चार भिंतीआड औपचारिक शिक्षण घेणे आणि औपचारिकतेचे कुठलेही बंधन न बाळगता ‘शिकण्या’ला सामोरे जाणे यात फरक असतो काय? अनुभवी चित्रकार राजेश चोडणकर यांच्या मते, ‘लक्षणीय फरक असतो. औपचारिक शिक्षणामध्ये एक प्रकारचे ‘रुटीन’ ग्रहित धरले गेलेले असते. त्याची एक चौकट असते आणि त्या चौकटीतच आपल्याला ज्ञानग्रहण करावयाचे असते. अर्थात यामुळे अशाप्रकारच्या अध्ययनावर एक प्रकारची मर्यादा येते.’
राजेश चोडणकर यांनी हल्लीच सूर्यकिरण हेरिटेजच्या कलादालनात चित्रकलेची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला (Painting) कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत पेंटिंगचा पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या अकरा विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
सिया पंडित ही या कार्यशाळेत भाग घेणारी प्रशिक्षणार्थी. या कार्यशाळेबद्दल बोलताना म्हणाली, ‘कार्यशाळेत आम्हाला वेळेचे बंधन नव्हते. अमुकच अशी ‘डेडलाईन’ नव्हती. त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने मोकळा विचार करण्यासाठी आवश्यक असलेला अवकाश या कार्यशाळेने आम्हाला दिला. त्याशिवाय या कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या ‘मास्टर्स’बरोबर मनमोकळा संवाद साधता आला, जे सहसा वर्गात घडत नाही. वर्गात ज्या पद्धतीचे ‘अकॅडमिक’ वातावरण असते, ते या कार्यशाळेत नव्हते. त्याशिवाय चित्र कॅनव्हसवर रंगवताना तिथे पाहणारे देखील असायचे. त्यामुळे एका वेगळ्याच वातावरणात आमच्याकडून कलाकृती घडत होती. हा वेगळा अनुभव होता.
या कार्यशाळेत भाग घेणाऱ्या सगळ्या अकरा प्रशिक्षणार्थ्यांसाठी चित्रकला कार्यशाळेचा हा पहिलाच अनुभव होता. खरंतर अशा चित्रकला कार्यशाळा या बहुदा सरकारी आस्थापनांनाकडून आयोजित होतात. कारण अशा कार्यशाळांसाठी येणारा खर्चही भरपूर असतो. पण ही कार्यशाळा खाजगीरित्या आयोजित केली गेली होती. राजेश चोडणकर हे या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांच्याच पुढाकारातून ही कार्यशाळा आयोजित झाली होती. प्रशिक्षणार्थ्यांकडूनही या कार्यशाळेसाठी शुल्क आकारले गेले नव्हते. राजेश चोडणकर यांच्या प्रस्तावामुळे कॅम्लिन कंपनीने सार्या प्रशिक्षणार्थ्यांना अॅक्रॅलिक रंगांचे ट्युब पुरवले. ‘गोवा कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स’ने या कार्यशाळेसाठी ‘ईझेल’ची व्यवस्था केली. सूर्यकिरण हेरिटेजने आपली जागा वापरायला दिली. कॅनव्हासची व्यवस्था स्वतः राजेश चोडणकर यांनी केली.
सूर्यकिरण हेरिटेजचे प्रीतम बिजलानी याबद्दल सांगताना म्हणाले, ‘कला आणि कलाकारांसाठी या जागेची योजना पूर्वीच करण्यात आली होती. मात्र कोरोनाकाळामुळे सुरुवात करणे शक्य झाले नव्हते. केवळ चित्रकलाच नव्हे तर इतर कलां आणि कलाकारांसाठीही त्यांची ही जागा उपलब्ध असेल.’
‘इटर्नल स्प्रिंग’ हे नाव असलेल्या या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थ्यांसाठी चित्रांचा विषयही तोच होता. तीन दिवसाच्या या कार्यशाळेत प्रत्येकाने एक चित्र रंगवायचे इतकीच अट या कार्यशाळेसाठी होती. अर्थात चित्र या तीन दिवसात पूर्ण करायलाच हवे असे बंधनही प्रशिक्षणार्थ्यांवर नव्हते. या कार्यशाळेत चित्र कॅनव्हासवर उतरवण्यासाठी चित्रकाराला आवश्यक असलेली वैचारिक प्रक्रिया, रचनेचे भान, आकारांची (फॉर्म) निवड इत्यादीबद्दल कार्यशाळेचे संचालक राजेश चोडणकर यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रांचे प्रदर्शन जानेवारी महिन्यात सूर्यकिरण हेरिटेजच्या कला दालनात आयोजित होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.