Goa Theft Cases : राज्यात आज दोनापावला, म्हापसा आणि बोणबाग - बेतोडा येथे एकूण चार ठिकाणी चोरीच्या घटना घडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह २.९१ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यात दोनापावला येथील एका कार्यालयातील सहा लॅपटॉप व एक आयफोन मिळून सुमारे अडीच लाखांची चोरी झाली.
म्हापशातील एका डॉक्टराच्या घरातील १० हजार रुपये चोरट्याने लंपास केले. बोणबाग - बेतोडा येथील भंगारअड्यातून ३१ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या साहित्याची चोरी झाली. या घटनेत दोघांना अटक करण्यात आली आहे.
दोनापावला येथील ला ओशियाना या संकुलामध्ये असलेल्या कार्यालयाच्या स्वयंपाक खोलीच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लॅपटॉप व एक आयफोन मिळून सुमारे अडीच लाखांची चोरी केली. ही घटना काल दुपारी घडली. पणजी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यालयाचे मालक रोहन विजय कोल्हापुरे यांनी चोरीची तक्रार दाखल केली आहे. ते दुपारच्यावेळी कार्यालय बंद करून गेले असता चोरट्यांनी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या स्वयंपाक खोलीच्या दाराचे कुलूप तोडले व चोरी करून पसार झाले.
त्यांनी कार्यालयातील एचपी, आसूस व डेल कंपनीचे प्रत्येकी एक लॅपटॉप, तर लेनोवो कंपनीचे ३ लॅपटॉप चोरले. तसेच तेथे असलेला सुमारे ४२ हजारांचा आयफोनही चोरला. हा प्रकार तक्रारदार कार्यालयात आले असता उघडकीस आला.
कार्यालयातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरट्यांनी कार्यालयातील कपाटाची ड्रॉव्हर्स उघडली होती. मात्र त्यांच्या हाती रोख रक्कम लागली नाही.
म्हापशातील दोन घरांत चोरीचा प्रयत्न!
गणेशपुरी-म्हापसा येथे भरदिवसा दोन घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना आज दुपारी १.३० च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
गणेशपुरी येथे दोन घरांच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
यातील एका घरातील कपाटातील साहित्य हे अस्ताव्यस्त पडलेले आढळले. या डॉक्टरच्या घरातून १० हजार रुपये लंपास झाले होते, तर, दुसऱ्या घरातून प्रथमदर्शनी काही चोरीला गेले नव्हते. याप्रकरणी म्हापसा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
तांब्याचे साहित्यही लुटले
बोणबाग - बेतोडा येथील भंगारअड्यातून ३१ हजार रुपये किमतीचे तांब्याचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी फैजल खान (दवर्ली - मडगाव) याला पहाटे, तर इस्माईल शेख मडगाव याला सायंकाळी अटक केली.
चोरीत वापरलेली वॅगनर कारही पहाटे जप्त केली आहे. या चोरी प्रकरणात आणखी एका संशयिताचा समावेश आहे. या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.
फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य वेळीप तपास करीत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.