Uguem tiracol firing Dainik Gomantak
गोवा

Firing Case: नेमका ‘शूटर’ कोण समोर येणार? उगवे प्रकरणातील 'ते' पोलीस होते गोळीबार करणाऱ्या गटात; संशयितांविरोधात गुन्हा दाखल

Naibag Firing Case: गेल्‍या अनेक वर्षांपासून या भागात शेती बागायतदार व रेती व्‍यावसायिकांमध्‍ये सुरू असलेल्‍या वादातूनच हा गोळीबार झाल्‍याचा संशय स्‍थानिक जनतेकडून व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: जैतीर-उगवे येथील तेरेखोल नदी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्‍या गोळीबारप्रकरणी अटक केलेल्‍या ऋषिकेश दशरथ महाले आणि गंगाराम गोपीचंद महाले या दोन आयआरबी पोलिसांवर शिस्‍तभंगाची कारवाई करण्‍यात येणार असल्‍याचे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्‍ता यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

गेल्‍या अनेक वर्षांपासून या भागात शेती बागायतदार व रेती व्‍यावसायिकांमध्‍ये सुरू असलेल्‍या वादातूनच हा गोळीबार झाल्‍याचा संशय स्‍थानिक जनतेकडून व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

७ ऑक्‍टोबरच्‍या मध्‍यरात्री जैतीर-उगवे येथील तेरेखोल नदी परिसरात गोळीबार झाल्‍याची घटना घडली. त्‍यात तेरेखोल नदीतून बेकायदेशीररीत्‍या रेती काढणाऱ्या रमेश पासवान आणि लालबहादूर गोंड हे बिहारमधील दोन कामगार गंभीर जखमी झाले.

तीन वर्षांपूर्वी कुडचडेत घडलेल्‍या अशाप्रकारच्‍या घटनेची पुन्‍हा पुनरावृत्ती झाल्‍याने राज्‍यभरात खळबळ उडाली होती. शिवाय विरोधी पक्षांच्‍या आमदारांनी या घटनेचा आधार घेत राज्‍यातील कायदा-सुव्‍यवस्‍थेवर बोट ठेवले होते.

त्‍यामुळे या प्रकरणातील आरोपींना तत्‍काळ अटक करण्‍याचे निर्देश मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. त्‍यानुसार पेडणे पोलिसांनी तपासाला गती देत तेमवाडा-उगवे येथील नेहल नितीन महाले (वय २० वर्षे), आशिष शिवाजी महाले (वय २४ वर्षे), आकाश अरुण महाले (वय २४ वर्षे), ऋषिकेश दशरथ महाले (वय ३२ वर्षे), गंगाराम गोपीचंद महाले (वय ३४ वर्षे) या पाच संशयितांना अटक केली.

यातील ऋषिकेश आणि गंगाराम हे दोघे आयआरबी पोलिस असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. ऋषिकेश आणि गंगाराम हे गोळीबार करणाऱ्यांच्‍या गटात असल्‍याचे सिद्ध झाल्‍याने या दोघांवरही शिस्‍तभंगाची कारवाई करण्‍यात येईल. संशयितांविरोधात खुनाचा प्रयत्न करण्‍यासह अन्य गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली बंदूक तसेच वाहन लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे राहुल गुप्‍ता यांनी नमूद केले. यावेळी गुन्हा अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक तुषार लोटलीकर आणि पेडण्याचे निरीक्षक सचिन लोकरेही त्‍यांच्‍यासोबत उपस्थित होते.

दरम्‍यान, या प्रकरणाच्‍या तपासात पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्‍यासह गुन्हा अन्वेषण विभागाचे उपाधीक्षक राजेश कुमार, तुषार लोटलीकर, उपनिरीक्षक साहिल नाईक, हरीश वायंगणकर, प्रथमेश पार्सेकर, प्रवीण सीमेपुरुषकर, तुकाराम चोडणकर, हवालदार तीर्थराज म्हामल, कॉन्स्टेबल शशांक साखळकर, सागर खोर्जुवेकर, प्रज्योत मयेकर, कृष्णा वेळीप, अर्जुन कळंगुटकर, संदेश वरक यांचा सहभाग होता.

अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्षाचा आरोप

1 जैतीर-उगवे येथील तेरेखोल नदीतील रेती गेल्‍या अनेक वर्षांपासून काढण्‍यात येत आहे. त्‍यामुळे नदीचे पात्र रूंद होऊन नदीचे पाणी आजुबाजूच्‍या शेती-बागायतीत जाऊन पिकांची हानी होत असल्‍याचा मुद्दा स्‍थानिकांनी उठविला आहे.

2 शेतीचे नुकसान थांबवण्‍यासाठी बेकायदा रेती काढणाऱ्यांवर कारवाईची मागणी करीत स्‍थानिकांनी अनेकदा करत पेडणे मामलेदार व पेडणे पोलिस स्थानकावर मोर्चेही नेले आहेत.

3 रेती उपसा करण्‍यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही रेती माफिया पोलिस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून रेती उपसा करीत असल्‍याच्‍या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्‍यावर सरकारकडून तोडगा निघत नसल्‍यामुळे स्‍थानिक शेतकरी आणि रेती माफियांमध्‍ये जो संघर्ष सुरू होता. त्‍यातून हा गोळीबार झाल्‍याचा संशय स्‍थानिक जनतेकडून व्‍यक्त होत आहे.

टॉवर लोकेशनमुळे अडकले पोलिस

रेती उत्खनन प्रकरणात दोन आयआरबी पोलिस पकडले आहेत. त्यांचे टॉवर लोकेशन पाहिले आणि त्यानुसार त्यांना पकडले. आता बंदूक कुठली वापरली आणि ती कुठे आहे, हे पोलिस चौकशीत स्पष्ट होईल.

जखमी कामगारांवरही गुन्‍हा नोंद

जैतीर-उगवेत नेमका गोळीबार कुणी केला, हे अद्याप समोर आलेले नाही. संशयितांच्‍या चौकशीतूनच नेमका ‘शूटर’ कोण हे समोर येईल, असे राहुल गुप्‍ता म्‍हणाले. तेरेखोल नदीत बेकायदा रेती काढण्यास बंदी असतानाही रेती काढणाऱ्या दोन रेती व्यावसायिकांसह अन्य पाच मजुरांना अटक केली आहे. शिवाय गोळीबारात जखमी झालेल्या दोन्‍ही कामगारांवरही गुन्हा नोंद केल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या भागात बेकायदा रेती व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांची चौकशी करण्यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

युरी, विजय यांचे सरकारवर टीकास्त्र

जैतीर-उगवे येथील गोळीबारप्रकरणी आयआरबीच्‍या दोन पोलिसांसह पाचजणांना अटक केल्‍यानंतर या प्रकरणाचा आधार घेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. गोळीबार प्रकरणात पोलिसांनाच अटक होते, यावरूनच राज्‍यातील कायदा-सुव्‍यवस्‍था ढेपाळल्‍याचे दिसून येते, अशी टीका या दोघांनीही केली.

भाजप सरकारने गोव्यातील पोलिस स्थानके गुंडांच्या टोळीत रूपांतरीत केली आहेत. गुन्हेगारी, अमली पदार्थ व्यवहार तसेच हप्ते घेण्‍याच्‍या प्रकरणांत राज्‍यातील पोलिसच गुंतले आहेत. कायदा-सुव्‍यवस्‍था अबाधित ठेवण्‍यासाठी ज्‍या पोलिसांची युक्ती केली जाते, तेच पोलिस अशाप्रकारच्‍या प्रकरणांत गुंतल्‍याचे वारंवार समोर येणे, ही शरमेची बाब आहे.

गोव्‍यात सध्‍या पोलिस आणि गुंडांमधील फरक ओळखणेही कठीण झाले आहे, अशी टीका आलेमाव यांनी केली. तर गोळीबार प्रकरणातील पोलिसांच्‍या सहभागावरून राज्‍यात पोलिसच गुंड झाल्‍याचे स्‍पष्‍ट होते, असे आमदार सरदेसाई यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

Margao Dindi Utsav: 'पंढरपूरला पोर्तुगीज जायला देत नाही तर प्रत्‍यक्ष पंढरपूरच मडगावी आणायचं’, आनंद पर्वणी दिंडी महाेत्‍सव

SCROLL FOR NEXT