Sancoale Mega Housing Project: सांकवाळ येथील नियोजित मेगा हाऊसिंग प्रकल्पाला आमचा विरोध आहे. या प्रकल्पाला पंचायतीने दिलेला बांधकाम परवाना मागे घेऊन हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी सांकवाळच्या ग्रामसभेत करण्यात आली. या ग्रामसभेत कचरा प्रश्न, पंचायत घर उभारणीसंबंधी प्रश्नांवरही चर्चा झाली.
सांकवाळ पंचायत क्षेत्रातील नियोजित मेगा हाऊसिंग प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. या प्रकल्पाला गेल्या काही वर्षांपासून विरोध होत असल्याने तो पुढे सरकला नव्हता. या प्रकल्पाला गेल्या महिन्यात पंचायतीने बांधकाम परवाना दिला. त्याचे पडसाद रविवारी झालेल्या ग्रामसभेत उमटले. सध्या गावाला वीज, पाणी समस्यांना सामोरे जावे लागते. उद्या मोठा हाऊसिंग प्रकल्प झाला, तर त्याची गरज कशी पूर्ण करणार, असे प्रश्न विचारण्यात आले. ही ग्रामसभा उपसरपंच गिरीश पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
ही जागा वन खात्याची आहे. जर पंचायतीला परवाना मागे घेण्याचा अधिकार नाही, तर पंचायत बरखास्त करा. त्या मेगा हाऊसिंग प्रकल्पामुळे वीज, पाणी, कचरा वगैरे गोष्टींचा ताण येणार आहे. तो कसा सहन करणार याचे स्पष्टीकरण द्यावे, असे पीटर डिसोझा म्हणाले.
या प्रकल्पाला पीडीए, टीसीपी वगैरेंचे परवाने मिळाले असल्याने आम्हाला परवाना द्यावाच लागला. आम्ही दिलेला परवाना मागे घेऊ शकत नाही. आम्हाला तेवढे अधिकार नाहीत. मात्र, हा प्रकल्प ज्या जागेत येतो ती जर वन खात्याची असेल, तर आम्ही प्रकल्पाविरोधात न्यायालयात जाऊ.
पंच मोर्विलो कार्व्हालो यांनी हा प्रकल्प नियोजनशून्य असल्याने त्याबाबत योग्य अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली. या प्रकल्पामुळे गाव दुभंगला जाण्याची भीती आहे. प्रकल्पामुळे (Project) गावाला काहीतरी लाभ झाला पाहिजे; परंतु या प्रकल्पामुळे गावावर मोठा ताण पडणार आहे. या प्रकल्पाला १६ पैकी १२ परवाने मिळाले नसल्याचा दावा कार्व्हालो यांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.