monsoon |goa Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Care Tips: रान-वनाचे पावसाळी दान

Monsoon Vegetable: पावसाळ्यात अनेक ठिकाणी उगवणाऱ्या रानभाजीच्या रुपाने उपाययोजनाही केलेली असते.

दैनिक गोमन्तक

एक म्हण आहे, ‘हिंवाळा भोगी, उन्हाळा त्यागी आणि पावसाळा रोगी’. या म्हणीमागचा गर्भितार्थ कळणे फारसे कठीण नाही. हिवाळ्यात आपली पचनशक्ती फार चांगली असते. शेतीची कामे आटपून धन-धान्याची सुबत्ता वाढलेली असते. हवामान चांगले असते. ह्या मोसमात खवय्‍यांची चलती असते. ‘भोगी’ हे आपले विशेषण हिंवाळा सर्वार्थाने साजरे करत असतो. उन्हाळ्यात मात्र परिस्थिती उलट असते. उष्णतेमुळे आपले शरीर आधीच थकून जाते. खाणे नकोसे वाटते. या काळात पचनशक्ती कमी झाल्यामुळे खाल्लेलेही पचत नाही. त्यामुळे खाण्याच्या बाबतीत ‘त्याग’ आपोआपच घडून येतो. त्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत.

त्यानंतर येतो ‘रोगी’ हे विशेषण लागलेला पावसाळा. वातावरण दमट असतं. पावसामुळे नदी-नाल्यांचे पाणी गढूळ झालेले असते. शहरात तर गटारे तुंबून पाणी इतस्त: पसरलेले असते. या सर्व बाबी, वातावरणात रोगजंतूंची वाढ होण्यास अत्यंत साह्यकारी बनतात. या दिवसात प्रदुषीत पाणी पोटात गेल्यामुळे जुलाब- वांती, पचनाचे रोग तसेच वात, दमा आदी आजारही आपले डोके वर काढतात. जंत- कृमी होण्याचे प्रमाण पावसाळ्यातच वाढते.

पावसाळ्यात अशाप्रकारे आजारांचा फैलाव होत असला तरी निसर्गाने अशा काळात आपली प्रकृती स्वास्थकारक ठेवण्यासाठी पावसाळ्यात अनेक ठिकाणी उगवणार्या रानभाजीच्या रुपाने उपाययोजनाही केलेली असते. पावसाळ्यात या रानभाज्या डोंगरात, शेताच्या कडेला, पाणथळ जागी, बांधाच्या बाजूला इत्यादी जागेत भरघोस उगवलेल्या असतात. या सर्व भाज्यांची माहिती व ज्ञान काही पिढ्यांपूर्वी कुटुंबातल्या जेष्ठांना ठाऊक असायचे व ते पुढच्या पिढीकडे सहजगत्याच सुपुर्त व्हायचे.

परंतु आता विभक्त कुटुंबपध्दती अधिक प्रचारात असल्याने अशा भाज्यांची माहिती नवीन पिढीला फक्त वरवरपणेच असते. साऱ्याच भाज्या सर्वांना ठाऊक नसल्या तरी तेरे, कुर्डू, (कुड्डुकी) व टाकळा(तायकिळा) या भाज्या अजूनही बऱ्याच जणांच्या आसपास उगवत असल्याने खुप लोकांना ठाऊक असतात. पावसाळ्यात या मोसमी भाज्यांचे सेवन करणे हा देखील पावसाळ्यात फैलावणाऱ्या पोटाच्या विकारांविरूध्द लढण्याचा महत्त्वाचा भाग आहे.

आपल्याला अळूची भाजी आवडते, अळूवड्यांही आवडतात पण अळूचाच एक प्रकार असलेल्या, हिरव्या पानाच्या ‘तेऱ्या’कडे मात्र ढुंकून न बघण्याकडेच आपला कल असतो. अळूप्रमाणे ‘तेरे’ लोकप्रिय नाही पण लक्षात असू द्या, अळूपेक्षा तेरे अधिक पौष्टिक असते. त्यात असणारे लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण अळूपेक्षाही जास्त असते.

पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या टाकळा किंवा कुर्डूसारख्या रानभाज्या या चवीला थोड्याशा कडूसर असतात. पण लक्षात असू द्या, आयुर्वेदात नमूद केलेल्या सहा स्वांदापैकी ‘कडू’ हा देखील महत्त्वाचा स्वाद आहे. पण केवळ जिभेचे ऐकून आपण किंचित कडू असलेले पदार्थ टाळतो. पण भाज्यांचा हाच ‘कडूसर’ गुण पावसाळ्यात पोटावर आक्रमण करणाऱ्या कृमींचा बंदोबस्त करतो. टाकळ्याची भाजी तर दम्यावर देखील उपचार करते.

त्याशिवाय अनेकदा, या भाज्या कडू असल्याने त्या उकळून, त्याचे कडू पाणी फेकून देऊन त्यांचा कडवटपणा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र असे करणे चुकीचे असते. कारण त्या पाण्यातून आपण त्या भाज्यांचे सत्वच जणू फेकून देत असतो. पावसाळ्यात (Monsoon) आणि नंतरही आपल्या स्वास्थ्याचा जर आपण विचार करत असाल ते निसर्गानेच खास आपल्यासाठी निर्माण केलेल्या कडूसरपणाचा स्वाद प्रसाद म्हणून ग्रहण करा.

या साऱ्या भाज्या बाजारातही विकत मिळतात. पण पावसाळ्यात रानावनाची सैर करत, क्वचित भिजत या भाज्या गोळा करण्यात अधिक आनंद मिळतो. तिथे जा आणि निसर्गाचे हे दान कृतज्ञपणे स्वीकारा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT