गोव्यातील राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा ऐकायला मिळतेय, आणि ती म्हणजे ‘टॅक्सी’वरून पुन्हा एकदा मंत्री रोहन खंवटे आणि आमदार मायकल लोबो यांच्यात वाद पेटणार, असे दिसत आहे. टॅक्सी व्यवसायाला शिस्त लावण्यासाठी मंत्री खंवटे यांनी पुन्हा एकदा ‘कॅब अॅग्रीगेटर’ची बाजू घेतली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य असल्याचे ठासून सांगत त्यांनी टॅक्सी व्यवसायात रेग्युलेशन आणि दलालीचा अंत करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पारंपरिक टॅक्सीचालकांच्या पोटावर पाय येणार, असे मत मांडत मायकल लोबो यांनी सरकारच्या या धोरणाचा तीव्र विरोध केला आहे. गोव्यात या विषयी राजकीय वातावरण तापत असताना, या वादातून स्थानिक टॅक्सीचालकांचे भले होईल की राजकीय स्वार्थ जपला जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ∙∙∙
विरोधी पक्ष नेत्याने पालिकेच्या पोटनिवडणुकीत उतरणे योग्य आहे काय? असा प्रश्न आता कुंकळ्ळीतील काँग्रेस समर्थक जनता विचारू लागली आहे. कुंकळ्ळी नगरपालिकेच्या प्रभाग दहा चा नगरसेवक निवडण्यासाठी रविवारी पोटनिवडणूक होत आहे.या पोटनिवडणुकीत युरी समर्थक उमेदवारासमोर माजी नगरसेवक प्रेमदीप देसाई यांनी आव्हान उभे केले आहे. मारियान सुवारीस याला विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी पूर्ण समर्थन दिले असून मारियान याला निवडून आणण्यासाठी युरी यांनी म्हणे मोठी टीम प्रत्यक्ष रणभूमीवर उतरविली आहे. उमेदवाराने आपल्या प्रचार बॅनरवर युरी व युरी यांचे वडील तथा माजी आमदार ज्योकीम आलेमाव यांचे फोटो टाकले आहेत. युरी यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मारियान यांच्यासाठी प्रचार करताहेत. आता एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीत आमदाराने उतरणे योग्य आहे का? आमदार समर्थक उमेदवार हरल्यास ती विरोधी पक्ष नेत्याची हार ठरणार नाही का? असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्तेच विचारत आहेत. ∙∙∙
कृषिमंत्री रवी नाईक यांना एक दिग्गज राजकारणी म्हणून ओळखले जाते. पण कलाकारांत रमणारा नेता, हे त्यांचे रूप मात्र फार कमी लोकांना ठाऊक आहे. स्वतः कलाकार नसूनही त्यांना कलाकारांबद्दल भलतीच आत्मीयता. पूर्वी ते म्हणे त्यांच्या नाटकात काम करणाऱ्या काही कलाकार मित्रांना त्या त्या भूमिकेला लागणारे कपडेसुद्धा नेऊन देत असत. आपल्या काही कलाकार मित्रांच्या नाटक-सिनेमांना आजही ते हजेरी लावताना दिसतात. या त्यांच्या कलाकारांवरील प्रेमापोटीच त्यांनी २००२ साली विपरीत परिस्थिती असूनही फोंड्यात राजीव गांधी कला मंदिर अस्तित्वात आणले. या कला मंदिराचे अध्यक्ष असताना त्यांनी कलाकारांना ऊर्जा देण्याकरता अनेक उपक्रमही राबवले होते. हे सगळे आठवायचं कारण म्हणजे फोंड्यात १५ मार्च रोजी होणारा शिगमोत्सव. १५ रोजी फोंड्यात होणाऱ्या या लोकोत्सवाच्या तयारीला पात्रांव आतापासूनच लागलेले दिसताहेत. राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनीच शिगमोत्सव राज्यपातळीवर नेल्यामुळे त्यांना या उत्सवाबद्दल प्रेम असणे साहजिकच आहे म्हणा. ते काही असेना पण सध्या फोंडा शहरात पात्रांवाच्या या वेगळ्या मुख्य म्हणजे राजकारण विरहित ‘रुपा’बाबत चर्चा सुरू आहे. ∙∙∙
माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आपल्या कामासाठी एका मंत्र्याच्या स्वीय साहाय्यकामार्फत १५ ते २० लाख रुपये दिल्याचा आरोप केला आणि भाजपमध्ये सर्वस्तरासह मंत्र्यांमध्ये खळबळ उडवून दिली. राज्यात अगोदरच विविध प्रकरणांमुळे सरकारकडे बोटे दाखवली जात आहेत. त्यात खुद्द भाजपच्याच माजी मंत्र्याने आरोप केल्याने पक्षात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे, हे भाजपचेही वरिष्ठ नाकारत नाहीत. एका मंत्र्याच्या स्वीय सहायकाचा जो मडकईकरांनी उल्लेख केला आहे, त्यालाच धरून उत्पल पर्रीकर यांनी थेट पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या स्वीय सहायकाकडे अप्रत्यक्षरित्या बोट दाखवले आहे. कारण त्या स्वीय सहायक असलेल्या महिलेचे कारनामे पणजीत चवीने चर्चिले जात आहेत. याशिवाय या महिला स्वीय साहाय्यकाचा जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजात मोठा हस्तक्षेप होत असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. याच महिलेच्या कारनाम्यांविषयी सरकारातील एका मंत्र्याने संबंधित मंत्र्याला सूचितही केले होते. त्याशिवाय गुरुवारी सकाळी ती महिला मंत्रालयाच्या आवारात दिसल्याने उलट-सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. ∙∙∙
राज्यातील रस्त्यांची अवस्था ही गेल्या १० वर्षांपासून घसरली असून लोक हैराण झाले, परंतु याची दखल घेतली जात नाही. उलट ज्या कंत्राटदाराने हे रस्ते केले त्यालाच नवीन मोठे प्रकल्प दिले जातात, असे आरोप झालेत. तरीही सरकारला फरक पडत नाही, अशी प्रचिती आली आहे. सध्या दाबोळी येथे लोखंडी बॅरीकेड कोसळून एकाचा मृत्यू झाला. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा यासाठी जबाबदार असल्याची टीका झाली. याच महाशयाला मिरामार-दोनापावला रस्ता दिला, त्याची अवस्था सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर पेडणे येथे महामार्गाचा एक भाग नदीत कोसळला, नंतर पेडणे येथे दरड कोसळून महामार्ग गेल्या पावसाळापासून बंद आहे. पणजी ‘स्मार्ट सिटी’ रस्त्यांचे कामही देऊन त्यांचे वाटोळे झाल्याचे जाहीर पुरावे सगळ्यांच्या समोर आहेत. एवढे सगळे होऊनही महाशय भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा जावई असल्याने सरकारचा लाडका झाल्याची चर्चा सोशल मीडियावर होतेय. ∙∙∙
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील माहिती देण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती सांगितल्यानंतर ते उठून जाण्याच्या तयारीत असतानाच पत्रकारांनी संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाचा प्रश्न विचारला. परंतु मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा विषय पुन्हा हसण्यावारी नेला. त्यांनी स्मित हास्य करून संभाव्य मंत्रिमंडळाच्या बदलाविषयी पुष्टीही केली नाही किंवा विचारलेल्या प्रश्नाचे खंडनही केले नाही. मंत्रिमंडळ बदलाचा विषय आला की, मुख्यमंत्री आता त्यावर काहीच बोलत नाहीत. आजच्याही त्यांच्या ‘त्या’ स्मित हास्यामागील गुपित त्यांना नक्कीच माहीत असणार आहे. मात्र, बी.एल. संतोष गोव्यातून परतल्याने मंत्रिमंडळ बदलांबद्दलच्या चर्चेला सध्यातरी पूर्णविरामच असल्याचे दिसते. ∙∙∙
एका माजी मंत्र्याने विद्यमान मंत्र्यावर जो पंधरा वीस लाख घेतल्याचा जो जाहीर आरोप केला आहे त्या वरून सध्या वादळ उठलेले आहे. एक प्रकारची ही लाचच आहे व गेले अनेक वर्षे असे आरोप सत्ताधाऱ्यांवर होत आहेत, असे सांगितले जाते. मगो राजवटीत असे आरोप मुंबई मार्गावरील बसेस परवान्यांवरून होत असत. एका तिकिटामागे कोणाला तरी पाच रु. जातात असे त्यावेळी म्हटले जायचे. नंतर असे आरोप जमीन रुपांतराबाबत होऊ लागले कॉंग्रेसच्या व नंतर भाजप राजवटीत अशा आरोपांनंतर मंत्र्यांना राजिनामेही द्यावे लागले होते. पण अन्य कोणतीही कारवाई झाली नव्हती. अगदी हल्लींचे ताजे प्रकरण ठरले ते कॅश फॅार जॅाबचे , त्याचेही तसेच झाले. जमीन व्यवहाराबाबत तर कोटींचेच व्यवहार झाल्याचे केवळ आरोप झाले. मध्ंयतरी संबंधित खाते बदलले परिणामी पूर्वीची देवघेव वाया गेली व या व्यवहारांत संबंधितांना मोठा फटका बसला अशी चर्चा होती. अशा प्रकारांत कोणतीच कायदेशीर वैधता नसल्याने शेवटी निष्पन्न काहीच होत नाही त्यामुळे सध्याच्या वीस लाखांच्या व्यवहाराची खरेच फलनिष्पत्ती काही होणार का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. कारण यापूर्वींच्या कोटींच्या व्यवहारांचे काहीच झाले नव्हते व म्हणून हे प्रकरणही चहाच्या पेल्यांतील वादळ तर ठरणार नाही ना, असे बोलले जात आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.