काणकोण: ग्रामीण भागात होणारा पारंपारिक शिमगोत्सव हा एक लोक संस्कृतीचा मोठा भाग आहे. शिमगोत्सवाच्या माध्यमातून आद्य संस्कृती गावात टिकलेली आहे. ही संस्कृती टिकून राहण्यासाठी नवीन पिढीने शिमगोत्सवाची परंपरा शिकणे गरजेचे आहे. पारंपरिक शिमगोत्सव काळात विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन शैक्षणिक सांस्कृतिक वेळापत्रकाचा मेळ साधा अशी मागणी कला व संस्कृती खाते तसेच शिक्षण खात्याकडे ट्रायबल रिसर्च सेंटर गोवा तर्फे करण्यात आली आहे.
(The Tribal Research Center Goa has demanded that the students be given a holiday during the traditional Shimgotsav festival)
जेव्हा पारंपारिक शिमगोत्सव सुरू होतो तेव्हा त्याच वेळी नेमक्या शाळेच्या परीक्षा सुरू होतात, त्यामुळे शाळेत शिकणारा विद्यार्थी, शिक्षणाशिवाय आपले भवितव्य घडवणे शक्य नसल्याचा विचार करून परिक्षेला प्राधान्य देतो व आपल्या पारंपरिक शिमगोत्सवा पासून वंचित राहातो.
अशा स्थितीत नवोदित पिढी आपली संस्कृती आत्मसात करूच शकणार नाही आणि टिकवू ही शकणार नाही. ही संस्कृती व पारंपरिकता टिकवण्यासाठी शाळेत शिगमोत्सवाला दीर्घ काळ सुट्टी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शिगमोत्सवावेळी शाळेला सुट्टी मिळण्यासाठी नियोजन करावे असे निवेदन ट्रायबल रिसर्च सेंटर गोवा तर्फे अध्यक्ष देविदास गावकर, सचिव सत्यवान वेळीप आणि सहकारी निलेश वेळी यांनी कला आणि संस्कृती खाते व शिक्षण खात्याला दिले आहे.
शिमगोत्सव हा सुमारे 18 ते 20 दिवस चालणारा ग्रामीण भागातील लोकांचा सर्वात मोठा सण आहे. ह्या सणांमध्ये विविध प्रकारच्या नृत्य व गायन कलांचा समावेश असतो. आहे. खासकरून लोकनाच, लोकगीतें, म्हातन, दिवजोत्सव, तरंगोत्सव, आरत, चौरंग, श्लोक, तालगडी, तोणयां खेळातील असे अनेक प्रकार या काळात चालत असतात.
प्रत्येक घरापुढे जसे "आंगण" असते तसे ग्रामीण भागात प्रत्येक गांवात एक "सामुहिक आंगण" असते त्याला मांड म्हटले जाते. गांवात होणारा शिमगोत्सव या ठिकाणी होतो. या मांड संस्कृतीमुळे गांवचा एकोपा सांभाळला जातो. नवोदित पिढीसाठी ही प्रथा संक्रमित होणे गरजेचे आहे.यामुळे पारंपरिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन होण्यास मदत होणार आहे.
अनेक सणा सारखा दिवाळी हा ही सण आहे पण आपल्या राज्यात तो फक्त तीनच दिवस साजरा केला जातो. तरी या काळात सुमार 18 दिवस सुट्टी दिली जाते. सुट्टीचा तसा काहीच सकारात्मक उपयोग होत नाही. या दिवाळी सणाला तीन दिवसांची सुट्टी दिली तरी चालते आणि ती उर्वरित सुट्टी शिमगोत्सवाला द्यावी. जेणेकरून शाळेचा कालावधी कमी होणार नाही आणि शैक्षणिक वेळा पत्रकावर कोणताच परिणाम होणार नाही.
शिक्षण खात्याने शैक्षणिक व सांस्कृतिक वेळापत्रकाचा ताळमेळ साधण्याची मागणी निवेदनात करण्यात आहे. शिमगोत्सव काळात होणाऱ्या परिक्षा काही दिवस पुढे ढकलून गुढी पाडव्या नंतर सुरू कराव्या. जेणे करून विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संस्कृती दोन्ही गोष्टी जोपासण्यासाठी मदत होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.