Goa
Goa Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गावातला नाट्यमहोत्सव...

दैनिक गोमन्तक

नाट्यमहोत्सव म्हटला कि तो एखाद्या सुसज्ज नाट्यगृहातच आयोजित व्हायला हवा अशी एक सामान्य धारणा असते. पण हल्लीच काणकोण तालुक्यातल्या पैंगीण या गावात ‘थिएटर फ्लेमिंगो’ने घडवून आणलेला काणकोण नाट्यमहोत्सव याला अपवाद होता. हा नाट्यमहोत्सव केवळ गावात झाल्यामुळे नव्हे तर इतरही बऱ्याच कारणांमुळे वेगळा ठरला. साधारण गावात नाटक संपले की टाळ्यांची दाद देऊन लोक उठून जातात. फारतर नाटकातल्या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी थांबतात पण नाटक संपल्याबरोबर नाटकासंबंधाने चर्चा ऐकण्यासाठी प्रेक्षक थांबलेले आहेत असे दृश्य या ग्रामीण भागातल्या नाट्यमहोत्सवात पहायला मिळाले. अशा दृश्यांचेही स्वागत निश्चितच व्हायला हवे.

कोविड काळानंतर (Corona) घरातच बसून स्वतःचे मनोरंजन करून घ्यायची लोकांची आवड अफाट वाढली आहे. ‘डिजिटल थिएटर’ नावाचा एक प्रकारही अस्तित्वात आला आहे. थिएटर खरेच असे डिजिटल असू शकते का? फ्रेडरिक शिलर हा जर्मन नाटकार म्हणतो, ‘नाटक (Drama) प्रत्यक्ष पाहणे हा गोष्ट समजून घेण्याचा एक शक्तिशाली भाग आहे. वर्णन करण्यापेक्षा ते थेट आपल्या डोळ्यांनी पाहणे अधिक प्रभावशाली असते. कायद्यांबद्दल जर लोकांना सत्य समजून घ्यायचे असेल तर लोकांना रंगमंचाची सवय लावा.’

शहरात राहणारा असो वा गावात राहणारा, रंगमंचाच्यासंबंधाने ही गोष्ट आपल्याला ठाऊक असलीच पाहिजे- रंगमंच आणि नाटकाची प्रक्रिया भिन्न विचारसरणीच्या प्रोत्साहन देते व अनेक दिशांचे निर्देशन करते. नाटक करणे हे एखादा शोध घेण्यासारखे असते आणि शोधाच्या या प्रक्रियेची अखेर गावात नाट्यमहोत्सवाद्वारे होणे ही गोष्ट फार वेधक आहे.

‘नाटक मरते आहे’ असा सूर वेळोवेळी निघत असतो, पण नाटक कुठेही जात नाही. ते नेहमीच असेल. फक्त आवश्यकता कशाची आहे तर विचारांना आणि प्रयोगांना सामोरे जाणाऱ्या थिएटरची. ती जबाबदारी कलाकार आणि रंगकर्मी आपल्या खांद्यावर घेऊ शकतील (आणि स्वतःचा प्रेक्षक वर्गही तयार करू शकतील). नाटक हे केवळ एक मनोरंजनाचे माध्यम नाही तर तो समाजापुढे धरलेला एक आरसाही आहे. नाट्य सादरीकरणाच्या अनेक शैली आहेत ज्यातून प्रेक्षक स्पष्टपणे स्वतःचे प्रतिबिंब पाहू शकतात व स्वतःचे विश्लेषणही करू शकतात.

खुद्द काणकोणमध्येच अस्तित्वात असलेली ‘गुड्डुल्या गाणी’ (जो प्रकार आज अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे) ही देखील गोष्ट सांगण्याचे माध्यम ठरू शकते. आपली ‘मुळे’ आधाराला घेऊन नाटककार आपल्या सादरीकरणात सखोलता आणू शकतात. ‘काणकोण नाट्यमहोत्सवा’त नाटक या माध्यमाचा असा मूलभूत विचार झाला होता. या महोत्सवाला आर्थिक आधारही ‘क्राउड फंडिंग’च्या माध्यमातून मिळाला. शिवाय काही प्रायोजकही लाभले. गावात गंभीर विषयांच्या नाटकांना प्रतिसाद लाभणार नाही असाही एक समज आहे. आम्ही प्रेक्षकांना फार गृहीत धरतो. प्रेक्षकांना चांगल्या आशयाची सवय लागली तर तोही चांगल्या नाटकांना बांधून नक्कीच राहील. ‘काणकोण नाट्यमहोत्सवा’चे फलित हेच होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

Goa Today's Live News: कॅथलिक विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी - चर्चिल आलेमाव

Sam Pitroda: ‘’भारतात पूर्वेकडील लोक चिनी तर दक्षिणकेडील लोक...’’ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी पुन्हा बरळले

Lok Sabha Election 2024: मतदान करतानाचा फोटो काढताना फातोर्डा येथे महिलेला पकडले; चौकशीअंती सुटका

Watch Video: पाकिस्तानमधील टार्गेट किलिंगमध्ये भारताचा हात; पाक लष्करी अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT