Symptoms of Computer Vision Syndrome
सध्या मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि टॅबलेटसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरामुळे आधुनिक जीवनात स्क्रीन टाइमचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यातून निर्माण झालेली ‘कम्प्युटर आय सिंड्रोम’ (सीव्हीसी) ही समस्या आज काल वाढत आहे. स्क्रीन टाइमचा डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम, त्याची कारणे आणि त्यावर उपाय पाहू.
आधुनिक युगात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोणतेही काम आता संगणकाच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. संगणकाच्या अपरिहार्य कारणामुळे आपल्या डोळ्यांवरचा ताण मात्र सातत्याने वाढत असल्याने त्याच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होतात, त्यालाच कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सीव्हीएस) असे म्हणतात.
या अवस्थेमुळे डोळ्यांना कायमस्वरूपी हानी होत नाही; पण संगणकाचा वापर तितक्या सहजतेने करणे शक्य होत नाही. आधीपासून चष्मा असेल आणि त्याचा वापर न करता संगणकाचा वापर केला, तर संगणकाशी संबंधित डोळ्यांच्या समस्या अधिक प्रमाणात उद्भवू शकतात.
संगणकाचा वापर सातत्याने केला जात असेल, तर ही समस्या उद्भवते. दिवसाला तीन तासांपेक्षा जास्त वेळ संगणकाचा वापर करणाऱ्या ९० टक्के व्यक्तींमध्ये हा आजार आढळून येतो.
संगणकावर काम करताना आपले डोळे सतत कशावर तरी केंद्रित होत असतात. डोळ्यांची सतत हालचाल होत असते आणि आपण बघत असलेल्या गोष्टींशी ते जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. कॉन्ट्रास्ट, फ्लिकर आणि ग्लेअर या संगणकाच्या स्क्रीनच्या घटकांमुळे संगणकावर काम करणे हे पुस्तक वाचणे किंवा वर्तमानपत्र वाचण्यापेक्षा त्रासदायक होते.
अत्याधिक स्क्रीन टाइममुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण पडतो. स्क्रीनकडे सलग पाहिल्यामुळे डोळ्यांच्या पापण्यांचा स्नायू ताणले जातात.
डोळ्यावर ताण आणि लालसरपणा
संगणकाच्या वापरानंतर धूसर किंवा दुहेरी दृष्टी (एक वस्तू दोन असल्याचा भास होणे)
डोळे कोरडे पडणे, लालसरपणा, चुरचुरणे, डोकेदुखी
मानेत किंवा पाठीत वेदना
पापण्यांची उघडझाप होते कमी
ड्राय आय सिंड्रोम स्क्रीनवर काम करताना आपल्याला सतत लक्ष ठेवावे लागते. त्यातून डोळ्यांच्या पापण्यांचे उघडझाप कमी होते. साधारणपणे माणूस एका मिनिटात १५ ते २० वेळा पापण्यांची उघडझाप करतो. परंतु स्क्रीनवर काम करताना हे प्रमाण जवळपास निम्म्याने कमी होते. यामुळे डोळ्यांचा नैसर्गिक ओलेपणा कमी होतो आणि डोळे कोरडे पडण्याला सुरुवात होते. दृष्टीच्या तात्पुरत्या अडचणी वाढतात. लोकांना स्क्रीनवरील मजकूर किंवा प्रतिमा अस्पष्ट दिसायला लागतात. तसेच, स्क्रीनकडे पाहिल्यानंतर अचानक दुसऱ्या गोष्टीकडे पाहिल्यास, डोळे पुन्हा फोकस करण्यात त्रास होऊ शकतो.
काम करताना दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० फूट दूर असलेल्या गोष्टीकडे पाहावे. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि ताण कमी होतो.
स्क्रीनचा ब्राइटनेस डोळ्यांना आरामदायी असावा. खूप तेजस्वी किंवा खूप कमी प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण पडतो.
कॉम्प्युटर मॉनिटरची जागा डोळ्यांपासून साधारणतः पंचवीस इंचांवर असावी आणि डोळ्यांच्या आडव्या स्तरात त्याचे अंतर खालून सहा इंच असावे.
डोळ्यांमध्ये काही समस्या जाणवली, तर त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य तपासणीमुळे समस्यांचे निदान होऊ शकते.
झोपेच्या किमान एक तास आधी स्क्रीनचा वापर बंद करावा. यामुळे निळ्या प्रकाशाचा मेंदूवर होणारा परिणाम कमी होतो आणि झोप चांगली येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.