Mandrem Accident|Nanoda Accident Dainik Gomantak
गोवा

मासळी मार्केटकडे जाताना दोन युवतींवर काळाची झडप; नानोडा येथे कारच्या धडकेत दोघे ठार

Accidents in Goa: मांद्रे येथे भीषण अपघातात नणंद आणि भावजय ठार; अस्नोडा-दोडामार्ग अपघातात दोन युवकांचा मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे/ डिचोली: मांद्रे येथे भीषण अपघातात नणंद आणि भावजय ठार होण्याच्या घटनेला काही तास उलटल्यानंतर शनिवारी रात्री डिचोलीत भीषण अपघात घडला. अस्नोडा-दोडामार्ग रस्त्यावरील नानोडा येथे झालेल्या अपघातात दोन स्थानिक युवक जागीच ठार झाले. एकाच दिवशी दोन अपघातांत चारजण ठार झाले.

मांद्रेत शनिवारी मांद्रे पंचायतीजवळ झालेल्या भीषण अपघातात सानिका खर्बे (वय १९ वर्षे) आणि प्रियांका खर्बे (वय २९ वर्षे) या दोघी ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाल्या, तर दुचाकीस्वार सिद्धी शेटकर ही युवती गंभीररित्या जखमी झाली. मृत सानिका आणि प्रियांका या नात्याने नणंद-भावजय असून जखमी सिद्धी ही प्रियांकाची बहीण आहे.

सविस्तर माहितीनुसार, सानिका सुभाष खर्बे, प्रियांका संदेश खर्बे आणि सिद्धी शेटकर या तिघी शनिवारी स्कूटर (जीए-११-सी-२०२९) घेऊन मांद्रे मासळी मार्केटकडे मासे आणायला निघाल्या असता, मासळी मार्केटच्या दोनशे मीटर अलीकडे एक मालवाहू रिक्षा मांद्रेतून हरमलकडे जात होती, तर त्यांच्या समोरून येणारा ट्रक (केए-११-डी-४८२२) मांद्रेमार्गे आगरवाडा-शिवोलीकडे जात होता. दुचाकीस्वार युवतीने रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, रिक्षाच्या मागच्या बाजूला दुचाकीची धडक बसली आणि दुचाकीसह त्या तिघी रस्त्यावर कोसळल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली त्या सापडल्या.

या अपघातात सानिका आणि प्रियांका या दोघी जागीच ठार झाल्या, तर दुचाकीस्वार सिद्धी गंभीर जखमी झाली. तिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रकचालक आणि रिक्षाचालकाला मांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मांद्रेचे पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच मालवाहू रिक्षाचालक आणि ट्रकचालक यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. ट्रकचालक कन्नप्पा वंतामुती एन आणि रिक्षाचालक दयानंद बांधकर यांना पाेलिसांनी याप्रकरणी अटक केली असून याप्रकरणी मांद्रे पोलिस अधिक तपास करत आहेत.

जमावाने रोखला ट्रक

अपघात झाल्यानंतर मोठा जमाव जमल्यामुळे घाबरलेल्या ट्रकचालकाने तेथून पलायन केले. मात्र, आगरवाड्यापर्यंत गेल्यानंतर जमावाने तो ट्रक अडविला. या अपघातात एकाच घरातील दोघेजणी जागीच ठार झाल्यामुळे आस्कावाडा-मांद्रे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आस्कावाडा परिसरावर शोककळा

सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केल्यानंतर निदान आज तरी मासे खायला मिळतील, या उद्देशाने त्या तिघी मिळून एकाच दुचाकीवरून मासळी मार्केटकडे निघाल्या असता वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली. या दुर्दैवी घटनेमुळे आस्कावाडा-मांद्रे परिसरावर शोककळा पसरली आहे.

दोन मुले पोरकी

सानिका ही आयटीआय करत होती, तर जखमी झालेली सिद्धी ही उच्च माध्यमिक शिक्षण घेत आहे. प्रियांका या गृहिणी असून त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या निधनामुळे ही मुले पोरकी झाली आहेत. मृत प्रियांका यांची सानिका ही नणंद होती, तर जखमी सिद्धी ही प्रियांका यांची सख्खी बहीण आहे.

कारची दुचाकीला जोरदार धडक

नानोडा अपघातातील मृतांची प्रतीक कानोळकर आणि लक्ष्मण मळीक अशी नावे आहेत. हा अपघात रात्री साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान घडल्याचे सांगण्यात आले. हे युवक दुचाकीवरून अस्नोडामार्गे नानोड्याच्या दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या कारला दुचाकीची जोरदार धडक बसली. यात दुचाकीवरील दोघेही युवक जागीच गतप्राण झाले. अपघाताची माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. हा अपघात घडला, त्याचवेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये त्याठिकाणी पोचले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT