तुमचे नातेवाईक जर तुमच्याकडे यायचे असतील आणि त्यांना गोवा (Goa) फिरवून दाखवायला तुमच्यापाशी वेळ नसेल तर आता चिंतेचे कारण नाही. त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये, गुगल प्ले -स्टोअरवर असलेले ‘टुरिझम ऑफ गोवा’ (Tourism of Goa) हे ॲप (App) डाऊनलोड करायला सांगा. एकदा हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर गोव्यातल्या साऱ्या महत्त्वाच्या आणि आकर्षक स्थळांबद्दल आणि त्यांच्या ठिकाणांबद्दल हे ॲप त्यांना माहिती करून देईल.
त्यांना आवडलेल्या स्थळांकडे बिनचूक पोहचण्यासाठी ते त्यांना दिशादर्शनही करेल. गोव्याचे समुद्रकिनारे (Beach) , देवळे (Temple) , चर्चेस (Church) , किल्ले (Forts) , धबधबे (Waterfall) , वस्तुसंग्रहालये, अभयारण्ये, कॅसिनो, अशा गोव्याचे (Goa) आकर्षण असलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती या ॲपद्वारे सहज मिळू शकते. इतकेच नव्हे तर जवळ असणारे टॉयलेट्स, पेट्रोलपंप (Petrol Pump) यांच्या खुणाही हे ॲप आपल्याला दाखवते. गोव्यात सध्या काय घडते आहे हे एखाद्या परक्या माणसाला समजून येण्यासाठी गोव्याची सारी वर्तमानपत्रे आणि नियतकालिकेही ऑनलाईन (Online) वाचण्याची सोय या ॲपद्वारे होऊ शकते. खुद्द अनेक गोमंतकीयांना (Gomantak) गोव्याची बरीच माहिती नाही. त्यांच्यासाठीही हे ॲप मोलाचे मार्गदर्शक बनू शकते.
हे ॲप, जे गोवा (Goa) जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटकांसाठी हातातले अत्यंत महत्त्वाचे साधन बनू शकते, ते कोणी निर्माण केले आहे असे तुम्हाला वाटते? हे ॲप निर्माण करणारा आयटी (IT) क्षेत्रातला कुणी उच्चशिक्षित नसून तो अवघ्या बारा वर्षे वयाचा एक शालेय विद्यार्थी आहे. नाव आहे, व्यंकटेश धेंपे! व्यंकटेश पणजी (Panaji) येथील शारदा विद्यालयात आता सातवीच्या वर्गात आहे. त्याने हे ॲप जेव्हा बनवले तेव्हा तो सहावीत होता. कोरोनामुळे साऱ्यांनाच घरी असण्याची सक्ती झाली होती. व्यंकटेशची शाळा ऑनलाईन चालू होती. त्या दरम्यान आलेल्या सुट्टीचा उपयोग करून, शाळेचा अभ्यास सांभाळून व्यंकटेशने साडेतीन महिन्यात ह्या ॲपची निर्मिती केली.
खरंतर ‘गुगल इंडिया’ (Google India) ने जाहीर केलेल्या ‘ॲप निर्मिती’ स्पर्धेमुळे हे ॲप तयार करण्यासाठी तो पुढे सरसावला. स्पर्धेत त्याला या ॲपसाठी गुगलचे पारितोषिकही प्राप्त झाले. पारितोषिक मिळाल्यानंतरही, ॲपमध्ये अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि त्यात आणखीन वैशिष्ट्यांचा अंतर्भाव करण्यासाठी व्यंकटेशने ॲपवर काम करणे जारीच ठेवले. पर्यटन (Tourism) या विषयाशी संबंधित असलेल्या अनेकांना तो या काळात भेटला व त्यांच्या सूचनांचा विचार करून त्याने आपले हे पुरस्कारप्राप्त ॲप अधिक विकसित केले. त्याच्या या साऱ्या प्रक्रियेदरम्यान त्याच्या आई वडिलांचेही त्याला खूप पाठबळ लाभले. विशेषतः सुरुवातीच्या काळात त्याच्या आईच्या सूचना त्याच्यासाठी फार मोलाच्या होत्या.
ॲप बनवण्यासंबंधीचे शिक्षण व्यंकटेशने ऑनलाईन कोर्स करून मिळवले आणि ‘एमआयटी इन्वेंटर’ हे सॉफ्टवेअर वापरून आपल्या ॲपची रचना केली. त्यापूर्वी ‘रोबोटिक्स’ संबंधी त्याने ट्युटोरियल पूर्ण केले होते. ‘रोबोटिक्स’ हा देखील व्यंकटेशच्या आवडीचा विषय आहे. पुढे भविष्यात हा विषय इतरांना मोफत शिकवण्याची त्याची इच्छा आहे. आपले म्हणणे नम्रपणे, परंतु स्पष्टपणे मांडणारा व्यंकटेश या क्षेत्रातला उत्तम शिक्षक नक्कीच बनू शकतो पण एक ‘मेकॅनिकल इंजिनियर’ म्हणून आपले कार्यक्षेत्र घडवण्याचेही त्याने ठरवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.