कुंकळ्ळी मतदारसंघात भाजपाचे नव्हे तर युरीचे डबल इंजिन सरकार चालते. आमदार युरी व स्थानिक स्वराज्य संस्थावर ही युरी समर्थक सत्तेवर,असे असतानाही कुंकळ्ळी पालिकेच्या काही प्रभागात योग्य प्रकारे कामे होत नाहीत, होणाऱ्या विकासकामांत आमदारांचे लक्ष नाही, असा आरोप युरी विरोधक नव्हेत तर युरी समर्थकच करू लागलेत. माजी नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांच्या प्रभागात रस्त्यांचे डांबरीकरण योग्य प्रमाणात झाले नाही. रस्त्यांच्या कामात कमिशन पद्धत चालत आहे. असा गंभीर व जाहीर आरोप युरी समर्थक करू लागलेत. स्थानिक जनतेला विश्वासात न घेता दर्जाहीन कामे होत असल्याचा आरोप जोर आहेत. युरीबाब जरा आपल्या मतदारंघाकडे थोडे लक्ष द्या. विरोधकांची नाही तरी, आपल्या समर्थकांचे म्हणणे ऐका. ∙∙∙
हल्लीच पर्वरी येथील राखणदार श्री देव खाप्रेश्वर यांना स्थलांतरित करण्याचा वाद बराच चिघळला. उड्डाणपुलासाठी देवाला आपली जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जायला लागल्याने लोकांच्या भावना दुखवल्या. परंतु देवांचा विषय यावरच थांबणार असे दिसत नाही, कारण भोम येथे देखील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार, असे चिन्ह दिसू लागले आहे. पर्वरी येथे केवळ श्री खाप्रेश्वर यांचा विषय होता, भोम येथे भोमचे राखणदार श्री महारू देव, नारायण देव, मल्लिकार्जुन देव, सातेरी देवी, महादेव या सगळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता रुंदीकरण झाल्यास या देवी आणि देवतांच्या मंदिरांचा भाग जाईल, त्यांना बहुतेक स्थलांतरण करावे लागेल, त्यामुळे सांस्कृतिक परंपरा जसे धेंडलो, तरंग, कालो यांच्यावर परिणाम होऊ शकतो. हा सगळा कारभार पाहून राज्यात देव संकटात आहे की काय, अशी चर्चा होतेय. ∙∙∙
खोल समुद्रात एलईडीचा वापर करून मासेमारी सुरू असून मच्छिमारी खात्याकडे असलेल्या अत्याधुनिक इंटरसेप्टर बोटी असूनही नसल्याप्रमाणेच आहेत. या बोटी वारंवार नादुरुस्त होत असल्याने कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने पारंपरिक ट्रॉलर्स नाराज आहेत. मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर हेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना थातुरमाथूर उत्तर देत त्यातून अंग काढून घेत आहेत. या इंटरसेप्टर बोटी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या एलईडी बोटीपर्यंत पोहचतच नाहीत. अनेकदा काही ट्रॉलर्सधारक धोका पत्करून या बोटींविरुद्ध कारवाई करण्यास खोल समुद्रात जात आहेत. मात्र, सरकार या एलईडी बोटधारकांना छुपा पाठिंबा देते की, पारंपरिक ट्रॉलर्सच्या पाठिशी आहे, याबाबतच शंका आहे. मंत्री हळर्णकर हे कारवाईची भाषा वेळोवेळी करत आले असले तरी यंत्रणाच नसल्याने तेही हतबल आहेत. आता तरी अर्थसंकल्पात सरकारने दिलेल्या निधीतून या बोटी लवकरच दुरुस्त होतील, अशी अपेक्षा ट्रॉलर्स धारकांची आहे. न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होऊन सहा महिने उलटले तरी अजून निवाडाच आलेला नाही. ∙∙∙
‘अजीब हैं गोवा के लोग’ असे विधान देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केले होते, पण आजही राष्ट्रीय स्तरावर अनेकांना याचा अर्थ कळलेला नाही. गोव्यात येऊन आम्ही लगेच यश मिळवू, असे राजकीय पक्षांना वाटत असले तरी ही गोष्ट केवळ कागदावरच सोपी दिसते. याची प्रचिती तृणमूल काँग्रेस पक्षाला आली आहे. ‘दोन फुलांचा काळ, गोंयची नवी सकाळ’ असा नारा देत टीएमसीने गोव्यात प्रवेश केला. तेव्हा राजकीय भूकंप आणत काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांना पक्षात घेऊन दणदणीत सुरूवातही केली होती. त्यावेळी हा पक्ष विधानसभा निवडणुकीत किमान २ – ३ जागा नक्की जिंकणार अंदाज वर्तवला गेला. परंतु घडले विपरीतच कारण पक्षाने भोपळा फोडला, परिणामी आलेली मंडळी आल्या पावली परत गेली आणि फालेरो यांना पक्षानेच घरची वाट दाखवली. यात एकच व्यक्ती पक्षासोबत निष्ठावंत राहिली, ती म्हणजे कुंभारजुवेचे नेते समील वळवईकर. पराभूत होऊनही निवडणुकीनंतर समीलरावांनी एक हाती पक्षाचा किल्ला लढवला, मात्र काल तेही पक्षाला रामराम ठोकून गेल्याने पक्षाकडे एकही नावाजलेला नेता राहिला नाही. त्यामुळे नवीन सकाळ उजवडणाऱ्यांचा गोमंतकीयांनी सूर्यास्त केला की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येतेय. ∙∙∙
राज्यातील सरकारी व कोमुनिदाद जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे व बेकायदा बांधकामे झाली आहेत. ही बांधकामे अनेक वर्षापासून उभी आहेत मात्र सरकारला त्याच्याविरुद्ध कारवाई करायची नव्हती त्यामुळे कधीच त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र उच्च न्यायालयात यासंदर्भातच्या अनेक याचिका दाखल होऊ लागल्याने स्वेच्छा दखल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींना गोवा भेटीवर असताना घ्यावी लागली. यासंदर्भात उच्च न्यायालयाने कारवाईसंदर्भात मार्गदर्शक तत्वे तसेच सूचना सरकारकडूनच जाणून घेऊन ती लागू करण्याचे निर्देश दिले असल्याने सरकार द्विधा स्थितीत सापडले आहे. ही बांधकामे कायदेशीर करण्यासाठी कायदा आणावा लागेल किंवा त्याच्याविरोधात कारवाई करावी लागणार आहे. या बेकायदा बांधकाम ठरवलेली कुटुंबे ही मतदार आहेत व त्यांच्याकडे या पत्त्यावर सर्व ती ओळखपत्रे आहेत. ज्याला या कुटुंबाची मते निवडणुकीत मिळतात त्यांच्याकडूनही काही प्रयत्न होत नाही. त्यामुळे या बेकायदा बांधकामधारकांची स्थिती ‘गरज सरो वैद्य मरो’प्रमाणे झाली आहे. यापूर्वीही सरकारने अशी आश्वासने दिली, मात्र आता तरी ती पूर्ण होतील, अशा अपेक्षेत बेकायदा बांधकामधारक आहेत. ∙∙∙
फोंड्याचे पात्रांव रवी नाईक हे परत एकदा रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे परवा त्यांनी ‘गोमन्तक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीवरून वाटू लागले आहे. म्हणजे तसा सूर त्यांच्या बोलण्यातून निघताना दिसला. पात्रांव कधी स्पष्ट बोलत नसतात. त्यांच्या बोलण्यातला सूर शोधायचा असतो. आणि तसा सूर शोधल्यास ते परत रिंगणात उतरणार असे दिसू लागले आहे. या मुलाखतीत ते गेल्या निवडणुकीत लोकांनी दोन युवा उमेदवारांना नाकारून आपल्याला निवडले हे सांगायला विसरले नाहीत. आणि या त्यांच्या वाक्याची सध्या फोंड्यात जोरदार चर्चा सुरू आहे.आता यातून कोणी काय अर्थ काढायचा तो काढू दे पण पात्रांवाची या वयातील जिद्द खरोखर वाखणण्यासारखीच. म्हणूनच तर त्यांच्याबरोबरचे राजकीय नेते घरी बसलेले असताना पात्रांव मात्र ‘बॅटिंग’ करताना दिसत आहेत. उगाच नाही त्यांना ‘गोंयचो लोकनायक’म्हणून संबोधले जात..... नाही का? ∙∙∙
सध्या जो उठतो तो इतिहासावर बोलताना दिसतो. वास्तविक हल्लीच्या वर्षात इतिहास म्हटला की जो तो नाक मुरडतना दिसत होता त्यामुळे शाळा कॅालेजात इतिहास हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही म्हणे घटत चालली होती. एवढेच नव्हे तर भावी आयुष्यात ज्यांचा उपयोग नाही, तो विषय घ्यायचा तरी कशाला?, असा विचार केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकही करत होते. पण हल्ली छत्रपती शिवाजी महाराज वा औरंगजेबवरून जे वाद उद्भवू लागले आहेत व स्वतःस विचारवंत म्हणविणारेही ती चर्चा लांबवू लागल्याने म्हणे अनेकांना इतिहास विषयाबाबत कुतुहल निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे कदाचित शाळा-कॅालेजात या विषयातील विद्यार्थी संख्या वाढली तर तो खास विषय घेऊन पदवीधर झालेल्यांना चांगले दिवस येऊ शकतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.