Goa Taxi Driver Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Drivers: मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेटून प्रश्‍न सोडवावेत; मागण्यांसाठी टॅक्सीधारक आक्रमक

Taxi Driver Protest: मोपा पार्किंग शुल्क कमी करण्यात आले, विमानतळावर १० मिनिटे थांबण्यास परवानगी तरीही टॅक्सी व्यावसायिकांनी आंदोलन मागे घेतलेले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: मोपा विमानतळावरील पार्किंग शुल्क वाढीव २०० रुपयांवरून ८० करण्यात आले. प्रवाशांना विमानतळावर सोडण्यासाठी गेलेल्या टॅक्सी तेथे १० मिनिटे थांबवण्यास परवानगी दिली, तरीही पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी आंदोलन मागे घेतलेले नाही. यासह अन्य काही मागण्यांसाठी त्‍यांनी हे आंदोलन सुरू ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष येऊन आपली भेट घेऊन हे प्रश्न सोडवावेत, अशी त्यांची मागणी आहे.

आज दिल्लीत असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांना उद्या भेटणार आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री येऊन आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू, असे शिव वॉरिअर्स युनायटेड टॅक्सी ब्रदर्स संघटनेतर्फे सांगण्यात आले.

यावेळी निखिल महाले, रामा वारंग, अमित सावंत, दीपक कळंगुटकर, सावियो, शंकर पोळजी, तारा केरकर आदी नेत्यांची भाषणे झाली. शंकर पोळजी म्हणाले की, विमानतळासाठी आमची शेती-बागायती, पर्यावरण नष्ट केले आणि आता आम्हाला जगण्याचा हक्कही काढून घेतला जात आहे.

या ठिकाणी अखिल गोवा पर्यटन शॅक होल्डर संघटनेचे अध्यक्ष जॉन लोबो, पेले, धर्मेश सगलानी, उत्तर गोवा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत, बाप्पा साळगावकर, सुनील कवठणकर, संजय बर्डे, भास्कर नारुलकर, देवेंद्र प्रभुदेसाई, ॲड. जितेंद्र गावकर, मिशन फॉर पेडणेचे अध्यक्ष राजन कोरगावकर आदींनी आंदोलकांच्या बाजूने अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला.

दरम्यान, सायंकाळी उशिरा दक्षिण गोव्याचे खासदार व्हिरियातो फर्नांडिस यांनी मोपा येथे येऊन आंदोलकांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी त्यांना निवेदन सादर केले.

आमदारांनाही दिली नाही दाद

आज मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सी व्यवसायिकांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चानंतर मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक, पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी टॅक्सी व्यावसायिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी बोलणी फिसकटल्यानंतर आमदार जीत आरोलकर आणि प्रवीण आर्लेकर यांनीही मुख्यमंत्र्याची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याच्या आश्वासनालाही आंदोलकांनी दाद दिली नाही.

उत्तर-दक्षिण गोवा संघटित

या आंदोलनात उत्तर आणि दक्षिण गोवा टॅक्सी संघटनांनीही भाग घेऊन पाठिंबा दिला. आजच्या मोर्चात उत्तर व दक्षिण गोव्यातील टॅक्सीधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आम्ही भूमिपुत्र असून या विमानतळासाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला प्राधान्य मिळायलाच हवे. जीएमआर कंपनी काऊंटरवरील शुल्क, पार्किंग शुल्क, प्रवेश शुल्क तसेच लिंक रोडवर शुल्क आकारल्याने टॅक्सी व्यवसाय करणे कठीण होत आहे. वाढविलेले तसेच नव्याने लावलेले दर रद्द करावेत, अशी आंदोलकांची मागणी आहे.

आंदोलक आपल्या म्हणण्यावर ठाम

आंदोलक म्हणाले की, आंदोलन संपल्यानंतर हे दर परत वाढवण्यात येतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: येथे येऊन आम्हाला आश्वासन द्यायला हवे. त्यानंतर आरोलकर यांनी, उद्या सकाळी आठजणांना घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊया, असे सांगितले. पण आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी येथेच येऊन आम्हाला आश्वासन द्यावे, हा हट्ट कायम ठेवला. संध्याकाळी उशिरा पेडण्याचे आमदार आर्लेकर यांनीही आंदोलकांची समजूत काढली. परंतु ते बधले नाहीत.

सरकारविरोधात घोषणाबाजी

यावेळी आंदोलकांनी हातात फलक घेऊन जीएमआर कंपनी, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, राज्य सरकार यांच्याविरोधात जोरदार घोषणा देत पेडणे बाजारातून पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. पोलिसांनी गेटवरच मोर्चा अडवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

SCROLL FOR NEXT