मोरजी: आगरवाडा-चोपडे पंचायत क्षेत्रात खुलेआम चाललेल्या मटका जुगार अड्ड्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी रविवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांकडून करण्यात आली. प्रामुख्याने पंचायत कार्यालयासमोरच चाललेला मटका जुगार अड्डा त्वरित बंद करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. याबाबत पेडणे पोलिसांत योग्य ती तक्रार नोंदवून कारवाई करण्यात येईल, असे सरपंच भगीरथ गावकर यांनी सांगितले.
सरपंच गावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेला उपसरपंच समिती राऊत, पंच संगीता नाईक, प्रमोदिनी आगरवाडेकर, प्रमोद गावकर, नितीन चोपडेकर, पंचायत सचिव रमेश मांद्रेकर आदी उपस्थित होते. पंचायत कार्यालयासमोरच एका गाळ्यात चाललेल्या मटका जुगाराविषयी प्रश्न उपस्थित झाला असता, असे सांगण्यात आले, की स्थानिक पंचायत सदस्य नीलम मसुरकर यांनी याविषयी पेडणे पोलिस ठाण्यात संपर्क साधून तक्रार केली होती. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत हा अड्डा अद्यापही सुरू आहे. त्यावर पंचायतीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यावेळी एका पंच सदस्याने मटका जुगार अड्डा चालू असल्यास तुमचे काय नुकसान होते, असा प्रश्न करून हे अड्डे बंद करायचे झाल्यास मटका जुगार चालवणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्या, असे सांगितले. त्यावेळी वातावरण बरेच तापले. सरपंचांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यावर नियंत्रण आणले.
यावेळी विविध विषयांवर झालेल्या चर्चेत आनंद नाईक, बाबली राऊत, नरेश चोपडेकर, अमोल राऊत, विठोबा बगळी, बाबलो आगरवाडेकर, जगदीश गावकर, गुणाजी अमेरकर, अनिल शेट्ये, संदेश हाडकी, नामदेव परब इत्यादींनी भाग घेतला. पंचायत सचिव मांद्रेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. सरपंच गावकर यांनी स्वागत केले. उपसरपंच राऊत यांनी आभार मानले.
वॉशिंग सेंटरवर कारवाईचे आश्वासन
आमदार दयानंद सोपटे यांच्या प्रयत्नातून श्री नागनाथ देवस्थान जवळील एका विहिरीवर पंप बसवण्यासाठी पंचायतीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रस्ताव ठेवला होता त्याचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित झाला असता त्यावर ना हरकत दाखला मिळाल्यास या विहिरीचे पाणी गावातील लोकांना पुरवणे शक्य असल्याचे सरपंच भगीरथ गावकर यांनी सांगितले. ग्रामस्थांनी त्याला आक्षेप घेतला. या विहिरीवर पंप बसवून त्याचे पाणी एका वॉशिंग सेंटरकडून वाहन धुण्यासाठी वापरले जाते. त्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असता, सरपंचांनी त्या वॉशिंग सेंटरवर कारवाई करण्याचे मान्य केले.
कचरा उठाव मोहीम राबवणार
पंचायत क्षेत्रात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त करून त्यासाठी पंचायत मंडळाकडून विशेष मोहीम राबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर चर्चा करून 28 नोव्हेंबरपासून विशेष मोहीम राबवण्यात येईल, असे सरपंचांनी सांगितले. तसेच ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.