Watersports closed at Calangute beach after boat accident
म्हापसा: बुधवारी जलसफरीवेळी झालेल्या दुर्घटनेनंतर कळंगुट समुद्र किनाऱ्यावर गुरुवारी दिवसभर जलक्रीडा प्रकार बंद होते. या दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या बोटीचा परवाना निलंबित केल्याचा आदेश बंदर कप्तान खात्याने जारी केला. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
खेड-रत्नागिरी येथील ४५ वर्षीय तरुणाचा कळंगुट येथे जलसफरीवेळी दुर्दैवी मृत्यू झाला होता. या बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक असल्याने ओव्हरलोड होऊन बोट समुद्रात कलंडली. यावेळी बोटीतील सर्व पर्यटक पाण्यात बुडाले. त्यातच सूर्यकांत पोफळकर (वय ४५ वर्षे) याला प्राणाला मुकावे लागले होते. या घटनेनंतर स्थानिक आमदारासह प्रशासकीय यंत्रणा जाग्या झाल्या आहेत.
या सर्व अधिकारिणींच्या प्रतिनिधींनी गुरुवारी कळंगुट किनारी संयुक्त पाहणी करीत बोटमालकांना आवश्यक सूचना केल्या.
आमदार मायकल लोबो यांनी पोलिसांना उल्लंघनकर्त्यांवर, विशेषतः दलालांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच जलसफरीवेळी बोटमालकांकडून होणाऱ्या हलगर्जीपणाबाबत आमदारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
या दुर्घटनेनंतर खेडमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर इतर पाचजण गंभीर जखमी झाल्याने संबंधितांना गोमेकॉत हलविले होते. या दुर्घटनेमुळे जलसफर करणाऱ्या बोटीतील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जाते, बोटींवर पुरेशा प्रमाणात लाईफ जॅकेट, रिंग बोयाज उपलब्ध नसतात. त्याचप्रमाणे जीर्ण बोटींचा जलसफरीसाठी वापर होणे, वाहतूक करताना नेमलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब न करणे आदी मुद्दे प्रकर्षाने आता समोर आले आहेत.
कळंगुटमध्ये जलसफरीवेळी झालेल्या दुर्घटनेला पर्यटन खाते, बंदर कप्तान व पोलिस यंत्रणा जबाबदार आहेत. या खात्यांमध्ये समन्वय नसल्यानेच ही दुर्घटना घडली. बंदर कप्तानला फक्त कॅसिनोंची काळजी आहे. जलसफरीवेळी ओव्हरलोड होतोय, परंतु तिथे नजर ठेवण्यासाठी कुठलीच प्रशासकीय यंत्रणा नसते. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची सरकारला काळजी घेता येत नाही, हेच या दुर्घटनेतून स्पष्ट होते. सध्या राज्यात सरकारी यंत्रणांचा अनागोंदी कारभार सुरू असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी केली आहे.
कळंगुट समुद्रकिनारी जलसफरीदरम्यान झालेल्या बोट दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून बोट ऑपरेटर धारेप्पा झिराली (वय ४२ वर्षे, रा. बेळगाव) आणि इब्राहीम साब (वय ३४ वर्षे, रा. शिमोगा) यांना गुरुवारी पणजी किनारी पोलिसांकडून अटक करण्यात आली, तर बोटमालक मीना कुतिन्हो यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोघांना उद्या (शुक्रवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
बुधवारी ज्या बोटीचा अपघात झाला, त्या बोटीची क्षमता दहा प्रवासी तसेच चालक-हेल्पर मिळून एकूण बारा जणांची होती. तरीही या बोटीवर वीसहून अधिक पर्यटक भरले होते. यातील काहींना लाईफ जॅकेटही पुरविले नव्हते, असे सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.