फोंडा: कंत्राटावर काम करणाऱ्या कामगारांना योग्य तो न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध असून काम करणाऱ्यांचे नेहमीच कौतुक होईल, दखल घेतली जाईल, अशी ग्वाही देताना चांगल्या कामासाठी जिद्द बाळगा आणि कष्ट करून वीज खात्याचे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
कुर्टी - फोंड्यात आज (सोमवारी) लाईनमन हेल्पर दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. एकूण 101 कर्मचाऱ्यांचा गौरव वीजमंत्री सुदिन ढवळीकर व इतरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस, कार्यकारी अभियंता पी. पी. भरतन, सहायक अभियंता केशव गावडे व मंगेश नाईक तसेच लाईनमन कर्मचाऱ्यांतर्फे उमाकांत गावडे व चंद्रकांत भोई आदी उपस्थित होते.
सुदिन ढवळीकर म्हणाले, चांगल्या कामाची कोणीही दखल घेतो. वेळेचे महत्त्व आदी राखले पाहिजे. सरकारी कर्मचारी म्हटल्यावर आपण जे काम करतो, त्याची आधी पूर्ण जाणीव असायला हवी. इतरांना चांगले ते देण्याचा प्रयत्न हा झाला पाहिजे. त्यामुळे कनिष्ठ ते वरिष्ठ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज भासल्यास ती उपलब्ध करून द्यायला हवी. वीज खात्याचा मंत्री या नात्याने आपण ग्राहकांना चांगले ते देण्यासाठी कटिबद्ध असून या खात्यातील समस्या सोडवण्यासाठी आपले पहिले प्राधान्य असेल. कंत्राटावर असलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यात येईल, त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडेही बोलणी करण्यात येईल, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.
यावेळी स्टिफन फर्नांडिस तसेच पी. पी. भरतन यांनीही कामगारांना मार्गदर्शन केले. वीज खात्यात लाईनमन हेल्पर म्हणून काम करणाऱ्यांकडून योग्य काम झाले तर ग्राहक खूष होतो, वीज खात्याचे कर्मचारी योग्य काम करतात त्यामुळेच आज या खात्याला शाबासकी मिळत असून जिवाचा धोका असूनही हे काम करणाऱ्यांमुळेच वीज खात्याचे काम योग्य रीतीने चालले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सहायक अभियंता केशव गावडे यांनी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.