Bicholim Cash For Job Scam
डिचोली: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात महिलांपाठोपाठ आता डिचोली पोलिसांनी एका युवकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. नोकरीचे आमिष दाखवून एका युवतीसह डिचोलीतील पाचजणांना मिळून तब्बल २१.५ लाख रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून डिचोली पोलिसांनी माणिकराव राणे या युवकाला अटक केली आहे. संशयित सत्तरी तालुक्यातील रावण-केरी येथील रहिवासी आहे.
माणिकराव राणे याच्या अटकेमुळे ‘कॅश फॉर जॉब’ चे लोण सत्तरी तालुक्यात पोचल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, माणिकराव राणे याला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. तर अन्य यापूर्वी अटक केलेली प्रिया यादव ही अजूनही कोठडीत आहे, अशी माहिती मिळाली.
पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले,की वन-म्हावळींगे येथील शीतल सावळच्या तक्रारीची दखल घेऊन संशयित युवकाला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विराज धाऊसकर या फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
माणिकराव राणे यांनी वेगवेगळ्या सरकारी खात्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून माझ्यासह शेजारी पुजा येंडे, अभिषेक धुरी, सत्यवान गावकर आणि दिनेश गावकर यांना मिळून तब्बल 21.5 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
अशी तक्रार वन-म्हावळींगे येथील शीतल सावळ यांनी डिचोली पोलिसात केली आहे. या तक्रारीची दखल घेवून पोलिसांनी माणिकराव राणे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. माणिकराव राणे याला चौकशीसाठी ताब्यात घेवून नंतर त्याला फसवणूकीच्या आरोपाखाली अटक केली. अशी माहिती आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.