्यावरून जाताना सहजपणे 'मदर रेसिपीज' दिसणार नाही कारण रेस्टोरंटसारखं इथं वातावरण नाही. घराच्या अंगणात अगदी साधेपणाने रेस्टोरंन्टची मांडणी केलेली असून त्यात कोणताही दिखाऊपणा नाही. महत्व दिलंय ते फक्त इथल्या खाद्यपदार्थांना.

रेस्टोरन्टच्या मालक केशव गुडेकर आणि त्यांच्या पत्नी रिया गुडेकर हे दोघेही इथे स्वतः राबताना दिसतात. केशव स्वतः किचन सांभाळतात आणि रिया बाकीची सर्व कामं बघतात. मी जेवायला गेले होते तेव्हा रिया या रेस्टोरंटमध्ये आलेल्या प्रत्येकाला त्यांनी ऑर्डर केलेलं जेवण नीट मिळालं आहे कि नाही, अजून काही हवं आहे का? जेवणात चांगले काय पर्याय आहेत हे सांगत होत्या, तर केशव स्वतः किचनमध्ये स्वयंपाक करत होते. हाताखाली कामाला असलेल्या चार -पाच जणांच्या साहाय्याने त्यांचं स्वयंपाकाचं काम सुरु होतं. सर्वात पहिल्यांदा इथे कोणती गोष्ट आपलं लक्ष खेचून घेते तर इथल्या पदार्थांची, थाळीची किंमत. अतिशय माफक दरात हे दोघे नवरा - बायको अनेक वेगवेगळे पदार्थ लोकांना खायला घालतात. थाळीचेच अनेक प्रकार इथल्या मेनूकार्डवर बघायला मिळाले. लेपो थाळी, ताल्ले थाळी, वेल्ल्यो थाळी, धोडियाळो थाळी, बांगडो थाळी, इसवण थाळी, मोडसो थाळी, चणक थाळी, बोंबील थाळी, प्रॉन्स थाळी आणि चिकन - मटण थाळी इतक्या प्रकारच्या थाळी इथे मिळतात. यापैकी जी कोणती मासळी तुम्हाला खावीशी वाटते ती थाळी निवडायची. थाळीत महत्व 'हुमण' आणि तळलेल्या मासळीला. इतर थाळीमध्ये असंख्य पदार्थांचा मारा असतो. इतके सारे पदार्थ पोटात जातही नाही. मुख्य भर असतो तो तळलेल्या मासळी आणि शीत - हुमण यावर. तेच जर चांगल्या दर्जाचे नसले तर त्या थाळीला अर्थ नसतो. केशव आणि रिया यांनी थाळीची रचना केली आहे. छान चरचरीत तळलेला फिश, शीत -हुमण, किसमूर, एखादी भाजी, सलाड-लोणचं आणि सोलकढी एवढे पदार्थ इथल्या थाळीत मिळतात. थाळीत तऱ्हेतऱ्हेच्या पदार्थांचा फापटपसारा नाही. म्हणूनच थाळीची किंमत देखील खिशाला परवडणारी.

मदर रेसिपीजचे मालक केशव गुडेकर हे मर्चंट नेव्हीमध्ये होते. कुटुंबापासून, आपल्या मायभूमीपासून सतत दूर राहण्याचा कंटाळा आला होता. आता आपल्याच गावात- आपल्या कुटुंबासोबत जगलं पाहिजे असं त्यांना मनातून वाटू लागलं. तीन वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडून रेस्टोरन्ट सुरु करायचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांची पत्नी रिया हिचा फक्त पाठिंबाच नव्हता तर ती त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली. आतापर्यंत मी असं बघितलं आहे कि साधारणपणे जेव्हा नवरा - बायको दोघे मिळून रेस्टोरंट सुरु करतात तेव्हा नवरा रेस्टोरन्टच्या गल्ल्यावर आणि बायको किचनमध्ये असं चित्र बघायला मिळतं. पण इथे अगदी विरुद्ध चित्र बघायला मिळालं. केशव पूर्णपणे किचन सांभाळतात आणि रिया अतिशय समर्थपणे रेस्टोरंन्टचा गल्ला सांभाळते. केशवला स्वतःला स्वयंपाकाची पहिल्यापासून आवड होती. ' आईला स्वयंपाक करताना बघायचो. ती कोणते मसाले वापरते? त्यांचं प्रमाण कसं असतं हे सगळं नकळतपणे जवळून बघत आलो. जेव्हा आम्ही रेस्टोरंट सुरु करायचं ठरवलं तेव्हा आई जे पदार्थ बनवायची तेच पदार्थ रेस्टोरंटमध्ये ठेवायचे असं ठरवलं आणि म्हणूनच नाव देखील 'मदर रेसिपीज' असं ठेवलं' केशव यांच्याशी गप्पा मारताना रेस्टोरंट सुरु करण्यामागचा उद्देश आणि स्वतः किचनमध्ये काम करण्यामागचं कारण सांगितलं. इथं स्वयंपाकात कोणत्याही प्रकारचे रेडिमेड मसाले वापरले जात नाहीत. पूर्णपणे घरीच बनवलेले मसाले वापरले जातात. घरी बनवलेल्या मसाल्यांमुळे इथल्या पदार्थांची चव वेगळी ठरते.

इथल्या शाकाहारी थाळीचं वेगळेपण

जे इतरत्र शाकाहारी थाळीत मिळतं तेच इथे देखील मिळतं. पण त्यात विशेष असं आहे कि यांनी शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी त्याचं किचन, भांडी पूर्णपणे वेगळी ठेवली आहेत. एवढंच नाहीतर त्याच्या शेफ देखील स्वतंत्र आहे. मासळीचे किचन घराच्या बाहेर मागच्या अंगणात आहे तर शाकाहारी किचन घरातच ठेवलंय. हि स्वतंत्र रचना बघून शाकाहारी लोक मोठ्या विश्वासाने इथं जेवायला येतात. शाकाहारी थाळीची चव देखील उत्तम आहे. शिवाय इथे वेगवेगळ्या भाज्यांची मस्त कुरकुरीत तळलेली कापं तुम्ही स्वतंत्रपणे मागवू शकता. वांग, कारली, बटाटा, केळी अशी वेगवेगळ्या चवीची कापं फारच अप्रतिम लागतात.

तीन वर्षांपूर्वी केशव आणि रिया यांनी 'मदर रेजीपीज' सुरु केलं पण एका वर्षात कोविड-लॉकडाऊनमुळे रेस्टोरंट बंद ठेवावं लागलं. एकीकडे नोकरी सोडलेली तर दुसरीकडे उत्साहाने सुरु केलेला व्यवसाय देखील बंद अशी हताश परिस्थिती तयार झाली. मधले काही महिने खडतर गेले. आता जरा बरी परिस्थिती आहे. लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता येताच थोडे थोडे करून रेस्टोरंट परत सुरु केलं. घरगुती पद्धतीचं जेवण आणि उत्तम चव यामुळे थोड्याच अवधीत 'मदर रेसीपीज'चं चांगलं नाव झालंय. लॉकडाऊनचा एक मोठा विश्राम घेऊन झाल्यावर परत नव्या जोमाने 'मदर रेसिपीज' लोकांच्या सेवेसाठी सुरु झालं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, मग महिलांना सुरक्षा कशी मिळणार? इंडिया अलायन्सच्या नेत्यांचा घणाघात

Goa Today's Live News Update: मी संघाची विचारधारा स्वीकारली आहे - मंत्री विश्वजीत राणे

Goa Cyber Crime: UAE च्या बँकेत नोकरीचे आमिष; चिंबलच्या तरुणीला मुलाखतीत कपडे काढण्यास सांगितले, गुन्हा नोंद

Lok Sabha Election 2024: इंडिया अलायन्स सरकार स्थापन होताच 30 लाख सरकारी नोकऱ्या देणार: एल्टन डिकॉस्‍टा

Ramakant Khalap: ''गोव्‍यातून पोर्तुगिजांना हाकलून लावलं, पण अजूनही गोमंतकीयांना...''; खलप पुन्हा एकदा बरसले

SCROLL FOR NEXT