Vijai Sardesai: 8 डिसेंबर रोजी मडगावात होली स्पिरिट चर्चचे फेस्त साजरे होणार आहे. कित्येक दशकांपासून या फेस्तानिमित्त ओल्ड मार्केटमध्ये फेस्त फेरी भरते. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी वाहतूक कोंडीचा प्रश्र्न उपस्थित करून ही फेरी केवळ तीन दिवसांची असावी व त्या दृष्टीने नगरपालिकेने निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.
पालिकेला जर फेरी भरवायचीच असेल तर ती मडगाव शहरातील आके येथील कॉस्ता मैदानावर किंवा अन्य ठिकाणी भरवावी. जर पालिकेने योग्य निर्णय घेतला नाही तर नागरिकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागेल, असा इशाराही सरदेसाई यांनी दिला आहे.
पूर्वीच्या व आताच्या फेस्त फेरी भरण्यामध्ये जागेसंदर्भात, मांडणीसंबंधात अनेक बदल झालेले आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्र्न उपस्थित करून गेल्या काही वर्षांपासून ओल्ड मार्केटमध्ये ही फेरी न भरता एसजीपीडीए मैदानावर किंवा नगरपालिकेच्या जागेत भरत आहे. मात्र, यंदा या फेस्त फेरीला विरोध होत आहे.
सरदेसाई यांनी आरोप केला की सोपो गोळा करणारा कंत्राटदार नसल्याने दुकाने म्हणे सत्ताधारी नगरसेवकांना वाटण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत फेस्त फेरी भरवावी की न भरवावी हा निर्णय राज्य सरकारने एक-दोन दिवसांत घ्यावा.
वाहतुकीवर पोलिसांचे नियंत्रण असेल
सावियो नोरोन्हा, जुझे मारिया मिरांडा, एडविन लॉरेन्सो या नागरिकांनी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांची भेट घेऊन जुन्या मार्केटमध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीसंदर्भात निर्णय घेण्याचे निवेदन सादर केले आहे.
जर फेस्ताला मान्यता दिली तर वाहतूक कोंडीची तीव्रता अधिकच जाणवेल व सासष्टीतील लोकांना भयंकर त्रास सहन करावा लागेल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. वाहतूक कोंडीवर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण असेल, असे त्यांना नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.