वास्को: बोगदा येथे सरकारी कामात अडथळा आणून वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांना धमकी दिल्याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर आज गुरुवारी गुन्हा नोंद केला. सदर प्रकरण २८ फेब्रुवारीला घडले होते.
शेट्ये यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर मुरगाव पोलिस तसेच दक्षिण गोवा अधीक्षकांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंद न केल्याने शेट्ये यांनी वास्को प्रथमश्रेणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायाधीश पूजा देसाई यांनी गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला. त्यानुसार ओमकार दुर्भाटकर, यश फडते, योगेश पाटील, सुधीर तारी तसेच इतरांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेट्ये व इतर अभियंते बोगदा येथील वीज खात्याच्या वसाहतीमधील चारपैकी एक वाट बंद करण्याच्या कामासाठी आले होते. तथापि तेथील काही रहिवाशांनी तसेच ओमकार दुर्भाटकर, यश फडते, सुधीर तारी, योगेश पाटील यांनी त्यांना विरोध केला होता. वाट बंद करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या कुंपणाच्या कामात अडथळा त्यांनी आणला होता. पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने काशिनाथ शेट्ये यांनी वास्को प्रथमश्रेणी न्यायालयात धाव घेतली होती. आता एक महिन्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी ग्रामस्थांनी बाजू उचलून धरली होती. तसेच त्यांनी शेट्ये यांना रोखले होते. त्यानंतर काशिनाथ शेट्ये आणि तेथील काही रहिवाशांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या होत्या. वीज खात्याच्या वसाहतीत कुंपण बांधण्यास मज्जाव करून काम बंद पाडल्याने सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. संशयित चौघे रहिवाशांना चिथावणी देत होते. त्यामागे तेथे दंगल घडविण्याचा त्यांचा हेतू होता असा आरोप शेट्ये यांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.