पणजी: राज्यात मगरी, बिबटे व पक्ष्यांची गणना करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व्हेक्षण आणि नकाशे तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी उद्घोषणा वनमंत्री विश्वजीत राणे यांनी केली. मंत्री राणे यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर वनभवन येथे त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, प्राणी, पक्षी गणनेसंदर्भात पुढील दोन महिन्यांत नकाशा तयार करून स्थानिकांना त्याबाबत माहिती दिली जाईल.
मगरींच्या संचाराबाबत जागरूकता निर्माण करून आवश्यक उपाययोजना देखील केल्या जातील. बिबट्यांची संख्या आणि त्यांची वस्ती याबाबत अभ्यास करण्यात येत आहे. बिबटे केवळ गोव्यातच नव्हे तर इतर राज्यांतही गावांमध्ये वावरतात, ते तिथेच राहतात. त्यांच्या वावराच्या जागा ओळखून वन खात्याने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले.
गोवा वन विभागाचे स्वतंत्र इस्पितळ सध्या उपलब्ध नाही. त्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे. आम्ही इस्पितळासाठी जमीन देऊ शकतो. बंगलोर येथील ‘एसओएस’ कंपनी उद्या गोव्यात येणार आहे, अशी माहिती राणे यांनी दिली. ब्लॅक पँथरच्या दुर्घटनेवर भाष्य करताना राणे म्हणाले की, अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वन क्षेत्रातील ‘हॉट स्पॉट’वर सार्वजनिक बांधकाम खात्याला ‘स्पीड ब्रेकर’ बसविण्याबाबत कळविण्यात आले आहे. दरम्यान, पावसाळा जवळ येत असल्याने संपूर्ण विभागीय नियोजन करण्यासाठी विशेष बैठक घेण्यात आली. पर्यावरण रक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि जनजागृती यावर भर देण्यात येणार असल्याचे वनमंत्री राणे म्हणाले.
वाघेरी हा डोंगर संरक्षित जंगल म्हणून घोषित करायचा मानस आहे. जर हे शक्य नसेल तर तो खासगी वनक्षेत्रात किंवा अभयारण्यात आणण्याचा प्रयत्न असेल. तेथे बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही. काहीजण आरोप करतात की मी डोंगर विकतो म्हणून. पण मी किंवा माझ्या वडिलांनी आजवर कधीच जमीन कन्व्हर्ट केलेली नाही, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
पावसाळा तोंडावर आला असून ‘सेव्ह फ्रॉग’ अभियान हाती घेण्यात येणार आहे. तसेच त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हे अभियान खूपच महत्त्वाचे आहे. त्यासाठी विशेष कृतिदल तयार करण्यात येईल, असे मंत्री राणे म्हणाले.
राज्यातील ३५५० खारफुटी राखीव करण्याचा माझा विचार आहे. तसेच खाजगी वन क्षेत्राचे बरेच दावे निकाली काढले असले तरी बाकी राहिलेले ४८० दावे लवकर निकाली काढण्याचे निर्देश मी दिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.