वाळपई: येथील नवीन खाऊ कट्टा संकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, आता त्याच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. खवय्ये आणि गाडेधारक या दोघांनाही या संकुलाची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.
वाळपईत गेल्या अनेक वर्षांपासून भेलपुरी, पाणीपुरी, रगडा पेटीस, मसाला पुरी, वडापाव, मिरची भजी, समोसे आदी विविध प्रकारचे फेरीवाले आपला व्यवसाय करत आहेत. सायंकाळपासून रात्रीपर्यंत या गाड्यांवर मोठ्या प्रमाणावर खवय्ये गर्दी करताना दिसतात. पूर्वी वाळपई नगरपालिकेच्या भाजीफळ मार्केटच्या पटांगणात हा व्यवसाय सुरू होता.
गतवर्षी सरकारने या ठिकाणी ‘खाऊ कट्टा’ या संकल्पनेवर आधारित नवीन संकुल बांधण्याचे काम हाती घेतले होते. काम पूर्ण होईपर्यंत गाडेधारकांना ठाणे मार्गावरील पालिका मैदानाच्या बाजूला, रस्त्यालगत तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. आजही त्यांचा व्यवसाय तेथेच सुरू आहे.
सद्यस्थितीत ज्या ठिकाणी गाडेधारकांचा व्यवसाय सुरू आहे, त्या भागात सायंकाळच्या वेळी डासांची मोठ्या प्रमाणात पैदास झाल्याने त्रासदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. डासांमुळे आरोग्याचा धोका निर्माण होत असून, अशा वातावरणात खाद्यपदार्थ विक्री आणि सेवन कितपत सुरक्षित आहे, हा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
उद्घाटन लांबणीवर पडल्याने नाराजी
नवीन संकुल पूर्ण असूनही त्याचे उद्घाटन लांबणीवर पडत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. नवीन प्रकल्पात जुन्या गाडेधारकांना जागा देण्यात येणार असून, संकुलात बसण्याची सोय, पंख्यांची व्यवस्था आणि स्वच्छ परिसर यामुळे खवय्यांसाठी अधिक सुरक्षित आणि आकर्षक वातावरण निर्माण होईल. मुळे सरकार आणि वाळपई नगरपालिकेने या नवीन संकुलाचे तातडीने उद्घाटन करून गाडेधारकांना तिथे स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.