Tuyem Hospital Committee
पेडणे: तुये इस्पितळ कृती समितीतर्फे तुये येथे बांधण्यात आलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित इस्पितळाच्या इमारतीत इस्पितळ तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीबाबत जनजागृती करण्यासाठी पेडणे नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्ष शिवराम तुकोजी, नगरसेवक माधव शेणवी देसाई, सिद्धेश पेडणेकर, मनोज हरमलकर या नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी तुये इस्पितळ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे इस्पितळ सुरू व्हावे म्हणून चालवलेल्या मोहिमेची त्यांना माहिती दिली.
यावेळी तुये इस्पितळ कृती समितीत निमंत्रक जुझे लोबो, देवेंद्र प्रभुदेसाई, भास्कर नारुलकर, तुळशीदास राऊत, नीलेश कांदोळकर, ॲड. प्रसाद शहापूरकर, राजमोहन शेट्ये, चंद्रकांत सांगळे, रामा सावळ देसाई यांचा समावेश होता. या मागणीशी कसलाही राजकीय संबंध नसल्याचे यावेळी समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले. समितीची ही मागणी रास्त असून पेडणे पालिका मंडळाचा या मागणीला पूर्ण पाठिंबा असल्याचे नगराध्यक्ष शिवराम तुकोजी व नगरसेवक माधव सिनाय देसाई यांनी सांगितले.
तुये येथे बांधण्यात आलेल्या इमारतीत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित असलेले इस्पितळ २०१६ मध्ये कार्यान्वित होणे आवश्यक होते. या इमारतीत इस्पितळ सुरू करण्यासाठी आतापर्यंत अनेकदा निविदा काढल्या; पण प्रत्यक्षात निविदा काढूनही इस्पितळाचे काम सुरू होऊ शकले नाही.
समितीने या इमारतीत इस्पितळ सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली असता सध्या तुये येथे असलेले इस्पितळ १ डिसेंबर २०२४ रोजी नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत नेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
त्याला समितीने विरोध दर्शवून ही इमारत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित इस्पितळासाठी बांधलेली असून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित इस्पितळच या इमारतीत होणे आवश्यक असल्याचे समितीने त्यांना सांगितले.
तसेच या इमारतीत खासगी तत्त्वावर इस्पितळ सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नसून त्याला समितीने तीव्र आक्षेप घेतल्याची माहिती यावेळी देवेंद्र प्रभुदेसाई यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.